आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रस्थानी वाचक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दै निक दिव्य मराठीच्या महाराष्ट्रातील पदार्पणाला आज सहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने वाचकांना अभिवादन करणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे. ‘केंद्रस्थानी वाचक’ हे भास्कर वृत्तपत्र समूहाचे ब्रीदवाक्य. या ब्रीदवाक्यावर अटळ श्रद्धा व या श्रद्धेला अथक मेहनतीची जोड यामुळे भास्कर समूह आज १४ राज्ये व ६८ आवृत्त्यांसह देशातील सर्वाधिक खपाचे दैनिक झाले आहे. देशातील प्रथम क्रमांकासह जगातील अग्रगण्य दैनिकांत भास्कर चौथ्या स्थानावर असून लवकरच तिसरे वा दुसरे स्थान हस्तगत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. भास्कर समूहाचे धाकटे भावंड असलेले दैनिक दिव्य मराठीही थोड्याच काळात काही लाखांच्या घरात सहज पोहोचले. औरंगाबादसह सात शहरांमधील सर्व थरांतील वाचकांचा उदार आश्रय दैनिक दिव्य मराठीला मिळाला. वाचकांचे आमच्यावरील हे ऋण मोठे आहे. 

केंद्रस्थानी वाचक हे ब्रीद ठसवणारे भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल यांचे या वर्षी आकस्मिक निधन झाले. दिव्य मराठीवर त्यांचा लोभ होता. भास्कर समूहासाठी हा धक्का मोठा आहे. संस्थेची बांधणी ही फक्त सोयी-सुविधांतून होत नसते. संस्था मजबुतीने उभी राहण्यासाठी त्यामध्ये जीवनदृष्टीचा समर्थ खांब उभा करावा लागतो. ही जीवनदृष्टी फक्त वैचारिक वा पुस्तकी असून भागत नाही. त्याला व्यावसायिकतेची जोड द्यावी लागते. रमेशचंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वात ही जोड व्यवस्थित बसली होती. पत्रकारिता जिवंत व निःपक्षपाती असली पाहिजे याबाबत ते अतिशय आग्रही होते. मात्र निःपक्षपाती राहताना व्यावसायिक मूल्यांकडे दुर्लक्ष करणे त्यांना मान्य नव्हते. वर्तमानपत्रातील मजकुराचा दर्जा वाढवत नेण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला, त्याचबरोबर आर्थिक शिस्तीकडेही बारकाईने लक्ष दिले. यामुळेच वाचकांना किफायतशीर किमतीत दर्जेदार मजकूर देण्याबरोबरच दैनिक दिव्य मराठीचा आर्थिक पायाही गेल्या सहा वर्षांत सुस्थिर झाला.  
 
‘केंद्रस्थानी वाचक’ म्हणजे वाचकांचा अनुनय नव्हे, समाजातील दोषांवर पांघरूण घालणे नव्हे. त्याचबरोबर शहाणपणाचा मत्ता दिल्याचा शिष्टपणा मिरवीत प्रत्येक घटनेवर तिरकस शेरेबाजी करीत समाजाला टोमणे मारीत बसणेही नव्हे. केंद्रस्थानी वाचक म्हणजे वाचकांच्या भूमिकाही समजून घेणे, त्यातील अधिकन्यून समंजस सहानुभूतीने त्यांच्या लक्षात आणून देणे, त्यांच्या गरजा लक्षात घेणे. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती देऊन वाचकांची निर्णयक्षमता वाढवीत नेणे. निर्णयक्षमतेचे कौशल्य ही आजच्या जीवनाची निकड झाली आहे. सोशल मीडिया, टीव्हीसह अनेक माध्यमांतून माहितीचा महापूर येत असला तरी या महापुरामुळेच वाचकाची निर्णयक्षमता कमी होत चालली आहे. माहितीच्या द्रोणागिरीतून वस्तुनिष्ठ माहितीची संजीवनी वाचकांसाठी आवश्यक ठरली आहे. अशी संजीवनी मिळाली तर तो योग्य निर्णय घेऊ शकतो. हा निर्णय त्याच्या व्यक्तिगत आयुष्यापासून राजकीय नेत्याच्या निवडीपर्यंत सर्व थरांवरील असतो. स्वतंत्र विचार करून निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येक नागरिकामध्ये जितकी वाढत जाईल, तितके त्याचे व्यक्तिगत जीवन कार्यक्षम होईल. कार्यक्षम नागरिकच कार्यक्षम लोकशाही निर्माण करू शकतो. केंद्रस्थानी वाचक यामागची दैनिक दिव्य मराठीची भूमिका अशी असल्याने प्रसंगी माध्यमांतील लोकप्रिय बातम्यांच्याही विरोधात जाण्याचे धाडस दिव्य मराठी सहज करू शकतो. 

