आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वालाच अाव्हान!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकचालकानुवर्ती असलेले बहुतांश प्रादेशिक पक्ष अजूनही निद्रावस्थेत आहेत. परंपरागत पद्धतीच्या कार्यशैलीत बदल करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. सत्ताकाळातील स्मरणरंजनासाठी विधानसभा निकालाने त्यांना मोकळीक दिली आहे. परंतु मिळालेल्या मोकळिकीचा संघटना विस्तार आणि रचनात्मक कार्यासाठी सदुपयोग करणे त्यांच्याच हिताचे आहे. जनतेशी पुन्हा नाळ जोडून अशा पक्षांना त्यांचे अस्तित्व दाखवून द्यावे लागेल, तरच प्रादेशिक पक्षांना भवितव्य आहे. 

थो र कूटनीतीज्ञ चाणक्याच्या वचनात म्हटले आहे की, दुसऱ्यांच्या चुकांतून तुम्ही बरेच शिकू शकता, कारण तुमच्या चुकांतून शिकण्यासाठी तुमचे आयुष्य कमी पडेल. देशातील सध्याच्या राजकीय वातावरणात बऱ्याच विशेषत: प्रादेशिक पक्षांना चाणक्याचे हे वचन लागू पडते. भाजपच्या विजयाचा अश्वमेध रोखण्यास सपा-बसपला अपयश आले. यामध्ये त्यांच्याकडून झालेल्या चुका इतर प्रादेशिक पक्षांसाठी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा याप्रमाणे आहे; नाही तर त्यांचे राजकीय आयुष्य निश्चितच कमी हाेण्याचा धोका आहे. यातून ते काय बोध घेतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. 

तीन वर्षांनंतरही काही राज्यांत मोदी लाट कायम आहे. तिला थोपवणे अनेक पक्षांना अशक्य झाले आहे. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपा आणि बसपचा सफाया झाल्याने ते दिसून आले. भाजपला मिळालेला जनादेश प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व मोडीत काढणारा ठरला. या यशाने ठिकठिकाणचे प्रादेशिक पक्ष गोंधळले अाहेत. राष्ट्रीय पक्षांच्या मार्गातील स्पीड ब्रेकर्स हे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यांना उखडून टाकण्याची हीच योग्य वेळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रादेशिक पक्षांसाठी येता काळ कसोटीचा राहील. भाजपचा मुकाबला ते एकट्याने करतात का, मित्रपक्षांच्या आघाडीतून हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एका बाजूला पक्ष सांभाळत प्रादेशिक अस्मिता आक्रमकपणे जपण्याची दुहेरी कसरत प्रादेशिक पक्षांना यापुढे करावी लागणार आहे. 

प्रादेशिक अस्मितेच्या पायावर उभे असलेले अनेक राजकीय पक्ष राज्याराज्यांत आहे. भारतातील प्रादेशिक विविधता जपत अशा पक्षांची राजकीय वाटचाल सुरू आहे. त्या अस्मिता विविधतेत एकता आणि एकोपा निर्माण करतात. याच विविधतेवर घाला घालून आसेतुहिमाचल एकपक्षीय विचारांचे पद्धतशीरपणे आक्रमण होत आहे, असे आक्रमण थोपवून देशाच्या विविधतेचे रक्षण करण्याची जबाबदारी साहजिकच प्रादेशिक पक्षांवर आली आहे. पक्षाचा विस्तार राष्ट्रीय स्तरावर करण्याच्या फंदात सहसा असे पक्ष पडत नाहीत. राज्यातील भाषिक, सांस्कृतिक व भौगोलिक अस्मिता जागवण्याचे कार्य करणे आणि प्रादेशिक हिताला प्राधान्य देण्याकडेच अशा पक्षांचा कल असतो. परंतु यापुढे राजकीय विचारधारेच्या कक्षा रुंदावणे त्यांना अपरिहार्य ठरते आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतरच्या दोन वर्षांत महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, प. बंगाल, ओडिसा आणि तामिळनाडू मधील विधानसभा निवडणुका झाल्या.  मोदी लाटेचा या निवडणुकांवर फारसा परिणाम जाणवला नव्हता. महाराष्ट्र वगळता इतर सर्व ठिकाणी प्रादेशिक पक्ष विजयी झाले. महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आला, परंतु त्यासाठी त्यांना शिवसेनेची मदत घ्यावी लागली. 

सत्तेत असूनही सपाचा उत्तर प्रदेशात पराभव झाला. मात्र, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांनी सत्ता राखण्यास यश मिळवले. शिवसेनेनेही विधानसभा एकट्याने लढत सन्मानजनक जागा मिळवल्या होत्या. भाजपला बिहार आणि दिल्लीमधील पराभव अनपेक्षित होता. त्यामुळे उत्तर प्रदेशाची निवडणूक त्यांनी गांभीर्याने घेतली. पंतप्रधान मोदींचाच चेहरा त्यांनी पुढे आणला. मोदींच्या खणखणीत नाण्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला. सपा आणि बसपकडे मोदींच्या तोडीचा नेता नव्हता. विकासाचे मॉडेल म्हणून अखिलेश जनतेत गेले खरे; पण मोदींपुढे ते झाकोळले. पराभवाच्या यादीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडची भर घालण्यापुरतेच राहुल गांधी या निवडणुकीत मर्यादित राहिले. 

