आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवलगाच्या जिवासाठीची वटपौर्णिमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ महिना म्हणजे भारतीय संवत्सराप्रमाणे येणारा तिसरा महिना. वसंत ऋतूचे आनंदपर्व अंगाखांद्यावर खेळवणारे चैत्र आणि वैशाख हे दोन महिने संपले की, ग्रीष्म ऋतूचा आरंभकाळ सुरू होतो. ज्येष्ठ महिना आपल्या सोबत हा ऋतू घेऊन येतो. या महिन्यात संपूर्ण नभांगण मेघांनी भरलेले असते, तर सा-या आसमंतात गांभीर्य दाटून आलेले असते. आसमंतात प्रौढपणाची जाणीव व्यक्त होत असते. सगळीकडे भारदस्तपणा भरलेला असतो. याच वेळी चराचरातून कुटुंबवत्सलतेची छाया पसरलेली असते.


ज्येष्ठ महिन्यातले हे भारदस्तपण स्पष्टपणे व्यक्त होत असते ते वटपौर्णिमेच्या सणातून! ज्येष्ठ महिन्यात येणारी ही पौर्णिमा स्पष्टपणे वैवाहिक जीवनातील पती-पत्नीच्या नात्यामधले पत्नीचे अंतर्मन काय म्हणते आहे, हे सा-यांना विनम्रपणे आब राखून सांगत असते. तसे पाहिले तर निसर्ग आणि मानव हे वेगळे नाहीत. आपण या सृष्टीचाच एक अंश आहोत, याची अप्रत्यक्ष जाणीव सा-यांनाच असते. या जाणिवेतूनच जे कोणते निसर्गरूप आपल्याला जास्त आवडते, त्याला आपण रुपक म्हणून स्वीकारत असतो. मानवाचे आणि चंद्राचे नाते तसे अतिशय जवळिकीचे आहे. चंद्राला कधी चंदामामा बनवलेले आहे, तर पूर्ण चंद्राला सौंदर्याचे अंतिम रूप मानलेले आहे. कधी चंद्रकलांना काळाचे सौम्य रूपही बनवलेले आहे. गर्भाचा अधिष्ठाताही चंद्रालाच समजले जाते. चंद्राविषयीची आपली ही जवळीक इतकी भरभरून आहे, की प्रत्येक संवत्सरात येणा-या निरनिराळ्या बारा पौर्णिमांमधून अनेक संकेत विविध अंगांनी रुजले आहेत. हे सारे संकेत तसे समूहजीवनात कसे जगावे याचे भान आणत असतात, म्हणून त्यांना परंपरागत महत्त्व येत गेले आहे.


ज्येष्ठात येणारी वटपौर्णिमा ही संवत्सरातील तिसरी आणि पूर्णपणे कौटुंबिक पौर्णिमा आहे. या पौर्णिमेतून प्रत्येक विवाहित स्त्रीची जीवननिष्ठा व्यक्त होत असते. प्रत्येक विवाहित महिलेचे आपल्या पतीशी जे घट्ट आणि प्रगाढ प्रेमाचे नाते असते, ते या वेळी समाजासमोर व्यक्त होत असते. कोणतीही सौभाग्यवती दिसली की ती घटिका शुभ आहे, अशी समजूत यामुळेच पडली असावी. तसे पाहता वटपौर्णिमेची रूढी वेगळी पडलेली असली आणि या दिवशी बहुसंख्य सुवासिनी स्त्रिया सौभाग्यवृद्धी व्हावी म्हणून उपास करत असल्या, तरी वटवृक्षाच्या पूजेमागचे महत्त्व सहसा अनेकींना माहीत नसते. खरे पाहता, चैत्रगौर आटोपल्यानंतर तब्बल दोन-एक महिन्यांनी या सा-या जणी भेटत असतात. पूर्वी अनेक गावांमध्ये वडाच्या झाडाखाली महिला गाणी म्हणत असत. त्यांचे तिथे नृत्यांचे फेरेही होत असत. आज तसे दिसत नसले, तरी या सा-या जणींना सत्यवान-सावित्रीची कथा, सत्यवानाला लग्नाच्या वर्षाअखेरीस येणारा मृत्यू, सावित्रीचे त्याच्यावरचे प्रेम, तिने केलेली सासू-सास-यांची सेवा, शेवटच्या दिवशी जंगलात लाकडे आणण्यासाठी जाण्याचे प्रसंग, तिचाही सोबत जाण्याचा हट्ट, यमराजाचे दर्शन, तिने मागितलेले तीन वर, यातून तिची प्रगट झालेली पतीनिष्ठा, नात्यातील प्रेम आणि तिची तपश्चर्या, या सा-यापुढे सत्यवानाचे पुन्हा जिवंत होणे... हे सारे माहीत असते. सत्यवान-सावित्रीच्या या कहाणीला अनेकींनी केवळ रंजन म्हणून जेव्हा पाहिलेले असते, तेव्हा त्यातील बहुतांश जणींना यामागचा गाभा कोणीही सांगितलेला नसतो.


वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाचे पूजन का होते, याबाबत वेगळ्या अर्थाने सांगायचे झाले तर, वंशवृक्ष मानल्या गेलेल्या या वडाचा गर्द हिरव्या रंगाचा घट्ट पर्णसंभार हा प्रगाढ नातेसंबंध व्यक्त करत असतो, तर त्याचा दणकट बुंधा हा स्थिर जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करतो. कुटुंबविस्ताराचे प्रतीक म्हणून त्याच्या पारंब्यांकडे पाहायचे असते. या पारंब्या पुन्हा आपल्या जन्मदात्या वडाच्या बाजूच्या मातीखालीच रुजण्यासाठी जातात. तिथून त्याच भूमीत थोडे बाजूला आपले स्वत:चे अस्तित्व दाखवतात. मुक्या प्राण्यांसाठी आणि पांथस्थांसाठी छायावृक्ष म्हणून कडक उन्हाचा दाह न होऊ देण्याचे काम केवळ वटवृक्ष करतो, तर किलबिलत्या पाखरांना सुरक्षित घरटे म्हणून वडाचे झाड उपयोगी पडते. कोणत्याही गावातला असा विशाल वटवृक्ष कोणी लावून गेले याची कोणालाच माहिती नसते, मात्र पिढ्यान्पिढ्या हा वटवृक्ष आपल्या वंशाच्या साथीला आहे, याची जाणीव मात्र तिथल्या प्रत्येक गावक-याला असते.


वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाच्या पूजनासोबत वडाच्या झाडासोबतचे हे आगळेपण, प्रत्येक विवाहितेला जर कळले, तर तिला आपोआपच जगण्यामधले हे वेगळे सत्त्व रुचेलच, याची खात्री वाटते.सावित्रीचा पती अशाच कोणत्या वडाखाली तिच्या तपश्चर्येमुळे जिवंत झाला, या संकेताला अनुसरून जेव्हा स्त्रिया वडाच्या मुळाशी पाणी घालून त्याची पूजा करून प्रदक्षिणा घालतात आणि सुताचे सात वेष्टण करतात, तेव्हा त्यांना आता ही सुखद जाणीव व्हावी की, आपली ही कृती सत्कृती आहे. अशी जाणीव ठेवून पारंपरिक अंगाने वटपौर्णिमा पाळली तरी वेगळ्या अर्थाने पाहिले तर नैतिक नातेसंबंधातल्या अमरत्वाचे प्रतीक म्हणून वटवृक्षाकडे पाहिले पाहिजे. तसे पाहता या दिवशी सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचे आणि त्यांची पत्नी सावित्री यांचे पूजन हे मुख्य व्रतपालन म्हणून एखाद्याला आढळले, तरी आपण सारी सृष्टीचीच लेकरे म्हणून आपल्या आठवणीतल्या कथेतील सावित्रीचे पूजनही ब्रह्मदेवाला आनंदित करते, असे मानायला हरकत नाही.