आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स, निफ्टीचा सर्किट ब्रेकर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेन्सेक्स व निफ्टीसाठी सर्किट ब्रेकर्स लावण्याचे नियम असे आहेत : जर दुपारी एकच्या पूर्वी सेन्सेक्स किंवा निफ्टी आधीच्या दिवसाच्या बंद भावापेक्षा (क्लोझिंगपेक्षा) 10 % वर गेले किंवा खाली आले तर व्यवहार 45 मिनिटांसाठी स्थगित केले जातात. यात सेन्सेक्स किंवा निफ्टी यापैकी कोणीही ही मर्यादा प्रथम गाठली की बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज दोन्ही एक्स्चेंजवरील व्यवहार स्थगित केले जातात. 45 मिनिटानंतर 15 मिनिटाचे कॉल आॅक्शन सेशन केले जाते व त्यानुसार निर्णय घेतला जातो. तसेच एक ते दोनच्या दरम्यान सेन्सेक्स किंवा निफ्टी 15 % वर गेले किंवा खाली आले तर व्यवहार 45 मिनिटांसाठी स्थगित केले जातात. जर ते दिवसात कधीही 20 % वर गेले किंवा खाली आले तर व्यवहार उरलेल्या पूर्ण दिवसासाठी स्थगित केले जातात.

दोन परस्परविरोधी उदाहरणे : 2004 मध्ये कॉँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्याने सत्तेवर आले. कॉम्रेड बर्धन यांनी त्या वेळेस उद्गार काढले ‘भाड में जाए डिसइन्व्हेस्टमेंट’. शेअरमार्केटमधील बड्या वित्तसंस्था, परदेशी वित्तसंस्था, गुंतवणूकदार यांनी आता आर्थिक धोरणे बदलली जातील, असा याचा अर्थ लावला व जोरदार विक्रीचा मारा सुरू केला. 17 मे 2004 ला मार्कटमधील व्यवहार त्या दिवशी दोनवेळा स्थगित करावे लागले. सेन्सेक्स सुमारे 800 अंकानी खाली आला. शेवटी मनमोहनसिंग यांनी धोरणात बदल होणार नाही, वगैरे खुलासा केल्यावर, तसेच एलआयसी इत्यादी सरकारी वित्तसंस्थांनी खरेदी सुरू केल्यामुळे तो वर आला व बंद होते वेळी 565 अंकानी खाली येऊन 4,505 या पातळीवर बंद झाला. विचार केला तर बर्धन यांनी डाव्यांचा एक नित्याचा विरोध बोलून दाखवला होता. त्यात नवे काही नव्हते किंवा धोरणात बदल होणार आहेत, असे काही त्यांनी जाहीर केले नव्हते. अनावश्यक व फार टोकाची प्रतिक्रिया मार्केटने दाखवली. म्हणूनच दुसºया दिवशी 18 मे 2004ला मात्र खरेदी सुरू झाली व 565अंकाचा तोटा थोडाफार भरून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यादिवशी सेन्सेक्स 372 अंकांनी वर म्हणजे 4877 ला बंद झाला. तसेच 17 मे 2004 ला जी मोठी घसरण झाली होती. दुसरे विरुद्ध उदाहरण म्हणजे हेच कॉँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार 2009 मध्ये पुन्हा चांगल्या मताधिक्याने सत्तेवर आले तेव्हा मार्केटने जणू दिवाळी साजरी केली. इतकी प्रचंड खरेदी झाली की सेन्सेक्स सरळ 10.73 टक्क्यांनी वर गेला व व्यवहार स्थगित करावे लागले. दोन तासांनंतर मार्केट पुन्हा सुरू झाले तेव्हा सेन्सेक्सने अप्पर सर्किट गाठल्याने पूर्ण दिवसाकरिता व्यवहार स्थगित करावे लागले. याआधी काहीवेळा लोअर सर्किट गाठल्याने मार्केट बंद करावे लागले होते.

उतार-चढावाचा गैरफायदा घेऊ नये : शेअर मार्केट खाली जाणार, वर येणार हे अपेक्षितच आहे, नव्हे आवश्यक आहे, नाही तर त्यात खरेदी कोण करणार आणि विक्री कोण करणार? पण एका दिवसात त्यात किती चढ-उतार असावेत यासाठी मर्यादा असणेही किती आवश्यक आहे, हे वरील दोन उदाहरणांवरून स्पष्ट होईल. एखाद्या घटनेमुळे मार्केट खाली येते किंवा वर जाते, पण त्याचबरोबर काही लोक संगनमत करून ते खाली आणून स्वत:चा गैरवाजवी फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यावर नियंत्रण म्हणूनही सर्किट ब्रेकर्स आवश्यक आहेत.

प्रासंगिक घटनेचा अर्थव्यवस्थेशी दुरून संबंध : या प्रासंगिक घटना आहेत आणि त्यांचा अर्थव्यवथेशी थेट संबंध नाही. दुरून संबंध नक्कीच आहे. अशा घटनांमुळे मार्केट खाली आले तर सहसा ती खरेदी संधी असते. फक्त त्यासाठी प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धैर्य हवे आणि अर्थातच पैसे हवेत. मात्र आर्थिक कारणांमुळे, अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणाºया कारणांमुळे मार्केट खाली आले तर घाईने खरेदी करण्याची आवश्यकता नाही. जानेवारी 2008 मध्ये अमेरिकेतील सबप्राइमचा फुगा फुटला, जगभर आर्थिक मंदीचा काळ सुरू झाला. 22 जानेवारी 2008ला मार्केट इतके खाली आले की लोअर सर्किट गाठल्याने व्यवहार स्थगित करावे लागले. पण नंतर चढ-उतार होत राहिले, मंदीचीच स्थिती राहिली व 20 नोव्हेंबर 2008 ला सेन्सेक्स 8451 ह्या 2008 या वर्षाच्या नीचांकापर्यंत घसरला. म्हणजेच 22 जानेवारी 2008ला मार्केट खूप खाली आल्यानंतर जरी खरेदी केली असती तरी नुकसानच सहन करावे लागले असते. केवळ अप्पर किंवा लोअर सर्किट गाठले जाण्याची वाट न बघता मार्केट जर खूप खाली आले किंवा खूप वर गेले तर त्यामागे अर्थव्यवस्थेशी निगडित नसलेली एखादी प्रासंगिक घटना आहे की थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाºया काही बाबी आहेत, यापुढील वाटचाल कशी राहील याचा विचार करून आपण खरेदी-विक्रीचा विचार केला, तर आपल्याला लाभ मिळू शकतो.
(kuluday@rediffmail.com)