आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनमानसावर प्रदीर्घ राज्य करणाऱ्या रामकथेवरील रसाळ प्रवचनांचा ग्रंथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९६१ ला दादरच्या नवीन घरामध्ये मी लग्नानंतर प्रवेश केला आणि समोरच दिसले ते कामाच्या टेबलावर ठेवलेले वाल्मीकी रामायण, गीतारहस्य, दासबोध, ज्ञानेश्वरी, विवेकानंदांची व्याख्याने इ. ग्रंथ. मनातल्या मनात मी विचार केला, बापरे! ज्यांची मी आजपर्यंत नुसती नावे ऐकली, त्यांच्याकडे कधी फिरकलेसुद्धा नाही, इथे तर या ग्रंथांची पारायणे झालेली दिसताहेत... असे हे माझे संसारातले पदार्पण! यानंतरच्या टप्प्यात थोडे आणखी नवे विश्व दिसायचे होते. माधवांचे एक मित्र कार्यालय संपल्यावर माधवांबरोबर पहिल्या १-२ महिन्यांत घरी आले; रात्री जेवण झाल्यावर मध्यरात्रीपर्यंत त्या दोघांची हिरीरीने भगवद‌्गीतेवर चर्चा सुरू राहिली. पुढे त्यांचेही थोड्या दिवसांत लग्न झाले. त्यामुळे ही चर्चा थांबली. चाळीसगावला घरी सुटीसाठी गेल्यानंतर मात्र स्वयंपाकघरात आईंच्या शेजारी बसून, दोघांचे गीतेवर खूप शंका समाधान चाले.

आमच्या वरचेवर बदल्या होत राहिल्या तसे ही सारी ग्रंथसंपदा आमच्याबरोबर फिरत राहिली. वाल्मीकी रामायण तर आम्ही चाळीस वर्षांनी औरंगाबादला आलो तोपर्यंत वाचून-वाचून, चाळून-चाळून जीर्ण झाले होते. या सर्व बदल्यांच्या आयुष्यात, माधवांचा दर गुरुवारी संध्याकाळी शांतपणे वेगवेगळ्या ग्रंथांचे वाचन, मनन, सतत चिंतन आणि त्यांच्या संदर्भासाठी टिपणांचे लेखन असा भरगच्च कार्यक्रम चाले. काही दिवसांनी महाभारताचे जाडजूड ग्रंथराज घरी आले. मग माधवांनी त्यांचे वाचन, मनन पुढील वीस वर्षांपर्यंत केले. निवृत्तीनंतर एखाद्या मंदिरात प्रवचने देईन, असे ते नेहमी म्हणत. ज्या काळात सचिव म्हणून व नंतर महासचिव म्हणून माधव देश-परदेशाच्या दौऱ्यात होते, तेव्हा त्यांचे हे दिवास्वप्न प्रत्यक्षात कसे उतरणार याचा मला प्रश्न पडे.

आम्ही १९९८ मध्ये दिल्लीहून औरंगाबादला स्थायिक व्हायला आलो. त्यापूर्वी १९९७ मध्ये माधवांनी दिल्लीला भगवद‌्गीतेतील पहिला, दुसरा अध्याय आणि ११ व १२ वा अध्याय यावर प्रवचने दिली होती. तेथील वाचनमंडळातील एक जण भेटायला घरी आले. निघताना त्यांनी माधवांना विचारले. ‘‘तुमचे प्रवचन देणे सुरू आहे ना?’’ त्यांच्याबरोबर आलेले इंजिनिअर प्रदीप चिटगोपेकर म्हणाले, ‘‘आमचे साहेब व्याख्याने देतात, प्रवचने नाहीत.’’ पण त्यांच्याकडून स्थानिक इतरांना माधवांच्या गीता प्रवचनांविषयी कळले. २००४ मध्ये बालाजी मंदिराची धार्मिक समिती श्रीराम जयंतीला प्रवचन द्याल का, असे विचारायला घरी आली. माधवांच्या अंतर्मनात मंदिरात प्रवचने देण्याचे होतेच. त्यांनी तत्काळ होकार दिला. ‘‘गीतेवर प्रवचने खूप जण देतात. मी वाल्मीकी रामायण प्रवचनांमधून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, रविवारी सविस्तरपणे सांगेन,’’ असे ते म्हणाले. रामायण खूप मोठे आहे. ६०० पेक्षा अधिक सर्ग आहेत. सर्व रामायण सांगायचे म्हणजे एकूण १०० प्रवचने लागण्याची शक्यता आहे. चार-पाच वर्षांचा कार्यक्रम होईल. इतक्या चिकाटीने दीर्घ काळ लोक नियमाने येतील का, अशीही शंका आम्हाला वाटली.

