आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे तर सत्ता- संपत्तीच्या मुजोरीचे निर्लज्ज प्रदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गुंतवणूक म्हणून सोने घ्यायचे की नाही, हा मोठाच पेच सध्या निर्माण झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करायचा तर सोने अजिबात बाळगू नये, अशी आजची परिस्थिती आहे. स्वत: चा विचार केला तर गुंतवणूक म्हणून सोन्याला गेली काही वर्षे चांगला परतावा मिळाला आहे. शिवाय आम्हा भारतीयांची सोन्यात भावनिक गुंतवणूक आहे ती वेगळीच. सोन्याच्या आयातीसाठी खर्च कराव्या लागणा-या परकीय चलनामुळे सरकार जेरीस आले आहे.

म्हणूनच परवा सरकारने सोन्याच्या व्यवहारात हितसंबंध असणा-यांचा विरोध डावलून सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. आयात-निर्यात व्यापारातील तूट वाढत चालल्याने डॉलर जास्त खर्च होताहेत. म्हणजे आमच्या देशाच्या तिजोरीतील परकीय चलनाच्या साठ्याला गळती लागली आहे. दररोज हजारो मोटारी रस्त्यावर येत आहेत आणि देशाचे तेलावरील बजेट वाढतच चालले आहे. त्यासाठी डॉलर मोजणे तर भागच आहे. परकीय कर्जाचे हप्ते चुकवलेच पाहिजेत. त्यासाठी डॉलरच लागतो. आधुनिक तंत्रज्ञान विकसित देशांकडून डॉलरमध्येच घ्यावे लागते. सोन्याचे उत्पादन देशात होत नाही. मात्र, त्याला इतकी मागणी आहे की, त्यावर डॉलर खर्च करण्याशिवाय पर्याय नाही. मग देशाने करायचे तरी काय? त्यातच जर्मनी आपले अमेरिकेत ठेवलेले सोने मायदेशी परत मागवत असल्याने सोन्याचे भाव भडकतील, अशी आणि नोटा छापण्यासाठी तेवढ्या किमतीचे सोने मध्यवर्ती बँकांत ठेवण्याचा नियम (गोल्ड स्टँडर्ड) जगात पुन्हा लावण्याची वेळ येते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेने गोल्ड स्टँडर्ड बंद केल्यापासून (1९७1) जगाने भरपूर नोटा छापून सर्व मानवी व्यवहारांचे पैशीकरण करून टाकले आहे. या पेचप्रसंगातून जग कसे बाहेर पडणार, हे आज कोणीच सांगू शकत नाही. मात्र, पैशीकरणाने जगात आज मुजोर नागरिकांची फौज वाढवली आहे एवढे खरे. भारतातल्या नवश्रीमंतांमध्ये तर ही बकाल श्रीमंती दाखवण्याची स्पर्धा लागली आहे. देशातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून निष्कर्ष एकच निघतो, तो म्हणजे भारताला आपला प्राधान्यक्रम ठरवावाच लागेल. दररोज अशा काही विसंगती समोर येत आहे की, त्यांच्यासह जगणे देशावर प्रेम करणा-या ख-या भारतीय नागरिकाला कठीण व्हावे. कोणाच्या देशभक्तीची कसोटी घेण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला नाही, पण म्हणून संपत्ती प्रदशर्नाची ही स्पर्धा उघड्या डोळ्याने पाहत बसावी हेही न पटणारे आहे. भारतीय लोकशाहीने आपल्याला पाहिजे तेवढी संपत्ती बाळगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वाढत चाललेले संपत्तीचे निर्लज्ज प्रदर्शन बेकायदेशीर ठरत नाही हे मान्य, पण भुकेल्या माणसांना वाकुल्या दाखवत त्याच पंक्तीत पंचपक्वान्नाचे ताट घेऊन मी माझ्या बापाचे किंवा माझे खातो, ही मुजोरी माणुसकीच्या राज्यात निर्लज्ज कृती ठरते. अशा निर्लज्ज कृतींचे देशात पेव फुटले आहे.

