आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Year old Mariam Kousar In Coma News In Marathi

तीन वर्षांची मरियम अडीच महिन्यांपासून कोमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बशिरा बानोच्या पापण्या हल्ली लवतच नाहीत. चोवीस तास डोळे सताड उघडे... अंथरुणावर निजलेल्या मुलीकडे एकटक पाहतात. हाताच्या मुठी उघडून त्यात तिचा आवडता रंगीत बॉल ठेवण्याचा प्रयत्न करते. बशिराला वाटते, आत्ता काही क्षणांत ती उठून बसेल आणि खेळू लागेल. याच आशेवर अडीच महिने गेले. तीन वर्षांच्या मरियम कौसरचा फक्त श्वासोच्छ्वास सुरू आहे. बशिरा सांगते, ‘ती कधी डोळे उघडते... शून्यात पाहते. काहीच ओळखत नाही. जणू एखाद्या अनोळखी जगात असावी..’

बंगळुरू येथील जयनगर परिसरातील मणिपाल रुग्णालयातील तिसर्‍या मजल्यावरील खोलीत भयाण शांतता असते. मरियम कोमात आहे. 13 डिसेंबरला तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. शस्त्रक्रियेसाठी बेशुद्धीचे औषध दिले होते. तेव्हापासून ती तशीच अंथरुणावर झोपलेली आहे. कोमात. आता तिच्या उशाशी कुराण ठेवले आहे. मरियमने डोळे बंद करताच बशिरा कुराण उचलते. घरातील लोकांचा प्रत्येक दिवस एकाच आशेवर उगवतो. आज तरी तिला शुद्ध येईल. लवकरच ती शाळेत जाऊ लागेल.

मरियमचे वडील मुदस्सीर आणि आई बशिरासह आजोबा मुनव्वर आणि आजी शमीमुन्नीसा आळीपाळीने रुग्णालयात बसतात. इच्छा नसताना बशिरा दररोज संध्याकाळी रुग्णालयातून बाहेर पडते आणि मरियमची लहान बहीण हन्नाच्या देखभालीसाठी घरी जाते. घरी जाताच मरियमच्याच वयाची भाची एकच प्रश्न विचारते, ‘आजही मरियमला का आणले नाही?’ काही मदत आणि कर्ज घेऊन आतापर्यंत सहा लाख रुपयांहून जास्त खर्च झाला आहे.

...नंतर ती शुद्धीवर आलीच नाही
13 डिसेंबरला मरियम खेळताना पायर्‍यांवरून पडली होती. डाव्या हाताला जखम झाली होती. हाताच्या कोपर्‍याला सूज आली होती. एक्स-रे काढल्यावर तेथील हाड सरकल्याचे निदान झाले. तत्काळ संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉमा अँड ऑर्थोपेडिक्स (एसजीआयटीओ) मध्ये नेले. शनिवार आणि रविवारी डॉक्टर नव्हते. 16 डिसेंबरला आसीयूमध्ये फक्त 10 मिनिटांच्या ऑपरेशनसाठी नेले. पण त्यानंतर ती शुद्धीवर आलीच नाही. डॉक्टर म्हणतात, अ‍ॅनेस्थेशियाचा प्रभाव आहे. लहान मुलांवर जास्त टिकतो. 48 तासही लागतात. मुदस्सीर सांगतात, ‘तिला झटके येत होते, त्यामुळे पुढील उपचारासाठी 18 डिसेंबरला इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवले. तेथे व्हेंटिलेटर नव्हते. तोपर्यंत मरियम कोमात गेली होती.’ वैद्यकीय अहवालानुसार, ऑक्सिजनची कमतरता किंवा अ‍ॅनेस्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे मरियमच्या मेंदूला इजा झाली. त्यात एसजीआयटीओ संस्थेतील डॉक्टरांची बेपर्वाई उघड झाली आहे. परिणामी दोषी दोन डॉक्टरांना बडतर्फ आणि दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले.