मैंने प्यार किया, या चित्रपटात मी पहिल्यांदा सलमानला बघितलं. तेव्हा तो अगदी विशितचा हिरो वाटायचा. तारुण्याच्या उंबरठ्यावर वसलेला. तेव्हा त्याची प्रत्येक गोष्ट आकर्षक वाटायची. विशेष म्हणजे त्याचे बायसेप. पिळदार शरीर. आणि दुसरे म्हणजे त्याचा अनैसर्गिक अभिनय. अभिनयासाठी लागणाऱ्या कोणत्याही चौकटा त्याला नव्हत्या. सालस अभिनय होता त्याचा. अगदी मुक्त. शब्दांच्या साच्यात बसवता येणार नाही असा. त्याची गोष्टच निराळी होती. पण तरीही तो मनापासून आवडायचा. कदाचित तो कॅरिस्मॅटिक व्यक्ती असावा. कारण त्याला बघितल्यावर, त्याचा अभिनय अनुभवल्यानंतर मनातील तारा झंकारायच्या. तो रिलेट व्हायचा.
पण राजस्थानमधील काळविट प्रकरण असो. त्यानंतर मुंबईत झालेलं हिट अॅंड रन प्रकरण असो. त्यानंतर त्याने काढलेल्या कायद्यातील पळवाटा असो. त्याची माझ्या मनातील सोज्ज्वळ प्रतिमा मलिन होत गेली. आदरभाव हळूहळू नाहिसा होऊ लागला. हाही बॉलिवूडचा 'हिरो'च आहे असे वाटू लागले. यावेळी सोबतीला त्याचे समाजकार्य सुरुच होते. वेगवेगळ्या घटनांमुळे तो कायम चर्चेत होता. सलमान 'चांगला' माणूस आहे, असे अनेकांकडून कळू लागले. पण चांगला म्हणजे काय... हा प्रश्न नेहमी पडायचा. सध्या असलेल्या बेगडी समाजातील चांगला माणूस असा त्याचा अर्थ असावा. कारण आता चांगल्या माणसाची व्याख्या समुळ बदलली आहे. अमुलाग्र बदल झालाय त्यात. कदाचित तो त्यात नेमका बसत असावा. पण मला काही ही सोय आवडली नाही. चुक आहे ते चुक. बरोबर ते बरोबर ही साळसुद कल्पनाच मला आवडते.
सलमानने गुन्हा केला तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी, एवढे मला समजते. तो सेलिब्रिटी आहे, मोठा समाजसेवक आहे हे काही मला मान्य नाही. पण जर असे असेल तर समाजात रोज घडणाऱ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा होते का... नाही ना... मग सलमानचे समर्थन करायचे का... तेही होत नाही... समाजात भ्रष्टाचार बोकाळला आहे, असे सांगून लाच घेणे योग्य आहे असे ठरवता येते का... लाच घेण्याचे समर्थन करता येते का... मला तर नाही करता येणार... वाईट हे वाईटच आहे... शिक्षा झाली की वाईट हे चुकीचेच असते, असेही मी म्हणत नाहिये. सर्वच प्रकारचे वाईट... शिवाय
आपले अंतर्मन असते की. रात्री झोपताना असो किंवा सकाळी उठल्यावर निवांत वेळ मिळाल्यावर असो. आपण विचार करतो. त्यात आपल्याला आपण दोषी दिसतो. चुकीचे दिसतो. त्यासाठी आरश्याची गरज नसते.
पण सलमानने आता करावे तरी काय... इमेज जपावी की अंतर्मनाला जागावे. समाजात सगळे इमेज जपताना दिसतात. अंतर्मनाचं कुणीही ऐकत नाही. कारण काय समाजात राहावे लागते. शेवटी काय तर शरीर निघून जाते. प्रतिमा मागे राहते. आणि या समाजातील लोकच ही प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचवतात किंवा पायदळी तुडवतात. मग सलमानने इमेज जपली तर त्यात वाईट काय... काहीच नाही... केवळ तो जेव्हा आत्मपरिक्षण करेल. जेव्हा तोच वकील, तोच आरोपी आणि न्यायाधीशही तोच असेल. तेव्हा त्याला गिल्टी वाटू शकते. याचे वाईट वाटते. असे गिल्टी वाटणे अगदी जन्मठेपेच्या शिक्षेपेक्षाही मोठे असते. कारण ते आयुष्यभर सोबत राहते.