सोन्याचे कपडे (विणणे) शिवणे, (पुण्यात एकाने गेल्या महिन्यात असा एक शर्ट विणला आहे, ज्याची किंमत 1.2७ कोटी आहे), अंगावर सोन्याचे दागिने घालून फलकावर मिरवणे, लग्नकार्यात वारेमाप खर्च करणे, लाड म्हणून मुलांच्या हातात वाटेल तेवढा पैसा आणि वस्तू देणे, हॉटेलमध्ये खूप अन्न ताटात घेऊन ते वाया घालवणे, आम्ही कर भरतो, असे म्हणून पाण्याची आणि विजेची नासाडी करणे, गरज नसताना महागडे पेट्रोल उडवणा-या गाड्या पळवणे, संपत्तीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी करणे, समाजाकडे पाठ फिरवून व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक करणे या आणि यासारख्या अनेक कृती आपल्या देशासाठी आज निर्लज्ज कृती आहेत. पैशीकरणामुळे त्या करण्याची आपल्या समाजात जणू स्पर्धाच लागली आहे. एकीकडे देशप्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या आणि दुसरीकडे ज्या बहुजनांच्या जगण्यातून हा देश बनला आहे त्यांच्या जगण्याला कवडीमोल ठरवायचे, असा हा दुटप्पीपणा आहे. याच्या मुळाशी सत्ता-संपत्तीची जी मुजोरी आहे ती ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे. कसे जगावे, हे जगाला सांगणारे तत्त्वज्ञान भले या देशाने दिले असेल.

आज मात्र त्या तत्त्वज्ञानाचा आपल्याच देशात पराभव पाहायला मिळतो आहे. राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा उच्चार आज अतिशय क्षीण झाला आहे. सत्ता-संपत्तीच्या मुजोरीने जणू देशाला वेठीस धरले आहे. या मगरमिठीतून सुटण्याचा काही मार्ग आहे काय?
एक मार्ग आहे. देशाकडे येणा-या आणि देशातील नागरिकांनी कष्ट करून तिजोरीत भरलेल्या पैशांचे व्यवस्थापन. ज्या पैशारूपी विषारी सापाने हा डंख मारला आहे त्याच विषाचा वापर करून त्यावरची लस तयार करण्याशिवाय आता पर्याय नाही. ज्याच्याअभावी आणि ज्याच्या अतिरेकाने देशाची मानसिकता बकाल करून ठेवली आहे त्या पैशाचे पारदर्र्शी व्यवस्थापन. ज्या पैशांनी आमची नाती, आमचे कौटुंबिक संबंध, आमची गावे, आमची शेती, आमचे धर्मपंथ, आमची संस्कृती आणि आमचे भावविश्वही हिसकावून घेतले आहे, त्या पैशांचे पारदर्र्शी व्यवस्थापन. भारतीय समूहांच्या म्हणजे आपल्याच वृत्तीविषयीची सभा-समारंभांमध्ये चाललेली पोपटपंची त्यासाठी बंद करावी लागेल आणि माणूस दोषी नसून व्यवस्था दोषी आहे... म्हणून तिच्याविषयी आणि तिच्यात करावयाचा बदल किंवा दुरुस्तीविषयी बोला, असे साहित्यिक, विचारवंतांनाही बजवावे लागेल. एकेकाळी देशाकडे पैसाच कमी होता. आज मात्र देशाकडे प्रचंड पैसा म्हणजे त्या प्रमाणात संपत्तीही आहे. पण ती नेमकी कशासाठी वापरली जाते आहे, असे मुळातले प्रश्न त्यासाठी त्यांना आणि राजकीय, सामाजिक नेतृत्व करणा-या नेत्यांना विचारावे लागणार आहेत. सत्ता-संपत्तीचे प्रदर्शन करण्याचा निर्लज्जपणा करण्यातच आमच्यातले काही धन्यता मानतात. कारण त्यापलीकडे त्यांना आज काही दिसत नाही. त्यांना ग्लानी आली आहे. मात्र, जेव्हा स्वत:तील आणि देशातील ही विसंगती त्यांच्यासमोर राक्षस म्हणून उभी राहील आणि आज बळी जाण्याची पाळी तुझी आहे, असे परिस्थितीच त्याला बजावेल तेव्हा फार उशीर झालेला असेल.

ymalkar@gmail.com