आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक चालवला, मच्छीमारी केली, आता कवितांसाठी पुलित्झर पुरस्कारने गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय शेषाद्री : कवी व लेखक
जन्म : 1954 बंगळुरू
शिक्षण : ऑबरलियन कॉलेजमधून बीए आणि कोलंबिया विद्यापीठातून एमएफए
कुटुंब : पत्नी सुझेन खुरी, थिएटर आर्टिस्ट, एक मुलगा.

चर्चेचे कारण : कवितांसाठी दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठित ‘पुलित्झर’ने त्यांना गौरवण्यात आले आहे.

विजय शेषाद्री बंगळुरूचे. जन्म झाल्यानंतर 1959 मध्ये वयाच्या पाचव्या वर्षी अमेरिकेत आले. वडील ओहयो स्टेट युनिव्हर्सिटीत केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. शेषाद्री कोलंबस, ओहयोमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे बालपण एकटेपणातच गेले. त्यामुळेच त्यांचा पुस्तकांकडे ओढा वाढला. त्यांनी पहिली कविताही कॉमिक्स आणि कादंबरीने प्रेरित होऊन लिहिली होती.

कमी वयातच त्यांना उपजीविकेसाठी संघर्ष करावा लागला. 18 वर्षांचे असताना ते सॅनफ्रान्सिस्कोला गेले. तेथे त्यांनी बायसिकल मेसेंजरचे काम केले. पुढे फ्लोर फिनिशिंगचा व्यवसाय सुरू केला. पण त्यातही यश मिळाले नाही. नंतर न्यूपोर्ट, ऑरेगॉनला गेले. येथे त्यांनी ट्रक चालवला तसेच मच्छीमारीचे कामही केले. पण हे काम करतानाही त्यांनी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. पण जेव्हा ते समुद्रात वादळात अडकले होते तेव्हा त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. ते सांगतात, ‘मी लहान नावेवर समुद्रात मच्छीमारी करत होतो. लाटा 40 फुटांहूनही उंच उडत होत्या. अथक प्रयत्नांनंतर किनार्‍यावर आलो. थोडा पुढे आलो अन् विचारचक्र सुरू झाले. मी हे काय करतोय? मी एक भारतीय आहे. हे माझे ध्येय नाही.’ ते लगेचच त्या ठिकाणाहून न्यूयॉर्क सिटीला आले. 1982 मध्ये कोलंबिया विद्यापीठात फाइन आर्ट्स विभागात प्रवेश घेतला. तेव्हापासून त्यांनी गांभीर्याने कविता लिखाण सुरू केले. शेषाद्री सांगतात, मी कवितांच्या जगात परतलो. नैराश्यातून बाहेर आलो. त्यांची पहिली कविता 1985 मध्ये थ्रीपेनी रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झाली होती. कोलंबिया विद्यापीठात मिडल इस्टर्न लँग्वेज आणि लिटरेचरमध्ये पीएचडीचे विद्यार्थी होते. त्यांना हे शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण त्यांचे मार्गदर्शक कवी रिचर्ड होवार्ड यांच्याशी त्यांचे सूत जुळले. त्यांच्याकडून शेषाद्री यांना बरेच काही शिकायलाही मिळाले.

‘न्यूयॉर्कर’ या साप्ताहिकात त्यांना उपसंपादकाचे काम मिळाले. त्यांचे पहिले पुस्तक ‘वाइल्ड किंगडम’ 1996 मध्ये प्रकाशित झाले. पण त्यांना कवी म्हणून खरी ओळख मिळाली ती 9/11 च्या हल्ल्यानंतर ‘न्यूयॉर्कर’मध्ये छापून आलेल्या त्यांच्या कवितेमुळे. 2003 मध्ये त्यांनी ‘लॉन्म मिडो’ लिहिली. त्यासाठी त्यांना जेम्स सॉफ लीन पुरस्कार मिळाला. त्यांना न्यूयॉर्क फाउंडेशन फॉर द आर्ट्स, नॅशनल एंडोमेंट फॉर आर्ट्स आणि गगेनहॅम फाउंडेशनची फेलोशिप मिळाली आहे. कवितांसाठी शेषाद्री यांना पॅरिस रिव्ह्यूचा बर्नार्ड एफ कॉनर्स लाँग पोयम प्राइजही मिळाले आहे. तसेच मॅक्डावेल कॉलनीची फेलोशिपही मिळाली आहे.

बेनिंगटन कॉलेजमध्ये एमएफए रायटिंग सेमिनारमध्ये त्यांनी शिकवलेही आहे. सध्या ते न्यूयॉर्कच्या सारा लॉरेन्स कॉलेजमध्ये कविता शिकवतात. याच महाविद्यालयात ग्रॅज्युएट नॉन फिक्शन रायटिंग अभ्यसक्रमाचे संचालक आहेत. ते सुमारे दोन दशकांपासून अमेरिकन कवितांचा एक मुख्य भाग बनलेले आहेत.