आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प प्रशासनात घराणेशाहीचा वरचष्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९७२ मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या ‘द कँडिडेट’ या चित्रपटाच्या अखेरीस नायक सिनेटमध्ये आपण निवडून आल्याबद्दल आश्चर्यचकित होऊन निवडणुकीच्या प्रचारप्रमुखाला विचारतो, ‘आता मी काय करू?’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सरकारी यंत्रणेमध्ये जे भावी बदल करणार आहेत त्यासाठी जुळवाजुळव करताना त्यांचा अाविर्भाव कँडिडेटच्या नायकासारखाच आहे.
अमेरिकेतील ४० लाख सरकारी कर्मचारी असलेल्या यंत्रणेला नियंत्रणात ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांना बरेच सायास पडणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना अापला कारभार हाकण्यासाठी सुमारे चार हजारहून अधिक लोकांची भरती करावी लागणार आहे. त्यातील हजार लोकांच्या नियुक्त्यांसाठी सिनेटची मंजुरी मिळविणे अनिवार्य आहे. डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. तोवर या सर्व नियुक्त्या होणे गरजेचे आहे. त्यासाठी ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. २०१२च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागलेल्या मिट रोमनी यांनी एजन्सी रिव्ह्यू टीमसहित ७०० पदांच्या नियुक्त्यांसाठी रिपब्लिकन पक्षाला जवळची असणारी माणसे हेरून ठेवली आहेत.
ट्रम्प यांनी ११ नोव्हेंबर रोजी ट्रांझिशन टीमचे प्रमुख क्रिस क्रिस्टच्या जागी माइक पेन्स यांची नियुक्ती केली. सत्ता हस्तांतरणासाठी पेन्स यांनी काही सल्लागारांचा एक नवा चमूही तयार केला. त्यामध्ये ट्रम्प यांचे तीन पुत्र व जावयाचा समावेश आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणूक लढविताना जी प्रचारमोहीम राबविली त्यातील अनेक मुद्द्यांवर रिपब्लिकन पक्षातील काही नेत्यांनी आक्षेप घेतले होते. त्यातून आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधणारी वक्तव्येही ट्रम्प यांच्याकडून केली गेली. पण आता या चुका सुधारण्यात येत आहेत. पेन्स हे रिपब्लिकन पक्षातील अनेक नेत्यांच्या विश्वासातले आहेत. त्यामुळे विविध पदांवर योग्य माणसांच्या नियुक्त्या करण्यासाठी त्यांच्या हाती काही वेळ निश्चित आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी देशोदेशीची सरकारे संपर्क साधण्यासाठी उत्सुक आहेत. मॅनहटन येथील ट्रम्प टॉवरमधील टेलिफोन अॉपरेटर सध्या या संपर्कव्यवस्थेत गुंतलेले आहेत. ट्रम्प हे त्यांचे कुटुंबीय आणि सहायक कर्मचारी यांच्या सोबतीने या कामांचा निपटारा करीत आहेत. देशोदेशांतील महत्त्वाच्या व्यक्ती ट्रम्प यांच्याशी संवाद साधत आहेत. ‘कॅबिनेट व अन्य पदांवर कोणाची नियुक्ती करायची याबद्दलची प्रक्रिया सुरू केली असून त्याबद्दलच्या अंतिम निर्णयाची माहिती माझ्याव्यतिरिक्त खूपच कमी लोकांना असेल,’ असे ट्विट ट्रम्प यांनी नुकतेच केले होते.
ट्रम्प यांनी आपल्या कॅबिनेट तसेच प्रशासनात करावयाच्या नियुक्त्यांची प्रक्रिया अगदीच धिम्या गतीने पुढे सरकते आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेचे माजी प्रमुख स्टीव्ह बेनन यांना मुख्य सल्लागार तसेच रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे अध्यक्ष राइन्स प्रिबस यांना चीफ ऑफ स्टाफ या पदावर नियुक्त केले आहे. बेनन हे एका न्यूज वेबसाइटचे प्रमुख होते. ही वेबसाइट आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या बातम्या देण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. प्रिबस यांची नियुक्ती करताना ट्रम्प यांनी धोरणीपणा दाखविला आहे. निर्वासितांपैकी फक्त २० ते ३० लाख लोकांनाच अमेरिकेबाहेर हाकलणार, असे ट्रम्प म्हणत आहेत. मेक्सिकोच्या सीमेवर कुंपणभिंत उभारण्याचा विचारही ट्रम्प यांनी आता मनातून काढून टाकला आहे. मात्र या सीमेवर काही ठिकाणी काटेरी कुंपण ते जरूर उभारणार आहेत. ट्रम्प यांनी प्रचारामध्ये जी आश्वासने दिली, गर्जना केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना त्यांची काही वेळेला अडचण होणार आहे. काही गोष्टी त्यांना सोडून द्याव्या लागणार आहेत. ट्रम्प यांची अध्यक्षीय कारकीर्द नेमकी कशी असेल याची जगभर उत्सुकता आहेच.
मुले-सुना हाकणार कारभार?
ट्रम्प यांनी आपले तीन पुत्र व एका सुनेला सत्ता हस्तांतरणाशी संबंधित समितीत घेतल्यामुळे अमेरिकेत काहीशी नाराजी आहे. या नातेवाइकांना ट्रम्प नवीन प्रशासकीय यंत्रणेत नेमकी कोणती कामे सोपविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खासगी व सार्वजनिक हितांची या नातेवाईक मंडळींनी गल्लत करू नये व त्यातून काही घोटाळे होऊ नयेत यासाठी ट्रम्प यांना दक्ष राहावे लागणार आहे. ट्रम्प यांची मुले त्यांचा उद्योग-व्यवसाय सांभाळत आहेत. मात्र ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नावाचा गैरवापर त्यांच्या नातेवाइकांनी करू नये म्हणून माध्यमेही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. ट्रम्प यांच्या कंपन्यांबरोबर देशोदेशीच्या लोकांनी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने चाचपणी करायला सुरुवात केली आहे. या माध्यमातून ट्रम्प यांच्याशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. नव्या प्रशासनात ट्रम्प यांनी आपल्या नातेवाइकांना स्थान दिल्याने अमेरिकेचा कारभार आता हीच मंडळी चालविणार का? असेही कुत्सितपणे ट्रम्प यांचे विरोधक विचारू लागले आहेत.
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
बातम्या आणखी आहेत...