वाचकांना केंद्रस्थानी ठेवून वस्तुनिष्ठ माहिती देताना परंपरा व नावीन्य यांचा मेळ घालणे हे ‘भास्कर’चे दुसरे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपण्यासाठी वृत्तसंकलनात विविध प्रयोग आम्ही करीत असतो. फडणवीस सरकारच्या कारभाराचे बारा हजार शासकीय निर्णयांतून परीक्षण, महापौरांच्या कार्यकाळाचे ठराव आणि इतिवृत्ताच्या आधारे मूल्यमापन, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना शहरातील खड्ड्यांचे शल्य वाटावे यासाठी एक दिवस शहराचे ‘खड्ड्यांचे शहर’ असे केलेले नामाभिधान, असे अनेक प्रयोग आम्ही केले व ते वाचकांच्या पसंतीसही उतरले. नवीन प्रयोग करण्यास प्रिंट मीडियात जितका वाव असतो तितका अन्य ठिकाणी नसतो. सध्याचे युग हे डिजिटल पत्रकारितेचे असले तरी मुद्रिताचे महत्त्व कमी झाले नसून प्रिंटची वाचकसंख्या वेगाने वाढते आहे. दिव्य मराठी हे त्याचे उत्तम उदाहरण. अर्थव्यवस्था गतिमान नसूनही गेल्या सहा वर्षांत दिव्य मराठीला मिळणारा वाचकांचा आश्रय वाढता राहिला. ‘केंद्रस्थानी वाचक’ व वृत्तसंकलनातील नावीन्य या ‘भास्कर’च्या धोरणाप्रमाणेच मुद्रित वृत्तपत्रावरील वाचकांच्या वाढत्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घेणे हे आव्हान असून वस्तुनिष्ठ पत्रकारितेवरील निष्ठेमुळे हे आव्हान पेलणे आम्हाला कठीण वाटत नाही. 
 
आज सहाव्या वर्धापनदिनी रमेशचंद्रजी आमच्यात नाहीत याची सल मोठी आहे. दिव्य मराठी उत्सव व वाचकांचा उदंड प्रतिसाद असणारा पानसुपारीचा कार्यक्रम साजरा करण्याच्या मन:स्थितीत यामुळेच आम्ही नाही. मात्र रमेशचंद्रजींच्या जीवनदृष्टीचा भक्कम आधार “दिव्य मराठी’च्या पाठीशी आहे. त्या आधारावर वाचकसंख्येबरोबरच वाचकांची निष्ठा अधिकाधिक दृढ करीत राहण्याचा संकल्प आम्ही करतो. वाचकांच्या स्नेहाबरोबरच जाहिरातदारांचा उदंड पाठिंबा असल्यामुळे असे संकल्प करण्याचा आत्मविश्वास टीम दिव्य मराठीमध्ये निर्माण झाला आहे. असा स्नेह देणारे वाचक व जाहिरातदार यांचे टीम दिव्य मराठीतर्फे मनःपूर्वक आभार. 
बातम्या आणखी आहेत...