आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या परिणामांसाठी विचार करा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर दीर्घकाळ आनंदाचा अनुभव घेता येतो. याचे परिणाम चांगले असतात. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ऑगस्ट 1979 मधील एका अनुभवाबाबत अनेक वेळा सांगितले आहे. त्या वेळी ते सॅटेलाइट लाँच व्हेइकल (एसएलव्ही) मोहिमेचे नेतृत्व करत होते. उपग्रह प्रक्षेपणाचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. सोडलेला उपग्रह अंतराळात जाण्याऐवजी बंगालच्या उपसागरात कोसळला. याच दिवशी सायंकाळी प्रक्षेपणाबाबत पत्रकार परिषद होती. या मोहिमेचे नेतृत्व अब्दुल कलाम यांच्याकडे असल्याने त्यांनीच पत्रकार परिषदेला संबोधित करावे, असे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे प्रमुख सतीश धवन यांनी सांगितले. जबाबदारीबाबत धवन यांचे विचार पाहून कलाम चकित झाले.

पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले. मोहिमेचे नेतृत्व याही वेळी कलामांकडेच होते. सायंकाळी पत्रकार परिषद होती. धवन यांनी सांगितले की, मोहिमेचे नेतृत्व अब्दुल कलाम यांच्याकडे असल्याने तेच पत्रकार परिषदेला संबोधित करतील. हे ऐकताच कलाम यांनी आपल्या बॉसला नमस्कार केला. स्वत: जबाबदारी घेण्याची शिकवण, आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण आणि जे योग्य आहे त्याला साथ देण्याची शिकवण दिल्याबद्दल अब्दुल कलाम यांनी सतीश धवन यांचे आभार मानले.

चुकीचे काम केल्याचे किंवा चुकीच्या मतांना पाठिंबा दिल्याचे अनेकदा दु:ख होते. जबाबदा-यांकडे पाठ फिरवणे किंवा इतरांचे श्रेय स्वत: लाटल्याने जीवनात औदासीन्य पसरते. इतरांनी केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय घेतल्याने शक्तिहीन झाल्यासारखे वाटते. आत्मविश्वास खालावतो. आनंद नेहमी आत्मविश्वास आणि तृप्ततेतून मिळत असतो.

आपल्या उदास किंवा हताश क्षणांबाबत विचार केला असता तुमच्या लक्षात येईल की, इतरांच्या चुकीच्या वागण्यामुळे तुम्ही उदास होत नाही. इतर कोणीही तुमचे काहीही नुकसान करू शकत नाही. प्रत्यक्षात आपण स्वत:च इतरांबाबत चुकीचे मत तयार करून स्वत:चे नुकसान करून घेत असतो. घरात मुलांच्या वाईट वागण्यामुळे आपण दु:खी होतो, उदास होतो. प्रत्यक्षात मात्र चूक आपलीच असते. अनेकदा पालकत्वाच्या भूमिकेतून आपण मुलांचे संगोपन करताना आपल्याकडून झालेल्या चुकांकडे कानाडोळा करतो. याचाच परिणाम काही वर्षांनी मुलांच्या वागण्यात दिसतो.

काही करण्यापूर्वी आपण जर थोडा विचार केला तर नक्कीच चांगले जीवन जगता येईल. चांगल्या कामगिरीच्या माध्यमातून आव्हानांना तोंड दिल्यास जीवन अधिक सुंदर होईल. आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी नेहमी विचार करणे गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. त्यासोबतच खाणे-पिणे, उठणे-बसणे तसेच काही बोलण्यापूर्वीही विचार करा. यामुळे आव्हानांना सामोरे जाण्यापूर्वी विचार करण्याची सवय लागेल. असे केल्याने उत्तम परिणाम मिळतील. पण लोक विचार करण्यास दुय्यम महत्त्व देतात. अधिकांश प्रकरणात त्याच क्षणी प्रतिक्रिया देणे किंवा आत्ममंथन न करण्यामुळे वाईट परिणामही दिसू शकतात.

विजय बत्रा, अमेरिका आणि जपानमधील प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर