आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प. महाराष्ट्रातही होऊ शकतात राजकीय उलथापालथी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर भागात उजनी धरण भरल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीत उत्साह आहे, पण शरद पवारांनी मुलगी, खासदार सुप्रिया आणि जावई सुळे यांना घेऊन येऊन उजनीची अचानक पाहणी केली, या पाहणीची कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे उजनीच्या पाण्यासाठी आणखी काही वाटा तयार होतात का? या चर्चेने जोर धरला आहे. उजनी धरणाने तळ गाठल्यानंतर त्याचे भांडवल करून पवारांना अडचणीत आणण्याचे राजकारण मधल्या काळात झाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरणचे आंदोलनही पश्चिम महाराष्‍ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकते. साखर कारखानदारी आणि या परिसरातील राजकारण हे समीकरण पाहता या घटनाच राजकारणाची दिशा ठरविणा-या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकारणातील हालचाली पाहता येत्या काही दिवसांत ब-याच उलथापालथी होण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम महाराष्‍ट्रातील राजकारणात खरे तर ब-यापैकी राजकीय चित्र स्पष्ट असल्याचा अनुभव, पण सध्याच्या बदलत्या राजकारणात शरद पवार यांचा माढा, पुणे जिल्ह्यातील काही मतदारसंघ, सातारा आदी परिसरात बरीच राजकीय खलबते सुरू झाली आहेत.

आता लोकसभेत जाणार नाही, राज्यसभेत जाणे पसंत करतो असे शरद पवारांनी जाहीर केले आहे,. त्यामुळे माढा मतदार संघाचा त्यांचा वारसदार कोण, याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील रामराजे नाईक-निंबाळकर, सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रामुख्याने नावे आहेत. तर माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गावनिहाय दौरे सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीची चाचपणी असल्याची जोरदार चर्चा होते आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय शिंदे यांचीही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे बोलले जाते.

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शरद पवारांना ‘अगोदर रणजितसिंहाचे पहा’ असे स्पष्ट शब्दात सांगितल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील पवारांविरोधात मोहीम उघडून बसले आहेत. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात आता काँग्रेसचे सुरेश कलमाडी पुन्हा कामाला लागले आहेत. तेथे काँग्रेसमध्ये अगोदरच असंतोष धुमसतो आहे. कलमाडी विरुद्ध उर्वरित काँग्रेसचे नेते असे तेथे काँग्रेसमधील चित्र आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे आणि शरद पवार यांचे सख्य असल्याने ते येत्या काळात वेगळा निर्णय घेऊ शकतात असे राष्‍ट्रवादीतील नेत्यांकडून सांगितले जात आहे. अगोदरच राष्‍ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये धनंजय मुंडे यांना घेऊन भाजपला, विशेषत: गोपीनाथ मुंडे यांना जोरदार धक्का दिला. दुसरा धक्का शिवसेनेला आणि तोही प.महाराष्‍ट्रात असू शकतो अशी चर्चा आहे. राज्यसभेवर जाण्याची तयारी शरद पवार करीत आहेत, याचाच अर्थ ते लोकसभेसाठी मोकळे असतील. त्यामुळे ते बरीच राजकीय गणिते मांडून विरोधकांसाठी तयारी करू शकतात असे मानले जातेय. ते खूप महत्त्वाचे आहे.