आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांचा ओढा ऑनलाइन पोर्टल्सकडे वाढतोय : अमलेंदू पुरंदरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हॉटमेल’चे सहसंस्थापक साबीर भाटिया यांनी ऑक्टोबर 2006 मध्ये ‘आरझू डॉट कॉम’ ही पर्यटनासाठी खास वेबसाइट भारतात सुरू केली. गेल्या काही वर्षांत पर्यटकांचाही भारतात येण्याचा ओढा वाढला आहे. यामुळे ऑनलाइन पोर्टल्सला चांगले दिवस आले आहेत. ‘आरझू डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमलेंदू पुरंदरे यांच्याशी याबाबत केलेली ही चर्चा.

लोकांचा आता ऑनलाइन पोर्टलद्वारे पर्यटनाची बुकिंग करण्याचा कल वाढत चालला आहे. ‘आरझू डॉट कॉम’च्या स्थापनेनंतर आपण गेल्या सात वर्षांत कोणते महत्त्वाचे बदल झाले?
‘आरझू डॉट कॉम’ची स्थापना झाल्यापासून गेल्या सात वर्षांत आम्ही खूप बदल पाहिले. सुरुवातीचा काळ आमच्यासाठी फार कसोटीचा ठरला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या वेळी इंटरनेट असले तरी त्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. ब्रॉडब्रँड व वायफाय आल्यावर तसेच मोबाइलमध्ये इंटरनेट उपलब्ध झाल्यावर इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. याचा परिणाम असा झाला की, लोकांचा कल ऑनलाइन खरेदी करण्याकडे वाढू लागला. परंतु पर्यटनाला जाण्यासाठी एखादी सहल बुक करायची असेल तर अनेक जण ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात जाऊन सहलीवर चर्चा करून मग बुक करीत असत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. प्रामुख्याने तरुण पर्यटक ऑनलाइन बुकिंगचा पर्याय स्वीकारतात.

आपणाकडे ऑनलाइन बुकिंगचा नेमका फायदा कोणता आहे ?
ऑनलाइन बुकिंगचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांचा वेळ यात वाचतो. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात लोकांच्या वेळेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक वेळी तिकीट किंवा सहल बुक करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटच्या कार्यालयात जाणे शक्य नसते. ऑनलाइन बुकिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणत्याही वेळी रात्री-अपरात्री तुम्ही हे बुकिंग करू शकता. तसेच आम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांच्या ग्रुपच्या संख्येनुसार बुकिंग करून देतो. म्हणजे एखादे पाच-दहा जणांचे कुटुंब असेल किंवा तीन-चार मित्रांच्या कुटुंबांचा गट असेल, आम्ही त्यांना त्यांच्या गरजेनुसार बुकिंग करून देतो. हल्ली अनेकांना आपला लहान गट घेऊन सहलीला जाणे आवडते. उगाच 50-100 जणांच्या घोळक्यात जाणे आवडत नाही. या अशा पर्यायांमुळे आमच्याकडे ग्राहक वाढत आहेत. एक उदाहरण द्यायचे झाल्यास आम्ही मध्यंतरी एका महिलांच्या ग्रुपला दुबईत फक्त शॉपिंग करण्यासाठी जायचे होते. त्यांना पर्यटन करायचे नव्हते. आम्ही त्यांच्या या गरजेनुसार बुकिंग करून दिले. आम्ही काही नवीन पर्यटनांच्या जागा पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरातल्या लोकांना दोन दिवसांत एखादी छोटी सहल शनिवार-रविवारी करता यावी यासाठी आम्ही अनेक नवीन स्थळे शोधली आहेत. पर्यटकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो.

तुमच्याकडे देशातील तसेच विदेशी पर्यटकांचीही बुकिंग होते?
आमच्याकडे येणाºया एकूण पर्यटकांपैकी सुमारे 15 टक्के पर्यटक विदेशी असतात. विदेशी पर्यटक हे प्रामुख्याने अमेरिका व ब्रिटनहून मोठ्या संख्येने येतात. ब्रिटनमधील पर्यटक हे भारतातील आपले जुने ऋणानुबंध जपण्यासाठी येतात. त्यातील पर्यटकांचे आजोबा हे भारतात ब्रिटिशांच्या नोकरीत होते आणि त्यांनी इथे त्यानिमित्ताने काहीना काही कामे केलेली असतात.

पर्यटनाच्या ऑनलाइन पोर्टल्सचे भवितव्य तुम्हाला कसे वाटते?
पुढचा जमाना हा ऑनलाइन पोर्टल्सचाच आहे. गेल्या पाच वर्षांत पर्यटनातील पोर्टल्स सुरू करण्यात अनेकांनी पुढाकार घेतला. मात्र, काही कालावधीने त्यांना आपले दुकान बंद तरी करावे लागले किंवा अन्य पोर्टलमध्ये विलीन व्हावे लागले. मात्र, विदेशी कंपन्यांनी सुरू केलेल्या पोर्टल्स मात्र चांगल्या स्थितीत आहेत. आता आघाडीच्या पाच पोर्टल्स शिल्लक राहिल्या आहेत. आता पुढील टप्प्यात या कंपन्या आपल्या समभागांची खुली विक्री करतील. आमच्या आरझूने देशभरात सुमारे 200 फ्रँचायझी दिल्या आहेत. आमची ही संकल्पना चांगलीच रुजली आहे. या माध्यमातून आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकतो.
मुलाखत : प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com