एकेकाळी केंद्रात भाजपसोबत २२ पक्ष होते. गत लोकसभेवेळीही भाजप २९ पक्षांसह निवडणुकीला सामोरा गेला. परंतु सध्या प्रादेशिक पक्षांबाबत भाजपचे धोरण बदलले आहे. याच भाजपने अशा पक्षांना गोंजारत त्या-त्या प्रदेशात पक्ष विस्ताराचे काम मोठ्या खुबीने केले. भाजपचा अंतस्थ हेतू ओळखण्यास शिवसेनेलाही पंचवीस वर्षे लागली. इतकी वर्षे युतीत सडल्याची भावना यातूनच व्यक्त झाली. 

लोकसभेतील मोदींना दिलेल्या पाठिंब्याच्या आघाताने मनसेही अद्याप सावरू शकलेली नाही. प्रादेशिक अस्मितेआडून भौतिक हितसंबंध आणि सत्तेत दावा करण्याची प्रादेशिक पक्षांची स्वार्थी वृत्ती असते, असा आरोप राष्ट्रीय पक्षांकडून नेहमीच केला जातो. त्यामुळे देशातील प्रादेशिक पक्ष संपलेच पाहिजेत, अशी त्यांची मानसिकता आहे. यासाठीच मोदींचा राष्ट्रीय चेहरा विधानसभा निवडणुकीतही चालवला जात आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या काही राज्यांतील निवडणुकीतही भाजपकडून दुसरा कोणताही चेहरा दिसणार नाही. सर्व निवडणुका केवळ आणि केवळ मोदींच्याच नावाने लढवल्या जातील. प्रादेशिक पक्षांपुढे हाच मोठा धोका राहणार आहे. 

अटलबिहारी वाजपेयी सरकारचा एका मताने पराभव झाला होता. त्याला जयललितांचा अण्णा द्रमुक पक्ष कारणीभूत होता. तेव्हापासून भाजप प्रादेशिक पक्षांबद्दल सुरक्षित अंतर ठेवून आहे. सोयीनुसार त्याने आवश्यक तेथे प्रादेशिक पक्षांशी युती केली, प्रसंगी दुय्यम वागणूक  सहन केली. परंतु पक्षविस्तार करण्यात त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. प्रादेशिक पक्ष नामशेष व्हावेत, अशी मनोमन इच्छा असल्यानेच द्विपक्षीय निवडणूक प्रणालीची देशाला गरज असल्याचे ठासून सांगितले जाते. प्रादेशिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीयत्व महत्त्वाचे, देश एकसंध ठेवण्यासाठी राज्या-राज्यांतील पक्षांची सद्दी संपुष्टात यावी, अशी विधाने हेतुपूर्वक पसरवली जातात. या सगळ्याचा प्रतिवाद तेवढ्याच आक्रमकपणे करण्याचे आव्हान प्रादेशिक पक्षासमोर येत्या काळात राहणार आहे. अशा पक्षांना भविष्यात प्रादेशिक अस्मितेसोबत राष्ट्रीय समस्येशी देणे-घेणे ठेवावेच लागेल. 

काँग्रेसशासित राज्यांमध्ये विस्तारण्यासाठी प्रादेशिक पक्षांना मोकळीक होती. कारण काँग्रेस सत्तेत रममाण होती. आजूबाजूला काय घडत आहे याकडे त्यांचे लक्ष नसायचे. परंतु भाजप याबाबतीत सतर्क आहे. त्यांच्या राज्यांमध्ये त्यांनी प्रादेशिक पक्षांना नावापुरतेही ठेवलेले नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात ही काही उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रातही त्यांनी शिवसेनेचे पंख छाटणे पद्धतशीरपणे सुरू केले आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये हाच गुणात्मक फरक दिसून येतो. 

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत भाजपने देशातील बऱ्याच पक्षांसोबत युती केली होती. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. देशातील राजकीय समीकरण भाजपच्या यशाने बदलले आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभेची तयारी भाजपने सुरू केली आणि यात प्रादेशिक पक्षांना फारसे महत्त्व राहील याची शाश्वती नाही.  एकचालकानुवर्ती असलेले बहुतांश प्रादेशिक पक्ष अजूनही निद्रावस्थेत आहेत. परंपरागत पद्धतीच्या कार्यशैलीत बदल करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. जनतेशी पुन्हा नाळ जोडून अशा पक्षांना त्यांचे अस्तित्व दाखवून द्यावे लागेल, तरच प्रादेशिक पक्षांना भवितव्य आहे. 
बातम्या आणखी आहेत...