आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांच्या हितासाठीच आटापिटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भट्ट यांच्या अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी तंबाखूची महती सांगितल्याने सगळ्यांच्या झोपा उडाल्यात. संपूर्ण देशात तंबाखूची चर्चा व्हायला लागली. या देशात गांधी नाव प्रभावी आहे. कोणताही गांधी बोलला तरी तो राष्ट्रीय विषय होतो. दिलीप गांधींनीही तंबाखूच्या निमित्ताने चर्चेत येण्याची संधी घेतली आणि स्वत:च पायावर धोंडा मारून घेतला.

कॉंग्रेस आणि भाजपच्या गांधींमधला हा फरक आहे. दिलीप गांधी संकटात आहे हे पाहून बोटावर मोजणारे काहीजण त्यांचे समर्थन करीत आहेत; तेही भाजपच्याच तंबुतले आहेत. तर बहुतांश लोक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांपासून तर समाजसेवक अण्णा हजारेंपर्यंत सगळ्यांनी गांधींची ‘अक्कल’ काढली. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तंबाखूमुळे कर्करोग कसा होतो याच्या लिंक्स सोशल मीडियावरून धाडू लागले आहेत. या तज्ज्ञांच्या मते ते संशोधन आहे.

भारतात दरवर्षी दहा लाख मृत्यू हे तंबाखूमुळे होतात. त्यात तंबाखूजन्य पदार्थ जसे सिगारेट, गुटखा, बिडी आदींचा समावेश आहे. काही कर्करोगाने तर काही हृदयरोगाचे बळी पडतात. भारतात दररोज पाच हजार नवे तरुण गुटखा किंवा तंबाखू चाखतात. मुंबई, नागपूर आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये कर्करोग व अन्य वैद्यकीय तज्ज्ञ तंबाखूच्या विरोधात प्रबोधनाचे काम करीत आहेत. ही मंडळी स्वत:ची प्रॅक्टिस सांभाळून समाजासाठी वेळ काढतात, विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना गुटखा, तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती देतात त्यामागची तळमळ समजून घेणे गरजेचे आहे. याच अभियानातून ‘‘गु’टखा’’ आज्ञाक्षरातच सर्व काही, तरीही लोक आवडीने खाई, अशी म्हण तयार करण्यात आली. किमान ही म्हण वाचल्यावर तरी लाेकांना तंबाखू, गुटखा हातात पकडण्याची किळस वाटेल हा त्यामागचा हेतू आहे. परंतु एकदा माणूस व्यसनाधीन झाला की त्याला आपण काय करतो हे कळतही नाही त्याचे स्वत:वर नियंत्रण नसते.

महाराष्ट्राचे लाडके नेते आर. आर. पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्याला कारण तंबाखू होते, त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली तर त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी तंबाखू खाणार नाही याविरोधी मोहीम राबवू असा संकल्प केला. तंबाखू प्रकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याही अंगलट आले होते. नशीब बलवत्तर म्हणून त्यातून ते सुटले. तंबाखूमुळे कर्करोग होतो यासाठी ही दोन उदाहरणे पुरे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखूजन्य पदार्थामुळे किती नुकसान झाले याचे भयावह आकडे मांडले आहेत. अंगाचा थरकाप सोडणारे हे आकडे आहेत. तरीसुद्धा दिलीप गांधी यांना तंबाखूमुळे कर्करोग होतो यावर संशोधन झाले नाही असे वाटते. तंबाखू खावा ही त्यांची तळमळ दिसून येत नाही. मात्र, तंबाखूच्या नावाने जे विरोध करतात त्याबद्दल त्यांना राग आहे. गांधी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत तंबाखू, गुटख्यावर बंदी आली तर त्या चार कोटी लोकांच्या रोजगाराचे काय होईल? हा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. जो शेतकरी तंबाखूचे उत्पादन करतो, जो विड्यांसाठी तेंदुपाने वळतो त्यांचे काय होईल याकडे सहानुभूतीने पाहत असल्याचे ते सांगतात. परंतु हे केवळ ढोंग आहे असे म्हणावे लागेल. गुटखा निर्मात्यांचा धंदा बंद झाल्यास त्यांचे कसे होईल? हा खरा प्रश्न आहे.

अल्पवयीन मुलांना गुटख्याच्या नादी लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या गुटखा किंगच्या अस्तित्वाचा प्रश्न खासदार दिलीप गांधींच्या पुढे निर्माण झाला असू शकतो. देशात गुटखा किंगची लॉबी अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे दरवर्षी किती लाख लोक या देशात मरतात हा विषय गौण ठरतो. सुनामीमध्ये मरणार्‍यांपेक्षाही ही आकडेवारी कितीतरी पटीने अधिक आहे आणि ही माणसे बोटावर मोजल्या जाणार्‍या उद्योगपतींनी चिरडलेली असतात. तरीही या उद्योजकांना सन्मानाची वागणूक मिळते. ही मंडळी राजकारण्यांवर दबाव निर्माण करून आहेत. दिलीप गांधी यांच्या मनातील अस्वस्थता ही अनेक राजकीय नेत्यांची आहे. त्यामुळे यावर देशातील कितीही सुज्ञ लोकांनी आकांडतांडव केले तरी तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आणणे अवघड आहे. केंद्र सरकारने तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावर मोठ्या अक्षरात आणि चित्रमय स्वरूपात या पदार्थाच्या सेवनामुळे होणार्‍या दुष्परिणामांबाबत माहिती देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

त्यामुळे अशा जाहिरातींमध्येही तसा उल्लेख असतो. परंतु या सूचना धड वाचताही येत नाही. तक्रारी झाल्यानंतर केंद्र सरकारने आधीच्या ४० टक्के जागेऐवजी आता दुष्परिणामाची सूचना देण्याचे प्रमाण ८५ टक्के केले आहे. मात्र, दिलीप गांधी यांच्या समितीचा त्यास विरोध आहे. या उत्पादनास होणार्‍या हानिकारक सूचना स्पष्टपणे देऊ नका, या मताचे ते आहेत. हे थांबवण्यासाठीची शिफारस त्यांनी सरकारकडे केली आहे. यातूनच खासदार दिलीप गांधी यांचे उद्याेजकप्रेम स्षष्टपणे उघड होते.

विकास झाडे, नवी दिल्ली.