आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रोही संमेलन : ‘सबाल्टर्न्स’चा मेळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘सिर्फ हंगामा खडा करना हमारा मकसद नहीं, कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए’ असे ठणकावत विद्रोही सांस्कृतिक चळवळीने आजपर्यंत अकरा संमेलने पार पाडली आहेत. यंदाचे 11वे संमेलन धुळे येथे 13 आणि 14 जानेवारी रोजी झाले. धुळ्यात सांप्रदायिक तणाव असतानाही या संमेलनास समस्त महाराष्ट्रातून तब्बल दहा हजारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे नंदुरबार भागातील आदिवासींची, नवथर ग्रामीण लेखकांची, तरुण प्राध्यापकांची आणि महिलांची उपस्थिती दखल घेण्याजोगी होती.

चिपळूणच्या 86व्या अखिल भारतीय संमेलनाच्या संयोजन समितीने निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचा परशू छापून उघडपणे चातुर्वर्ण्याचे केलेले समर्थन आणि मुस्लिम समाजामध्ये सत्यशोधक विचारांची पेरणी करणा-या हमीद दलवाई यांच्याशी केलेली प्रतारणा पाहता विद्रोही सांस्कृतिक चळवळ काळाची निकड आहे, असेच म्हणावे लागेल.
प्रस्थापित प्रतीकांना मोडीत काढून पर्याय उभा करण्याला विद्रोही चळवळीने पहिल्यापासून प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम आगळेवेगळे असतात. या संमेलनाचे उद्घाटन शंबुकाचे शिर जोडून व तीरकामठा रोवून झाले. ग्रंथदिंडीऐवजी परिवर्तन रॅली काढण्यात आली. सनई-चौघड्याऐवजी पावरी आणि हलगी कडाडली. मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या ग्रंथांना रॅलीत मान मिळाला.

परिसंवादासाठी निवडलेले विषय दबलेल्या-तळातल्या माणसांच्या लढ्यांना बळ देणारे असेच होते. समकालीन संस्कृतीमधील संघर्ष आणि विद्रोहाची दिशा, हिंदू कोड बिल ते ऑनर किलिंगपर्यंतचा प्रवास, शेतक-यांचे दु:ख आत्महत्येपर्यंत गेले तरी ग्रामीण साहित्य विद्रोहापर्यंत का पोहोचले नाही, आदिवासी संस्कृती : इतिहास आणि वर्तमान असे परिसंवाद म्हणजे कार्यकर्त्यांसाठी झणझणीत वैचारिक मेजवानीच ठरली. बहुजन समाजाला रोजी-रोटीमध्ये व्यवस्थेने अडकवून ठेवले आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीच त्याला सर्व ताकद पणाला लावावी लागते आणि उरलेल्या ताकदीने तो स्वत:ला घडवू पाहतो. स्वत:ला घडवताना तो कुठेतरी व्यक्त होऊ पाहतो, आपलं अस्तित्व निर्माण करू पाहतो; पण प्रत्येक ठिकाणी त्याला कमी लेखलं जाऊन नाकारण्यात येतंय. ही स्थिती बदलण्यासाठी तळातल्या लोकांनी आपला आवाज बुलंद करण्याची गरज साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ऊर्मिला पवार यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटक होते अहमदाबादच्या ‘बुधन थिएटर’चे संस्थापक दक्षिण बजरंगी. या देशात कलेचे दर्शन घडवणा-या भटक्या-विमुक्त समाजातील लोकांना अजूनही स्वातंत्र्य नसल्याची खंत व्यक्त करत राज्यघटनेने दिलेला अधिकार मिळवण्यासाठी विद्रोहाची निकड असल्याचा ठळक मुद्दा नाट्यकर्मी बजरंगी यांनी उद्घाटनाच्या भाषणात अधोरेखित केला.

