आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Should Be Punishment To The Minor Aga Offenders

अल्पवयीन आरोपीलाही व्हायला हवी कठोर शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला फक्त तीन वर्षांची (1095 दिवस) शिक्षा झाली. त्याला सुधारगृहात ठेवण्यात येईल. मुंबईमधील छायाचित्रकार आणि बंगळुरूमधील विधी विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक-एक आरोपी अल्पवयीन आहेत. ते दोषी असल्याचे सिद्ध झाले तरीही त्यांना कठोर शिक्षा होणार नाही. कारण भारताच्या कायद्यानुसार अल्पवयीनने कितीही क्रुर गुन्हा केला तरी त्यास जास्तीत जास्त तीन वर्षांचीच शिक्षा होऊ शकते. हा कायदा फक्त भारतातच आहे. अन्य देशात अल्पवयीन व्यक्तीस सुधरण्याची संधी मिळते परंतु शिक्षा ठरविताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते.
इंग्लंडच्या कायद्यानुसार 10 वर्षांच्या बालकास चांगले वाईट काय असते हे कळते. येथे गुन्ह्यांच्या गंभीरतेवरून खटल्यातील आरोपीला अल्पवयीन किंवा प्रौढ ठरविण्यात येते. ऑस्ट्रेलियामध्येसुद्धा 10 वर्षांच्या बालकाला कायद्यानुसार जबाबदार मानण्यात आले आहे. अमेरिकेतही इंग्लंडप्रमाणेच गुन्ह्याच्या गंभीरतेवरून अल्पवयीन किंवा प्रौढ ठरविले जाते. परंतु भारतात अल्पवयीन न्याय अधिनियमात अल्पवयीनचे वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वय त्यापेक्षा कमी असेल तर गुन्हा कितीही गंभीर असला तरी त्यास अल्पवयीनच समजले जाते. दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर या कायद्याला आव्हान देण्यात आले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने 17 जुलै रोजी अल्पवयीनची वयोर्मयादा 18 वरून 16 वर्षांवर आणण्याची मागणी फेटाळली.
भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 22 ऑगस्ट रोजी ‘अल्पवयीन’ च्या व्याखेची समीक्षा करण्यासाठी राजी झाले होते. केंद्र सरकारसुद्धा या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहे. ‘अल्पवयीन’ हे शब्द नव्या व्याखेत मांडण्यासाठी केंद्रसरकारची तयारी सुरू असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री आर.पी.एन.सिंग यांनी सांगितले आहे. शिक्षेची निश्चिती वयाऐवजी गुन्ह्याच्या गंभीरतेवरून व्हावी यासाठी खासगी विधेयक आणणार असल्याची माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी दिली. या मुद्दय़ावर मोठय़ा प्रमाणात चर्चा सुरू आहे परंतु आता कायद्यात बदलही व्हायला हवे. पुढाकार कोणीही घेवोत परंतु त्याचे परिणाम दिसायला हवेत.