वाल्मीकी रामायणात २४,००० संस्कृत श्लोक आहेत. एकेका सर्गातील प्रमुख पाच-सहा श्लोक घेऊन त्यांची प्रवचनात सलग गुंफण करायची, असे अवघड काम सुरू झाले. प्रवचनाच्या आधीच्या गुरुवारी दुपारपासून शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत बैठक मारायची, रामायणाची छाननी करायची आणि प्रवचनाला सज्ज व्हायचे, असा परिपाठ सुरू झाला. लोकांची महिन्याच्या पहिल्या शनिवारी, रविवारी पावणेसहापासून मंदिराच्या दिशेने रीघ लागलेली दिसे. पहिल्या दिवशी प्रवचनासाठी घरून निघताना मी माधवांना शुभेच्छा दिल्या. निदान २५ जण तरी हजर असावेत, अशी शुभ आशा व्यक्त केली; पण मंदिराचे सभागृह गच्च भरलेले होते. जलतज्ज्ञ माधवराव चितळे चक्क मंदिरात प्रवचन देणार या उत्सुकतेने लोक ऐकायला आले. प्रवचन संपले आणि एकदम शांतता झाली. थोड्याच वेळात प्रवचनांचे ध्वनिमुद्रण केले आहे का, अशी विचारणा सुरू झाली. मग पुढच्या प्रवचनापासून प्रवचनांचे ध्वनिमुद्रण नियमाने करणे सुरू झाले.

प्रत्येक प्रवचनानंतर त्याच्या दोन ध्वनिफिती आमच्याकडे यायला सुरुवात झाली. अशा १७६ कॅसेट्स जमा झाल्या. मधल्या काळात या कॅसेटसवरून सी. डी. तयार केल्या गेल्या व त्या मंदिराकडे सुपूर्द केल्या. जो कोणी मंदिराला देणगी देईल त्याला हा सी. डी. संच दिला जाई. त्यानंतर थोडा निवांतपणा होता; परंतु घरात साचलेल्या कॅसेट्सचा ढीग मला खुणावत होता, म्हणून मी शब्दांकन करायचे ठरवले. प्रकल्प चांगलाच मोठा होता. आशा देवधर, विद्या काणे, कुमुदिनी साठे, उषा साने अशा चाैघींनी या कामात मदत केली. आता कॅसेट्सच्या ढिगाबरोबर कपाटात शब्दांकन केलेल्या वह्यांचा गठ्ठा जमा झाला. हे शब्दांकन तपासायचे म्हणजे त्या व्यक्तीला संस्कृत उत्तम येत असावे लागणार होते. कारण मूळ रामायणातील संस्कृत उदाहरणे देत ही प्रवचने दिली होती. ती अचूकपणे शब्दांकनात उतरायला हवी होती. शिवाय साहित्याची जाण व विशेषत: वाल्मीकी रामायणाची गोडी असणारी व्यक्ती हवी होती. आम्ही आशा देवधरला विचारले. तिच्या होकारानंतर एक वेगळेच रामायण सुरू झाले. शब्दांकन केलेल्या वह्यांचे झेरॉक्स करून एक मोठा गठ्ठा आशाला पाठवणे व संदर्भासाठी एक गठ्ठा ठेवणे हे काम सुरू झाले.

एवढा मोठा लेखनप्रपंच पाहिला तेव्हा त्याचे प्रत्यक्षात तीन ग्रंथांत विभाजन करावे का, असा विचार मनात आला. बालकांड व अयोध्याकांड हा पहिला ग्रंथ. अरण्यकांड, किष्किंधा कांड, सुंदरकांड हा दुसरा ग्रंथ आणि युद्धकांड व उत्तरकांड हा असा तिसरा ग्रंथ असे तीन रंगांत तीन स्वतंत्र ग्रंथ स्पायरल बाइंड करून घेतले. परत आशाकडे ते तीन ग्रंथ एक संच म्हणून पाठवले. त्याचाच एक स्वतंत्र संच घरी ठेवला व तिसरा संच प्रकाशकांना देण्यासाठी तयार केला. तो घेऊन साकेत प्रकाशनाकडे गेलो. त्यांना त्याचे प्रकाशन करता येईल का, विचारले. त्यांनी लगेच होकार दिला. तीन ग्रंथ त्यांच्या ताब्यात दिले. आम्ही बाहेर मोटारीत येऊन बसलो व मनाला एकदम हलकेपण आलं.

गेली कित्येक वर्षे सतत काम केल्यानंतर त्याचे अंतिम रूप पुढील कामासाठी देताना मुलगी सासरी जाताना जसे सुन्न होतो तसे सुन्न झालो. घरी कपाटातल्या उरलेल्या संचांना आता तुमचे काम झाले, असे सांगितले. साकेत प्रकाशनाने सुंदर, देखण्या स्वरूपात त्या तीन संचांचा एकत्रित ८०० पानांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. वाचकांना आता तो उपलब्ध होत आहे. त्यांचा प्रतिसाद हीच या साऱ्या परिश्रमांची फलश्रुती राहील.

विजया चितळे, औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...