आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack Information Not Share On Media In Pakistan

पाकमध्ये आता हल्ल्याची माहिती सांगितलीही जात नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावरमधील सैनिकी शाळेवरील हल्ल्यानंतर शाळकरी मुले, सैनिक, पोलिसांवर या हल्ल्याचे खोलवर परिणाम झाल्याचे दिसून येत असून अनेक लोकांवर खास मानसोपचार सुरू आहेत.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर किती परिणाम झाले आहे, हे एका उदाहरणावरून दिसून येत आहे. आता पाकमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावरही या घटनेची माहिती नातेवाइकांना कळवली जात नाही. विशेषत: मुलांना अशा घटनांच्या माहितीपासून दूर ठेवण्यात येत आहे. कारण पाकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मानसिक रुग्णांची काही प्रकरणे पुढे आली असून त्यांच्या मनावर या दहशतवादी घटनांचा विपरीत परिणाम झाला आहे. यामध्ये ज्या आप्तस्वकीयांचे बळी गेले अशा नातेवाइकांचाच समावेश आहे.

डिसेंबर २०१४ दरम्यान पेशावरच्या सैनिकी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला चिंतित करून सोडले आहे. येथील बाॅम्बस्फोटात आणि गोळीबारात १३० हून अधिक मुले मृत्युमुखी पडली. त्यामुळे पाकिस्तानी जनता मुळापासून हादरली आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरलेली मुले आजही भेदरलेल्या अवस्थेत वावरतात. आपल्याच नातेवाइकांशी धड बोलतही नाहीत. पेशावरशिवाय अन्यत्र झालेल्या काही घटनांमुळे मुले, वयस्क मंडळी, महिलांवर मानसोपचार सुरू असल्याच्या केसेस निदर्शनास येत आहेत. वेगवेगळ्या कथा सांगून मुलांवर मानसोपचार सुरू आहेत. घटनेच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर असल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तानमध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले होत होते. परंतु खरी माहिती आता समोर येत आहे. दहशतवादी हल्ल्यात जी माणसे मारली जातात, त्यांच्या नातेवाइकांवर, मुलांवर याचा विपरीत परिणाम होतो आहे. पेशावरशिवाय रावळपिंडी, इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमधील शाळांत शिक्षकांनी मुलांना अभ्यासाबरोबरच विविध उपचार सुरू केले आहेत. ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो अशा गोष्टीमध्ये त्यांना सतत व्यग्र ठेवले जात आहे. त्यांना इतर गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळही नाही. इतकेच नव्हे तर या शहरात एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास सर्वप्रथम ही घटना मुलांपासून लपवून ठेवण्यात येते. विशेषत: तरुण मंडळी आणि वयस्क माणसेही आपल्या घरच्यांपासून या घटना लपवून ठेवत आहेत. त्यांच्याकडे या घटनांचा उल्लेखही टाळला जातो. अन्य काही गोष्टीही बोलल्या जात नाहीत.

पेशावरमधील ज्या मुलांनी हा हल्ला डोळ्यांनी पाहिला त्या सर्वांकडे स्वयंसेवक आणि मनोवैज्ञानिकांनी संपर्क साधला असून मुलांनी या हल्ल्याची आठवण विसरून जावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार पाकमध्ये हिंसाचार उफाळल्याने मानसिक रुग्णांची संख्या वाढतेच आहे. यात शाळा व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

बीना शाह, आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तज्ज्ञ