आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब उदयनराजेंना काटशह देणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा लोकसभा मतदारसंघावर पूर्वी दोन लोकसभा प्रतिनिधी होते.राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्यसभेचे सदस्य होते, केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. त्यामुळे सातारा जिल्हा तीन खासदारांचा होता. खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आणि खासदार पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांमुळे सातारकरांना आपला दबदबा दिल्लीत असल्याचा भास सातत्याने व्हायचा. मतदारसंघांची फेररचना झाली. दोन लोकसभा मतदारसंघांवरून एकावर समाधान मानावे लागले. पृथ्वीराज चव्हाण मुंबईत परतले. आता राष्ट्रवादीच्या खात्यावर असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले करत आहेत. आपल्या बेधडक, बिनधास्त कार्यशैलीमुळे कायम चर्चेत राहणारे उदयनराजे भोसले सध्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता आहे.


पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा लोकसभेचा विचार केला तर साता-यात राष्टÑवादी, सांगलीत काँग्रेस, कोल्हापुरात अपक्ष तर हातकणंगले-इचलकरंजीत शेतकरी संघटनेचा उमेदवार गेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला जागा वाढवण्यासाठी या जागा ताब्यात घ्यायच्या आहेत. सातारा, सोलापूरची माढ्याची जागा कायम ठेवायची आहे. अशा परिस्थितीत शरद पवार कोणाला उमेदवारी देतात हे त्यांच्या आजवरच्या कार्यपद्धतीप्रमाणे जितके अनाकलनीय आहे तेवढेच इच्छुकांच्या दृष्टीने जीव टांगणीला ठेवणारे आहे. आक्रमण हा बचावाचा उत्तम पर्याय असतो हे विचारात घेऊन खासदार उदयनराजे यांनी साताराच काय पण बारामतीतूनही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी हा प्रयत्न असताना गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी शरद पवारांच्या माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, याचा विसर अद्याप पक्षाला पडलेला नसेल. मुळात साहेबांबरोबर खासदारांचे जमते पण दादांबरोबर जमत नाही, नव्हे अजिबात जमत नाही ही वस्तुस्थिती आहे. शरद पवारांनी मे महिन्यात याबाबत उत्तर देताना उदयनराजे पक्षाच्या विरोधात नाहीत. ते बैठकांना येतात आणि माझे त्यांचे चांगले जमते, असे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला होता. पण अवघ्या दोन महिन्यांत, जनकल्याणासाठी मी साताराच नव्हे तर बारामतीतून उभे राहण्यास तयार आहे, असे सांगत पवारांच्या बोलण्यातला फोलपणा स्पष्ट केला. उदयनराजेंचे हे दबावतंत्र असले तरी त्यामागे अस्वस्थताही आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादीला घेऊन सातारा मतदारसंघ काँग्रेसला देऊन पवारसाहेब राजेंना काटशह देऊ शकतात. अर्थात सध्या राज्यात राष्ट्रवादीची परिस्थिती पाहता साहेब घाट्यातला सौदा करणार नाहीत. राज्यात समीर भुजबळ, संजय दीना पाटील, पद्मसिंह पाटील, उदयनराजे भोसले यांच्यात नक्की निवडून येणारी आणि कमी त्रासात विजयी होणारी उदयनराजे ही एकमेव जागा आहे. स्वत: शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या जागा नक्की निवडून येतील. पण शरद पवार जर माढ्यातून निवडणूक लढवणार नसतील तर तिथून रामराजेंना किंवा रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राज्यातून किमान दहा जागा निवडून आणायच्या असतील आणि केंद्रात महत्त्वाची जागा मिळवायची असेल तर स्वत: निवडणुकीच्या रिंगणात पवार अडकून राहणार नाहीत आणि कच्च्या जागा निवडून आणत केंद्रात वजन वाढवतील. या शक्यतांचा विचार करत उदयनराजे एकीकडे दबाव आणतात, तर दुसरीकडे उमेदवारीचा खुंटा हलवून मजबूत करत आहेत.


काँग्रेसचे गतवैभव पृथ्वीराज चव्हाण यांना आणायचे झाले तर एकेकाळी ज्यांचे बोट धरून सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस प्रवेशाकरिता ज्यांना घेऊन गेले त्या उदयनराजेंविरुद्ध त्यांना मोर्चेबांधणी करावी लागणार किंवा ते ज्या आघाडी धर्माचा विचार मांडतात, त्याला अनुसरत राजेंना निवडून आणावे लागणार. सातारा नाही पण इचलकरंजी-कोल्हापूर किंवा माढा-पुणे या मतदारसंघात अदलाबदल करत आघाडी धर्माचे पालन केले जाईल आणि प्रतीक पाटील, उदयनराजे भोसले या जागा नक्की निवडून आणल्या जातील. अखेरीस सवाल आघाडी सरकारच्या स्थापनेसाठी लागणा-या जादुई आकड्याचा आहे.