आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udayanraje Bhosale Issue At Satara Sangli Kolhapur

‘राजें’भोवती फिरणारे राजकारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीत असूनही उदयनराजेंनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्त्व कायम राखले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याला खासगीत अवघड जागचे दुखणे म्हणतात. सहनही होत नाही, सांगताही येत नाही. ‘महायुती’ही त्यांच्यासाठी पायघड्या घालण्यास आतुर आहे.

2 009 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा-सांगली-कोल्हापूरच्या साखरपट्ट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात एकमेव खासदारकी पडली ती छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपाने. अर्थातच हा विजय ‘राष्ट्रवादी’पेक्षाही त्यांचा स्वत:चा होता. थेट शरद पवारांनीच मनधरणी केल्यामुळे ते घड्याळाचे चिन्ह घेऊन लढण्यास तयार झाले, एवढेच श्रेय ‘राष्ट्रवादी’ला देता येईल. सांगली-कोल्हापुरातून राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) आणि सदाशिवराव मंडलिकांनी (अपक्ष) ‘राष्ट्रवादी’ला जबर धक्का दिला होता. पुणे जिल्ह्यात शिवाजीराव आढळराव-पाटील आणि गजानन बाबर (दोन्ही शिवसेना) यांनी ‘राष्ट्रवादी’चे आव्हान मोडून काढले. माढा (शरद पवार) आणि बारामती (सुप्रिया सुळे) या दोन जागांचा अपवाद वगळता पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची घोर निराशाच झाली. बालेकिल्ल्याच्या पश्चिम महाराष्ट्रातच खिंडार पडल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून ‘राष्ट्रवादी’ची मजल फक्त 8 जागा जिंकण्यापर्यंत गेली. परिणामी केंद्रातली पवारांची ताकद कमी झाली.
लोकसभेची निवडणूक पुन्हा वर्षभरावर येऊन ठेपली आहे. नेमक्या याच कालावधीत सातार्‍यातून थेट बंडाचा नसला तरी ‘राष्ट्रवादी’च्या गोटात काळजी निर्माण करणारा सूर निघू लागला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रामदास आठवले यांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले दोन-तीन आमदार आणि इतर काही प्रभावशाली नेते कधीही ‘महायुती’त सहभागी होऊ शकतात, अशी घोषणा मुंडेंनी नेहमीच्या आवेशात करून टाकली आहे. ‘साहेबांना’ दिल्लीच्या तख्तावर बसवण्याच्या मोहिमेला खीळ घालण्याचे काम सातार्‍याची गादी करू शकते, याची जाणीव ‘राष्ट्रवादी’ला असल्याने त्यांनीही सावधपणा दाखवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातले राजकारण उदयनराजेंच्या भोवती फिरण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेली पुणे लोकसभेची जागा घेऊन त्या बदल्यात सातार्‍याची जागा काँग्रेसला द्यावी, असा प्रस्ताव ‘राष्ट्रवादी’कडून पुढे आणला जात आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचा पवित्रा काय असेल, याची खात्री देणे अवघड झाल्याने ही तयारी सुरू झाली आहे. शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांना 2009 मध्ये कोल्हापूरकरांनी पराभवाची चव चाखण्यास भाग पाडले होते. ‘राष्ट्रवादी’च्या तिकिटावर लढणार्‍या युवराज संभाजीराजे यांना सदाशिवराव मंडलिकांकडून हार पत्करावी लागली. याच पद्धतीने सातार्‍यातली जनतादेखील उदयनराजेंना घरी बसवेल, या मनोराज्यात रमणे योग्य ठरणार नसल्याची जाणीव ‘राष्ट्रवादी’ला आहे. 2009 मध्ये उदयनराजे यांनी तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेत लोकसभेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी एकदा विधानसभेची निवडणूक लढवतानाही दणदणीत विजय त्यांना मिळाला होता. छत्रपतींचे वंशज म्हणून उदयनराजेंना मानणारा मोठा वर्ग सातारा जिल्ह्यात आहे. सामान्यांशी त्यांचा संपर्क आहे. उदयनराजांच्या दरबारात कैफीयत घेऊन गेल्यानंतर प्रश्न सुटतो, असा अनुभव सातारकर नागरिक सांगतात. उदयनराजांचे जनतेतील स्थान लक्षात घेऊनच त्यांना दुखावण्याचे साहस आजवर राष्ट्रवादीकडून झालेले नाही. वास्तविक अजित पवार आणि उदयनराजे यांच्यातून विस्तवही जात नाही. उदयनराजेंनी अनेकदा जाहीरपणे अजित पवारांवर तोफ डागली आहे. पक्षातील नेत्यांवर, धोरणांवर टीकास्त्र सोडले आहे, परंतु त्याला प्रत्युत्तर देण्याचा ‘टगेपणा’ अजित पवारही कधी करू शकलेले नाहीत. पक्षादेश किंवा इतरांच्या वाटेला सातत्याने येणारा अजित पवारांचा फटकळपणा, करडी शिस्त वगैरेचे कुंपण उदयनराजेंना पडलेले नाही. ‘राष्ट्रवादी’मधली एकच व्यक्ती त्यांच्याशी चर्चा करू शकते; ती म्हणजे शरद पवार. सातार्‍याची लोकसभेची जागा कायम राखण्यास ‘राष्ट्रवादी’ला प्राधान्य द्यायचे असेल तर उदयनराजेंना जपणे आवश्यक आहे, परंतु खासदारकी टिकवण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ची मनधरणी करण्याची गरज उदयनराजेंना नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही उदयनराजेंनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्त्व कायम राखले आहे ते असे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याला खासगीत अवघड जागचे दुखणे म्हणतात. सहनही होत नाही, सांगताही येत नाही.

उदयनराजेंचा चाणाक्षपणा
शरद पवार यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नुकतीच मुंबईत पक्षाची बैठक बोलावली होती. खासदार असलेल्या उदयनराजेंना या बैठकीपासून लांब ठेवले गेले. उदयनराजेंनीही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत द्यायचा तो इशारा दिला. ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज’ या उदयनराजेंच्या जन्मजात उपाधीचे आकर्षण सर्वच पक्षांना आहे. उदयनराजेंसाठी ‘महायुती’ पायघड्या घालण्यास आतुर आहे, ती यामुळेच. सातार्‍यात भगवा फडकावण्याची किमया उदयनराजेंशिवाय कोणी करू शकत नाही, ही महायुतीची कमजोरी आहे. उदयनराजेंचा पराभव करू शकणारे नेतृत्त्व नसणे ही राष्ट्रवादीची उणीव आहे. हे हेरूनच या दोघांनाही समान अंतरावर ठेवण्याचा चाणाक्षपणा उदयनराजेंनी दाखवला आहे.