आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांनी उड्या मारून टाळला आणखी हजार भाविकांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जंगलचट्टी येथील बचावकार्याचा अनुभव फ्लाइट लेफ्टनंट मिस्कीन यांनी उपमिता वाजपेयी यांना सांगितला.

19 जून. विंग कमांडर निखिल नायडू यांच्यासोबत हेलिकॉप्टरच्या एका फेरीच्या वेळी काही लोक एका ठिकाणी अडकल्याचे आम्ही पाहिले. गौरीकुंड ते रामबाडादरम्यानची ही जागा होती, जंगलचट्टी. एकीकडे दुथडी भरून वाहणारी नदी, तर दुसरीकडे उभा डोंगर. दोन्हीच्या मध्ये अगदह अरुंद खोरे. हेलिकॉप्टर उतरवणे अशक्यच. अन्न, पाणी आणि औषधांची पाकिटे टाकली, ती नदीत जाऊन पडली. मग काही पाकिटे डोंगरावर टाकली, त्यातील काही पाकिटे मोठय़ा प्रयत्नांनंतर आपदग्रस्तांपर्यंत पोहोचली. त्या दिवशी उतरणे शक्य झाले नाही; पण खूप सामान टाकले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी उशीर होऊ नये, म्हणून त्या रात्री आम्ही डेहराडूनला जाण्याऐवजी केदारनाथ खोर्‍यातील सर्वात जवळ फाटा येथे थांबण्याचे ठरले.

20 जून. सकाळी 7 वाजता
आम्ही दोन गिर्यारोहकांसह जंगलचट्टीला आलो. या दोघांनाही 30 मीटर उंचावरू न विजेच्या तारा, खांब आणि झाडांमध्ये उतरवले. असे पूर्वी कधीच केले नव्हते. याचे प्रशिक्षणही मिळालेले नव्हते. 30 मीटर उंचावर हेलिकॉप्टर हवेत स्थिर ठेवायचे. जागा एवढी अरुंद की, छोटीशी चूकही महागात पडण्याची भीती; पण 3600 तासांच्या उड्डाणाचा अनुभव असलेले विंग कमांडर नायडू यांनी निर्णय घेतला. दोन्ही गिर्यारोहकांना दोरखंडाच्या साहाय्याने काही अंतरावर उतरवले आणि उडी मारण्यास सांगितले. फ्लाइंगच्या भाषेत याला विंचिंग म्हणतात. हे करायला पाच मिनिटे लागली. खाली उतरलेले गिर्यारोहक बिष्ट आणि राणा यांना हातोडी, विळे, अशी काही अवजारे दिली त्यानंतर आयटीबीपी आणि एनडीआरएफचे 12 जवान खाली उतरले. त्यांनी तत्काळ विजेचे खांब आणि तारांचे जाळे दूर केले. झाडे तोडली. तीन तासांत ती जागा हेलिकॉप्टर उतरवता येईल, अशी झाली. तेथे एक सिव्हिल हेलिकॉप्टर उतरण्यासाठी गेले. दोन प्रयत्न केले, तिसर्‍या प्रयत्नात हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळले.

हेलिकॉप्टरचे विखुरलेले तुकडे पाहून काळजात चर्र झाले. 21 जून. आम्ही काही जणांना दुसरीकडे पाठवले. तोपर्यंत काही जवान पायी तेथे पोहोचले होते. एक नवे हेलिपॅड तयार केले. ही जागा तर पहिल्यापेक्षा धोकादायक होती. वायुसेनेचे जवान सर्वप्रथम उतरले तेव्हा हेलिकॉप्टरचा फिरणारा पंखा आणि डोंगर यांच्यातील अंतर होते फक्त पाच फूट. छोट्याशा चुकीलाही एकच शिक्षा होती, मृत्यू. येथूनच आम्ही एकापाठोपाठ एक सुमारे 1000 लोकांना हेलिकॉप्टर खाली न उतरवता, एअरलिफ्ट केले. सात हेलिकॉप्टरच्या मदतीने दोन दिवसांत आम्ही हे बचावकार्य पूर्ण केले. या बचावकार्यातील प्रत्येक क्षण आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता; पण एवढय़ा लोकांना सुखरूप सोडवल्यावर वाटले की, आपल्या जन्माचे सार्थक झाले.