अजित देशमुख यांनी बनवलेला ‘स्वच्छ ऊर्जा, गलिच्छ कारस्थान’ हा पवनऊर्जा कंपन्यांच्या भ्रष्ट कारभारावर प्रकाश टाकणारा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची कारणमीमांसा करणारा पत्रकार पी. साईनाथ यांनी तयार केलेला ‘शेतकरी आत्महत्या’ हे माहितीपट संमेलनात दाखवण्यात आले. परिसंवादाच्या प्रभावापेक्षा या माहितीपटांनी उपस्थितांवर मोठा प्रभाव टाकल्याचे जाणवले. वृषाली रणधीर यांचा ‘व्हय, मी सावित्री बोलतेय’ आणि कोल्हापूरच्या नवनाथ शिंदे यांनी सादर केलेला ‘मी महात्मा फुले बोलतोय’ हे एकपात्री प्रयोगही फर्मास झाले. या प्रयोगांनंतर जोतिबा आणि सावित्री यांचे आपल्याला दर्शन झाल्याचा अनेकांना भास झाला. त्यामुळे अनेकांनी या दोघांच्या पायावर चक्क लोटांगण घेतले.
वामनदादा कर्डक हा शाहिरी जलसा या संमेलनातील सर्वाधिक वाहवा मिळवून गेला. केवळ हलगी आणि ढोलकीच्या संगतीने गावोगावच्या गायकांनी गायलेल्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कलाकारांनी तळातल्या लोकांचे जगणे, दु:ख, वेदना प्रकट तर केलीच; पण सत्तेला आव्हान देण्याची त्यांची गुर्मी आणि धाडसही चांगलाच भाव खाऊन गेली.

रात्री उशिरा दिवंगत कवी दीपक निकम स्मृती कविसंमेलन पार पडले. त्यामध्ये नाव घेण्यासारखे मोठाले कवी नव्हते; पण युवकांचा मोठा भरणा होता. परत ते राज्याच्या विविध भागांतील तर होतेच; पण त्यांचे विषय समकालीन प्रश्नांना भिडणारे होते. त्यांच्या भूमिका स्पष्ट होत्या. आजच्या तरुण पिढीला येता-जाता चंगळवादी म्हणून वेड्यात काढणा-यांनी अशी कविसंमेलने जरूर पाहायला हवीत, असे राहून राहून वाटत राहिले.

संमेलनात जी गटचर्चा झाली, त्यामध्ये युवकांनी उत्स्फूर्त भाग घेतला. त्यात विषय होते शिक्षणातील मनुवाद अणि मनीवाद, आदिवासी वनहक्क कायदा आणि राज्यकर्त्यांची लबाडी, नवीन भूसंपादन कायदा, जात, वर्ग व सत्तासंघर्ष, संकुचित प्रदेशवाद आणि फॅसिझमची नांदी. सभामंडपातच या चर्चा अगदी अनौपचारिकपणे सुरू होत्या. गटचर्चा हा आजपर्यंतच्या सर्व विद्रोही संमेलनाचा प्राण आहे. कारण संमेलनासाठी आलेल्या सा-यांना त्यामध्ये सहभागी होता येते, बोलता येते आणि मतही मांडता येते. संमेलनाला राज्यशास्त्राच्या अभ्यासक प्रा. प्रतिमा परदेशी, पत्रकार संध्या नरे-पवार, पत्रकार आसाराम लोमटे, सत्यशोधक चळवळीचा इतिहास लिहिणारे प्रा. श्रीराम गुंदेकर, कवी दिनकर साळवे, मराठीचे प्राध्यापक तानाजी ठोंबरे, विचारवंत कॉ. रणजीत परदेशी, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. देवेंद्र इंगळे, कवयित्री उषा अंभोरे, प्रा. संजय लोहकरे, आशालता कांबळे, भिलाईचे कॉ. जयप्रकाश नायर अशी मोजकीच नामवंत मंडळी उपस्थित होती. विद्रोही संमेलनाला कोणी मोठा प्रायोजक तर नसतोच, पण राजकीय नेत्यांची आर्थिक मदतही नाकारण्यात येते. उपस्थितांनी यंदाही ‘मूठभर धान्य आणि एक रुपया’ देऊन संमेलन यशस्वी केले.

ashok.adsul@mh.bhaskarnet.com