आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोजक्या, गतिमान रेषांचा सम्राट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची एक्झिट फार त्रासदायक, वेदनादायी आहे. सुमारे चाळीस वर्षांचा आमच्या स्नेहाचा सुंदर प्रवास त्यांच्या  निधनाने सुना झाल्याची भावना जाणवते.  तेंडुलकर सर्वच बाबतीत  ‘ज्येष्ठ’ असले तरी प्रत्यक्षात तसे जाणवू देत नसत, हे त्यांच्या बाबतीत आवर्जून सांगायला हवे. त्यामुळे  शि. द. फडणीसांसारख्या सर्वांना ज्येष्ठ असणाऱ्या कलावंतापासून ते शाळकरी विद्यार्थिनीपर्यंत, तेंडुलकरांच्या मित्रत्वाचा, स्नेहाचा पैस विस्तारलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे तेंडुलकर शब्दश: अखेरपर्यंत कलारत राहिले. दिवाळी अंकांसाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे संपादकांपर्यंत पोचवूनच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.  
तेंडुलकरांचे रेषावैभव आणि त्या रेषांमधली गतिमानता, ही मला व्यक्तिश: सर्वात भावणारी गोष्ट होती. कमीत कमी रेषांच्या वापरातून अधिकाधिक आशयाचे  क्षितिज त्यांची व्यंगचित्रे सूचित करत असत. व्यंगचित्रकलेमध्ये  ‘इकॉनॉमी ऑफ लाइन्स’ (रेषांचा कमीत कमी वापर) हे आद्यतत्त्व मानले जाते. हे तत्त्व तेंडुलकरांच्या प्रत्येक व्यंगचित्रात कसोशीने जपलेले आढळते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या  मोजक्या  रेषांनी सजलेल्या व्यंगचित्रांमधील  गतिमानता.. त्यामुळे त्यांचे  प्रत्येक चित्र एक ‘ऱ्हिदम’ घेऊन प्रकटत असे. त्यांच्या  रेषांची गती, लय पाहणाऱ्याला नादमय विश्वात घेऊन जात असे आणि रेषा मोजक्या असल्या तरी त्यातील  ‘फोर्स’ दमदार असे. त्यामुळे त्यांचे व्यंगचित्र  कुठल्याही अडथळ्याविना रसिकांशी थेट संवाद साधू शकत असे. अगदी अपरिहार्य असेल तेव्हाच तेंडुलकर आपल्या व्यंगचित्रांना शब्दांची जोड देत, तीही त्यांच्या रेषांसारखीच मोजकी पण नेमकी असे.  

तेंडुलकरांमध्ये व्यंगचित्रकाराइतकाच  एक अभियंता दडला असावा, अशा पद्धतीने स्क्रू, हातोडी, जेसीबी, अन्य यंत्रे ..त्यांच्या चित्रांतून येत असत आणि चित्राचा आशय अधिक गडद करत असत. एखाद्या गायकाने चुस्त, शिस्तबद्ध रागमांडणी करावी, तसे तेंडुलकरांचे चित्र असे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जसे रागाचे नियम, वादी-संवादी, वर्ज्यावर्ज्य स्वर..यांची चौकट असते. ती सांभाळून रागविस्तार करण्याच्या अनेक शक्यता कलाकाराच्या हातात असतात. तेंडुलकरांचे व्यंगचित्रही  या चौकटी जपून अर्थाचे अवकाश व्यापक करत जाणारे असे. संगीतातली ‘उपज’ तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांतही जाणवत असे. कुठलीही ओढाताण, दिखाऊपणा त्यांच्या चित्रात नसे. विलक्षण सहजता हे त्यांच्या चित्रांचे कायमच वैशिष्ट्य होते. त्यांच्या चित्रांतली ही सहजता, साधेपणा हेही त्यांच्या लोकप्रियतेचे एक गमक होते. याबाबतीत ‘सादगी भी तो कयामत की अदा होती है’ हे कविवचन तेंडुलकरांना पुरेपूर लागू पडत असे. कुठलाही क्लिष्ट विषय सोपा करून मांडायची विलक्षण हातोटी तेंडुलकरांजवळ होती.  
 
तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांना विषयनिवडीचे कुठलेही बंधन नव्हते. कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. ‘एव्हरीथिंग अंडर द स्काय’ हाच विषय त्यांनी निवडला होता. एवढेच नाही तर या आकाशाखालच्या स्वत:लाही त्यांनी कधी वगळले वा अपवाद केले नाही. माझ्या आठवणीत पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात झालेले एक संमेलन आहे. तेव्हा आम्ही सर्व व्यंगचित्रकारांनी एकमेकांची किंवा परस्परांची कार्टून काढली होती. माझे कार्टून तेंडुलकरांनी रेखाटल्यावर, त्यांचे कार्टून काढावे म्हणून ते माझ्यासमोर बसले तेव्हा माझ्यावरचे दडपण जाणून ते म्हणाले,‘तू मला अजिबात स्पेअर करू नकोस. माझी यथेच्छ हुर्रेवडी (त्यांचा आवडता शब्द) उडव, मोकळेपणाने काढ,’स्वत:विषयी असे म्हणणारा आणि तसे वागणारा माणूस दुर्मिळच होता आणि आहे. माझ्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत कलेच्या क्षेत्रात इतक्या मानाच्या स्थानावरही इतका साधेपणा जपणारा कलावंत विरळाच आहे.  अनेकदा थोडा मोठेपणा, प्रसिद्धी, सन्मान लाभले की मंडळी रिझर्व्हड होऊ लागतात, फटकून वागू लागतात, हे मी नेहमीच अनुभवले आहे. पण तेंडुलकर याला अपवाद होते. सर्वार्थाने ज्येष्ठता असूनही त्यांची ‘सादगी’ (साधेपणा) त्यांनी टिकवली होती. वयाच्या सत्तरीनंतरही स्वत:च्या बाइकवरून ते एकटेच मुंबईला येत असत आणि भेटत असत. चाकोरीबद्धता त्यांच्या स्वभावातच नव्हती. काळानुरूप असणे हेही तेंडुलकरांचे वेगळेपण होते. नव्या काळाची पावले ओळखून ते सतत स्वत:ला आणि आपल्या कलेला अपडेट ठेवत असत. त्यांनी नुकतीच फेसबुकवर अपलोड केलेली त्यांची व्यंगचित्रे याची साक्ष देतात. त्यामुळेच तेंडुलकर कधीच ‘जुने’ वाटले नाहीत. उमलत्या वयाच्या कलाकारांना त्यांच्याकडून नेहमी प्रोत्साहन, उत्तेजन आणि कौतुक मिळत असे. नवोदितांच्या प्रदर्शनाला ते आवर्जून भेटी देत, काम पाहून कौतुक करत आणि योग्य वाटेल तिथे सूचनाही करत. माझे भाग्य असे की माझ्या ‘व्यंगनगरी’ या पुस्तकाचे प्रकाशनही तेंडुलकरांच्या हस्ते झाले. कुठलेही आढेवेढे न घेता, अटी पुढे न करता सदैव मदतीला तत्पर असण्याची त्यांची वृत्ती, त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित करत असे.  
 
सुदैवाने तेंडुलकरांना आयुष्याची जोडीदारीणही त्यांना पूरक अशीच मिळाली. वहिनींच्या समंजस, जबाबदार आणि स्नेहमय स्वभावाच्या साथीने तेंडुलकरांच्या कलाजीवनाला सुंदर जोड लाभली. या उभयतांच्या प्रेमळ आतिथ्याचा लाभही मला अनेकदा घेता आला. कलाकार म्हणून स्वत:ला समाजापासून त्यांनी कधीच वेगळे मानले नाही. त्यांच्या सामाजिक जाणिवा विलक्षण तरल होत्या. गेल्या अनेक वर्षांतील व्यथित करणाऱ्या अनेक सामाजिक घटना, प्रसंगांवर तेंडुलकर ‘व्यक्त’ झालेले साऱ्यांनी पाहिले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला शिस्त यावी, यासाठी गेली १७ वर्षे मी त्यांना नियमितपणे कर्वे रस्त्यावरच्या चौकात वाहतूक नियमन करताना पाहिले आहे. आपल्या कलेच्या माध्यमातूनच ‘व्यक्त’ होण्याच्या जोडीने समाजघटक म्हणून अत्यंत जबाबदारीने वागणाऱ्या तेंडुलकरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.  
       
(शब्दांकन : जयश्री बाेकील)
बातम्या आणखी आहेत...