आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन मंत्र्यांचा तमाशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शरद पवार यांनी यंदा महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांतील सर्वाधिक भीषण दुष्काळ पडल्याचे नुकतेच सांगितले. त्यासाठी राज्य शासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या. मात्र, राज्यकारभार पाहणारे त्यांचे मंत्री दुष्काळाबाबत फारसे गंभीर नसल्याचेच दिसून येते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच अचानक सांगली जिल्ह्याचा (खासगी कार्यक्रमात सरकारी) दौरा केला. या दौ-याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने स्वाभाविकच दुष्काळी पाहणीसाठी सर्वांना त्याचे निमंत्रण नव्हते. मात्र, पालकमंत्री पतंगराव कदम यांनी हा दौरा घडवून आणला.

त्यामुळे काँग्रेसमधील त्यांचे विरोधक केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी जत येथे त्यांच्या कार्यकर्त्याच्या तोंडून मुख्यमंत्र्यांसमोर थयथयाट केला. ‘सिंचन योजनांना केंद्राकडून निधी मी आणला आणि पाणी आल्यावर आम्हाला न बोलावता पाणी पूजन करून त्याचे श्रेय दुसरेच घेतात,’ अशी त्यांची तक्रार होती. याच दौ-यात पतंगराव कदम यांनी जाहीर सभेत टेंभू योजनेच्या निधीची फाइल अर्थमंत्रालयात (मध्यंतरी जयंत पाटील अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांचा रोख जयंत पाटलांकडे होता) अडकली असल्याची टीका केली. यावरून दोघांत स्टेजवरूनच जुगलबंदी झाली. यामुळे दुष्काळाचे गांभीर्य जाऊन त्याला ‘सवाल-जवाबा’चे स्वरूप आले. निधीचा निकाल लागलाच नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मतदारसंघात म्हैसाळ योजनेचे पाणी कालवे फोडून पळवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे तहानलेल्या जत तालुक्यापर्यंत हे पाणी पोहोचतच नाही. तरीही पाटबंधारे विभाग आणि पोलिसांचे हात बांधल्याने ते काहीच करू शकत नाहीत. एकूण काय, तिकडे जनता दुष्काळात होरपळत असताना या मंत्र्यांना मात्र श्रेयाचे राजकारण आणि कोणत्याही कार्यक्रमात
एकमेकांची उणीदुणी काढून लोकांची करमणूक करण्यातच धन्यता वाटते.