समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही असा पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. परंतु दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन करून पैसे वाटपाच्या कार्यक्रमात भाग घेत होते. त्यामुळे शिवसेनेतच या मार्गाबाबत एकवाक्यता नसल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या या दुहेरी भूमिकेवर टीका होताच उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषद घेऊन असे काही नाही, असे सांगण्याची वेळ आली. खरे तर उद्धव ठाकरे यांना असे करण्याची गरजच नव्हती. त्यांचे मुद्दे योग्यच होते आणि ते योग्यरित्या जनतेपर्यंत पोहोचवलेही जात होते. परंतु पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उलट शिवसेनेत एकवाक्यता नसल्याचेच दाखवून दिले. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे अनेक पवित्रे चुकीच्या मार्गावर असल्याचे दिसू लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आतापर्यंतच्या निर्णयांवर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे काय होईल असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु बाळासाहेबांनी हिरे-माणकापेक्षा अनमोल माणसं उभी केली होती. या माणसांनी शिवसेनेसाठी रक्ताचे पाणी केले त्यांच्या साथीने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केले. खरे तर उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य शंभर टक्के खरे आहे. बाळासाहेबांनी बांधलेली शिवसेना मजबूत आहे त्यामुळेच शिवसेनेची वाटचाल सुखरूप सुरु आहे. परंतु ही वाटचाल किती दिवस सुखरूप राहील असा प्रश्न पडू लागला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा एखादा आदेश दिला की, तो शिवसेनेच्या एकाही नेत्याने पाळला नाही असे झाले नाही. बाळासाहेबांनी एखाद्या गोष्टीला विरोध केला की विरोध कायमच राहाणार परंतु आता तसे होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाची योजना आखली. मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्याने या महामार्गाची जबाबदारी त्यांच्याकडेच आली. मात्र समृद्धी महामार्गाची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला. भूसंपादन होऊ दिले जाणार नाही अशी भूमिका घेतली. यासाठी औरंगाबाद, नाशिक, जालना येथे जाऊन या मार्गात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आणि विरोध कायम ठेवला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अाैरंगाबाद आणि शहापूर येथील शेतकऱ्यांकडून जमीन घेत त्यांना मोबदला देण्याचे काम सुरु केले. बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदे यांची अशी हिम्मतच झाली नसती, परंतु आता उद्धव ठाकरे यांची एक भूमिका आणि त्यांच्याच मंत्र्याची एक भूमिका असे चित्र दिसले.
समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांनाही शिवसेनेची भूमिका समजेनाशी झाली त्यामुळे तेही अस्वस्थ झाले. हे पाहून उद्धव ठाकरे यांनी लगेचच एकनाथ शिंदे माझ्याच आदेशाने फिरत आहेत असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनाही पक्षप्रमुखांची री अाेढावी लागला. खरे तर पत्रकार परिषदेत त्यांचा पडलेला चेहराच हे दाखवून देत होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधी पक्षांनी आदोलन सुरु केले. यात शिवसेनेने उडी घेतली आणि विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. सरकारने कर्जमाफी जाहीर केली. खरे तर मंत्रिमंडळ बैठकीतच हा निर्णय झाला होता. परंतु यालाही शिवसेनेने विरोध केला.
सरसकट कर्जमाफीची मागणी करीत शिवसेनेने रान उठवले. आता तर थकबाकीदारांची नावे देण्याची मागणी केली आहे. सरकारने नावे जाहीर करणार असे सांगितले मात्र उद्धव ठाकरे खाजगीत बोलताना, शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे, ते माफ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी कशाला असा प्रश्न उपस्थित करतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमात कर्जमाफीबाबत काहीही उल्लेख नाही असेही ते सांगतात. खरे तर बँकांना एनपीएची खाती बंद करताना रिझर्व्ह बँकेला माहिती द्यावी लागते. तसेच सरकार पैसे देणार असल्यानेही रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घ्यावीच लागते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने तयार केलेले नियमही उद्धव ठाकरे यांना मान्य नाहीत. सरकारी नोकरीत वडिल, मुलगा असतील तर त्यांना वेतन आयोग लागू होतो मग कर्जमाफी करताना एखाद्या शेतकऱ्याचा नातेवाईक सरकारी नोकरीत असेल तर त्याला कर्जमाफी का नाही? असेही उद्धव ठाकरे म्हणाल्याचे समजते. यावरून उद्धव ठाकरे यांना त्यांचे सल्लागार काय दर्जाचा सल्ला देत आहेत तेही दिसून येत आहे. कर्जमाफीवरून शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते परंतु तसे काही त्यांच्या वागण्यातून दिसून आले नाही. कर्जमाफी झाल्यावर मात्र आमच्यामुळेच कर्जमाफी झाली असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत जायचे की नाही अशा दोलायमान स्थितीत असताना उद्धव ठाकरे यांनी विरोधात राहाण्याची भूमिका घेतली. विरोधी पक्षनेतेपदही घेतले आणि काही काळानंतर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी असे कधीच केले नसते. राज्याप्रमाणे केंद्रातही त्यांनी चांगल्या खात्यांची मागणी केली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या, मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान दिले नाही. अनिल देसाई मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला गेले खरे परंतु त्यांना उद्धव ठाकरे यांनी विमानतळावरूनच परत बोलावले. एक प्रकारे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यापुढे शरणागतीच पत्करली, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे नावही घेतले नाही.
केंद्र आणि राज्य सरकारच्या काही निर्णयांना विरोध करण्याची परंपरा शिवसेनेने सुरुच ठेवलेली आहे. नोटाबंदीविरोधात शिवसेनेने आकांडतांडव केले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. आत्ताही नोटाबंदीचा विषय वेळोवेळी काढला जातो. काही दिवसांपूर्वी थेट सरपंच निवडीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. थेट नगराध्यक्षांच्या निवडीचा फायदा भाजपला झालेला असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला विरोध न करणाऱ्या शिवसेनेने दुसऱ्या दिवशी या निर्णयाला विरोध करीत निर्णय मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याची घोषणा केली. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही या गोष्टीला विरोध केला परंतु आता १५ दिवस झाले तरी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पोहोचलेले नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारता त्यांनी आमचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत असे सांगितले त्यावरून शिवसेना किती गंभीर आहे हे दिसून आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे घोडे अजूनही अडलेले आहे. मुंबई महापालिका आणि राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम पुढे सरकू नये याबाबत शिवसैनिकांमध्येच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेची वेळोवेळी बदलणारी भूमिका पाहून उद्धव ठाकरे यांना नक्की काय करायचे आहे? असा प्रश्न शिवसैनिकच विचारू लागले आहेत. एकीकडे भाजपला विरोध करायचा सत्तेवर पाणी सोडण्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे सत्तेत टिकून राहण्याची धडपड करायची हे शिवसैनिकांच्या आकलनापलिकडचे आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे जनतेत शिवसेनेची प्रतिमा डागाळत आहे आणि याचा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसू शकतो.
बाळासाहेबांनी तयार केलेले शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्यानेच शिवसेनेची वाटचाल सुरु आहे आणि याची जाणीव उद्धव ठाकरे यांनाही आहे. त्यामुळेच सुभाष देसाई यांच्या कार्यक्रमात त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊन शिवसेनेच्या वाटचालीबाबत वक्तव्य केले. शिवसेनेला सत्तेवर यायचे असेल तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांना कणखर भूमिका घेण्याची आणि चांगल्या सल्लागारांना सोबत घेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे, असे वाटते.
- chandrakant.shinde@dbcorp.in