आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा अश्वमेध रोखणे अवघड! पण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे येत्या १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. याची घोषणा त्यांनी शुक्रवारीच केली. १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तब्बल एक वर्षानंतर पुन्हा सत्तेत येण्याचे ते स्वप्न पाहत आहेत. प्रचारात प्रत्येक पक्ष आम्हीच सत्तेत येत आहोत हे सांगत असला तरी कोणाचे सरकार येईल याबाबतचे अंदाज आधीच आलेले असतात. परंतु दिल्लीतील स्थिती वेगळी आहे. २०१३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे सरकार येईल, असे अंदाज व्यक्त होत होते, परंतु अवघे तीन आमदार कमी पडल्याने त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले. यावेळी मात्र भाजप आणि आम आदमी पार्टी दोन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ सामना होताना दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीच्या या निवडणुकीत संपूर्ण ताकद लावली आहे.

केंद्रातील मंत्री चौका-चौकात मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. हीच मंडळी मंत्री झाल्यानंतर सामान्य लोकांना भेट देत नाही. अशा मंत्र्यांना मोदींनी चौकाचौकात उभे केल्याचे चित्र असले व आम्ही दिल्लीसाठी अमूक-तमूक करू, असे आश्वासन देत असले तरी हे मंत्री सामान्य मतदारांना आपलेसे करण्यात असमर्थ ठरत आहेत. या मंत्र्यांवर दिल्लीतील मतदारांकडून जोरात टीका व्हायला लागल्या आहेत. भाजपचे सव्वाशे खासदार दिल्लीत फिरत आहेत, नुक्कड सभा घेत आहेत २०-२५ लोकांच्या समुदायापुढे मोदीपुराण सांगत आहेत. स्वत: नरेंद्र मोदी यांनी प्रचार सुरु केला आहे. सलग चार दिवस ते सभा घेतील एकूणच सर्व हायप्रोफाइल नेत्यांकडून भाजपचा प्रचार होत आहे. केंद्रातील मोदी सरकारनंतर प्रचाराचे असे चित्र दिल्लीत पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. अशाही स्थितीत केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तारीख घोषित करणे याला त्यांचा आत्मविश्वास म्हणावा लागेल.

भाजपचे नेते ज्या मतदारांपर्यंत पोहोचत आहे तो मुख्यत्वे मध्यमवर्ग आणि त्यावरचा त्यांचा भर आहे. दिल्लीत सामान्यांसोबत मतदारांचा मोठा वर्ग झोपडपट्टीत राहणारा आहे. याच लोकांचे मतदान मोठ्या प्रमाणात होते. यांच्याच मतदानाच्या टक्केवारीवर कोणाचे सरकार येऊ शकते याचा अंदाज बांधला जातो. प्रचाराला फक्त तीन दिवस उरले आहेत, परंतु भाजप या समुदायापुढे पोहोचू शकला नाही. वस्त्या-वस्त्यांमधली घाणही भाजपच्या नेत्यांना दाराेदारी जाण्यापासून मज्जाव करीत आहे. याचा संपूर्ण फायदा आम आदमी पार्टी घेताना दिसत आहे. दिल्लीतील कोणत्याही भागात गेल्यास आणि भाजी विकणार्‍यास विचारले तर तो ‘झाडू’ असेच सांगतो. अरविंद केजरीवालांचा प्रामाणिकपणा, लोकांमध्ये मिसळणे हे लोकांना अद्यापही भावत आहे. शिवाय भाजपने केजरीवाल यांच्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करून दररोज त्यांना पाच प्रश्न विचारणे, त्यांचा ढोंगीपणा काढणे आणि त्यांना डिवचेल अशा जाहिराती देणे याचा सपाटा सुरु केला आहे. उच्च मध्यम मतदारांमध्ये भाजपकडून होणार्‍या टीकेची कदाचित दखल घेतली जात असेलही, परंतु येथील सामान्य मतदारांना या गोष्टीशी काहीही देणे-घेणे नाही.

अण्णा हजारे यांच्यापासून केजरीवाल आणि किरण बेदी आज दूर असले तरी िदल्लीत अण्णांचे महत्त्व कमी झालेले नाही. लोकपालसाठी लढणारा लढवय्या म्हणून त्यांचे नाव घेतले जाते आणि सर्वच पक्षातील नेत्यांना अण्णांच्या या आंदोलनाचा धाकही वाटतो. केजरीवाल आणि बेदींच्या पाठिंब्याने अण्णांचे रामलीलावरील आंदोलन प्रचंड यशस्वी झाले होते. ती किमया दिल्लीत यापुढे अण्णा दाखवतील किंवा नाही यावर भाष्य करणे याक्षणी योग्य होणार नसले तरी त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर होणारी टीका लोक सहन करण्याच्या मानिसकतेतील नाही हेही तेवढेच सत्य आहे.
जाहिरातीमध्ये अण्णांच्या फोटोवर हार टाकून भाजपने संकट ओढवून घेतले आहे. याचा फायदा अरविंद केजरीवालांनाच होणार आहे. दुसरे असे की, भाजपसाेबत असलेला मुसलमान मतदारही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रियतेमुळे काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाकडे जात आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना प्रत्येक मतदारसंघात जाण्यास सांगितले असल्याने मतदारांच्या मोदींबाबतच्या ज्या भावना आहेत त्यात ऱ्हास होत चालला आहे. किरण बेदींच्या नेतृत्वामुळे दिल्लीतील अस्वस्थ नेते सावरल्यागत वाटत असले तरी सतीश उपाध्याय, जगदीश मुखी आदींच्या कार्यकर्त्यांमधील प्रचाराचा उत्साह मावळला आहे. उलट आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी विविध राज्यांतून आलेले कार्यकर्ते हे दारोदारी जात आहेत. भाषानिहाय त्यांचा प्रचार सुरू आहे.

याचा परिणाम आम आदमी पार्टीसाठी सकारात्मक असला तरी याही पक्षात हेवेदावे खूप आहेत. प्रारंभी शांती भूषण यांनी किरण बेदी यांची केलेली स्तुती केजरीवालांना अडचणीची ठरली. प्रशांत भूषण आणि कुमार विश्वास हे अद्यापही मैदानात दिसत नाहीत. अरविंद केजरीवालांकडे मतदारांना दाखविण्यासारखा मोठा चेहरा नाही. एकला चालो रे नारा देत केजरीवाल दिल्लीव्यापी अभियान राबवित आहे. यात ते मोदींना चांगलाच घाम फोडत आहे. बराक ओबामा यांचे दिल्लीत येणे, किरण बेदींनी प्रचारात ओबामांना ‘कॅश’ करणे आणि मोदींचा झंझावात या सगळ्यांवर दृष्टिक्षेप टाकला तर दिल्लीत भाजपचे सरकार येणे अनिवार्य आहे. एकूण परिस्थितीत मोदींचा अश्वमेध रोखणे केजरीवालांना अवघड आहे, परंतु हा फासा पलटलाच तर मोदी लाट थांबविण्याचे संपूर्ण श्रेय अरविंद केजरीवाल यांना जाईल!