आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Big Challengs In Western Maharashtra For The BJP

प. महाराष्‍ट्रात भाजपसमोर आणखी खडतर आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाची धुरा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी नव्या दमाच्या नेत्यांवर सोपवली गेली आहे. अर्थातच पक्षांतर्गत आणि विरोधकांच्या आव्हानांचा दोनहाती सामना करणा-या गोपीनाथ मुंडे यांच्यावरच मुख्य जबाबदारी असेल. देशाच्या पातळीवर भाजपमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे, पण काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस यांचा पूर्वीपासूनच बालेकिल्ला असलेल्या महाराष्‍ट्रात भाजपची ताकद नगण्यच दिसते आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे या मोठ्या जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपला खातेही उघडता आलेले नाही, तर सध्याच्या स्थितीत केवळ दहा आमदार भाजपकडे आहेत. त्यातच पक्षांतर्गत लाथाळ्यांनी पक्षासमोरील आव्हाने वाढतच चालली आहेत.
सोलापुरात पश्चिम महाराष्‍ट्र भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली, या बैठकीला नवे प्रदेशाध्यक्ष फडणवीस व तावडे यांच्यासह प्रदेशचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात भाजपचे विजय देशमुख आणि ग्रामीण अक्कलकोटमधून सिद्रामप्पा पाटील असे दोन आमदार आहेत, तर लोकमंगल आणि माजी आमदार व माजी खासदार म्हणून सुभाष देशमुख व सावरकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून शरद बनसोडे हे राजकारणात सक्रिय आहेत, पण प्रदेश नेते उपस्थित असतानाही सुभाष देशमुख यांनी या बैठकीलाच दांडी मारली. विशेष म्हणजे या दोघांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बनसोडे यांनी तर लोकसभा निवडणूकच लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. आमदार विजय देशमुख यांच्या नियोजनाचे वर्चस्व या बैठकीवर होते, त्यामुळे ताकद असूनही सुभाष देशमुख यांना त्यात कोणतेच महत्त्व दिले गेले नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तीन नेत्यांच्या तीन दिशा, अशी सध्या शहरात स्थिती आहे. त्यामुळे फडणवीस व तावडे यांना ते आवरण्यापलीकडे असल्याचेच स्पष्ट झाले. त्यातच शहरातील भाजपच्या महापालिकेतील आठ नगरसेवकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. ते पक्षापासून सध्या अलिप्त आहेत. पश्चिम महाराष्‍ट्राच्या बैठकीला तेही अनुपस्थित होते. त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांवर, नेत्यांवर वचक राहिलेला नाही, हेच या घडामोडीने दाखवून दिले. पश्चिम महाराष्‍ट्रातील भाजपचा पहिला आमदार सोलापूरने दिला होता. त्याच सोलापूरने लोकसभेसाठी दोनवेळा खासदार दिला. पुण्यानंतर सोलापुरात भाजपची ताकद होती, पण ती पक्षांतर्गत लाथाळ्यांनी टिकून राहिली नाही.


नुकत्याच सांगलीत झालेल्या महापालिकेत तर भाजप कुठे दिसलाही नाही. कोल्हापुरातही काहीशी तशीच स्थिती आहे. पश्चिम महाराष्‍ट्रात भाजपचे जे 10 आमदार आहेत, त्यात चार तर पुणे व परिसरातीलच आहेत. सांगली जिल्ह्यात दोन, कोल्हापूर जिल्ह्यात एक असे आमदार भाजपकडे आहेत. या जिल्ह्यात लोकसभेतर भाजपकडे प्रतिनिधित्वच नाही. सांगली जिल्ह्यातील नेते प्रकाश शेंडगे हे तर काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर राहू, ते जे निर्णय घेतील तो मान्य राहील, असे सध्या ते सांगत आहेत. पुण्यात वाढत चाललेली मनसेची व शिवसेनेची मुळातच असलेली ताकद भाजपच्या वाढण्याला मोठा अडथळा असल्याचेच दिसते, कारण तेवढ्या ताकदीचे नेतृत्वही भाजपकडे सध्या या भागात नाही. येणा-या लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपची स्थिती पश्चिम महाराष्‍ट्रापुरती तर खूपच खडतर दिसते आहे.