आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगीत तालमीत काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांत रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. यापूर्वी वाशीम जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी जोर लावला. पण काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार जिल्हा परिषद सदस्य तर सहा पंचायत समिती सदस्य निवडून आले. शिवाय या ठिकाणी भारिप-बमसंलासुद्धा चांगली मते पडली असून, या विधानसभा मतदारसंघाचा अकोला लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे विधानसभेची पोटनिवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होईल का, याचे चिंतन काँग्रेसने करणे गरजेचे झाले आहे.


रिसोड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष झनक यांचे 28 ऑक्टोबरला निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. येथे होणार्‍ या पोटनिवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. त्या दृष्टीनेच जिल्हा परिषद निवडणूक लढवली गेली. रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांत काँग्रेसला जरी 50 हजारांच्या जवळपास मते मिळाली असली, तरीही पहिल्यादांच आपले उमेदवार जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवणार्‍या मनसेनेही रिसोड-मालेगावमधून 14 हजार 400 मते घेतली आहेत. यात रिसोड तालुक्यात त्यांना 10 हजार 370 मते आहेत. रिसोड पंचायत समितीत मनसे सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. शिवाय भारिप-बमसंनेही या दोन तालुक्यांत 15 हजार 57 मते मिळवली आहेत. विशेष म्हणजे या दोन तालुक्यांचा अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो. त्यामुळे भारिप-बमसंला जिल्हा परिषदेमध्ये पडलेली ही मते लोकसभेसाठीसुद्धा निर्णायक ठरू शकतात. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.


काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक 17 सदस्य जरी निवडून आले असले, तरीही त्यांना हादरा बसला आहे. वाशीम जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल राहिला आहे. जिल्हा निर्मितीपासून जिल्हा परिषदेत काँग्रेस सत्तेत आहे. 2008 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 16-16 सदस्य निवडून आले होते. भाजप नऊ, शिवसेना पाच आणि भारिप-बमसंचा एक सदस्य जिल्हा परिषदेत होता. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र यामध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेसची एक जागा वाढली. पण अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पानीपत झाले. त्यांच्या जागा निम्यावरच आल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ आठच सदस्य जिल्हा परिषदेमध्येही आहेत. त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कारंजालाड तालुक्यात भारिप-बमसंचेही तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत. शिवाय कारंजालाड, मंगरुळपीर, मानोरा आणि वाशीम या चार पंचायत समित्यांसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस हातून निसटल्यात. शिवसेना-भाजप युतीला 15 जागेवर मतदारांनी निवडून दिले, तर भारिप-बमसंच्या दोन जागा वाढल्याने आता त्यांचे तीन जिल्हा परिषद सदस्य झालेत. शिवसेना आणि भाजप वाढलाही नाही आणि कमीसुद्धा झाला नसल्याचे या निवडणुकीत दिसून आले. पण, या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी समोर आली. त्यामुळेच त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. याचा परिणाम या पक्षाच्या संघटन बांधणीवर होणार आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्वच गट एकत्र आल्याने त्यांचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असले, तरीही रिसोड तालुक्यात मनसेला मिळालेल्या यशामुळे रिसोड विधानसभेच्या पोटनिवडणुकीवर परिणाम होईल का आणि अकोला लोकसभा निवडणुकीत या दोन तालुक्यांतून भारिप-बमसंला फायदा झाला तर, याचे चिंतन काँग्रेसने करणे गरजेचे झाले आहे.