आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमादित्य : भारतासाठी सुवर्णक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हो.. हो... हा सुवर्णक्षणच नाही का? भारतासाठी... भारतीयांसाठी... भारतीय नौसेनेसाठी? कारण आज जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकेचे म्हणजे ‘आयएनएस विक्रमादित्य’चे भारतीय नौसेनेत आगमन झाले. हा सोहळा संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या हस्ते रशियाच्या सेर्व्हेदोविस्क बंदरात शनिवारी झाला. या सुवर्णक्षणाचे महत्त्व व त्यामुळे वाटणारा अभिमान यामुळे भूतकाळ माझ्या दृष्टिपटलावरून एका चलचित्रासारखा धावू लागला.
साधारण दीड वर्षापूर्वी कोचीन येथे कार्यरत असताना माझ्या पती महोदयांची रशियात नवीन युद्धनौका विक्रमादित्यच्या टीममध्ये निवड झाल्याचे पत्र मिळाले. ही अत्यानंदाची गोष्ट. सोबत अनेक प्रश्न, म्हणजे कधी जाणार? परत कधी येणार? आमची काय सोय करणार? सगळेच प्रश्न अनुत्तरित!
हळूहळू एकेका प्रश्नावर विचार करत, मात करत, मी व माझ्या दोन मुलांना औरंगाबादला शिफ्ट करून माझे मिस्टर मुंबईला विक्रमादित्य सेल (ऑफिस)ला रुजू झाले. तिथून सुरू झाली त्यांची प्रशिक्षणांची शृंखला! म्हणजेच रशियन भाषेपासून ते सी डायव्हिंग, फायर फायटिंग, नवीन यंत्रणेची माहिती आणि इतर बरेच काही. त्यांची रशियाला 30 जून 2013 ला जाणा-या एका टीमबरोबर रवानगी झाली. तिथे गेल्यावर विक्रमादित्यच्या प्रथम दर्शनाचे वर्णन त्यांनी अबब! या शब्दातच केले. एका नजरेत न सामावणारी नौका त्यांनी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. या जहाजाचा इतिहास तब्बल 25 वर्षांचा आहे. 1978 पासून जहाज बांधणीला सुरुवात झाली. 10 डिसेंबर 1987 मध्ये ‘बाकू’ या नावाने ही सोव्हिएत नेव्हीची शान बनली. त्याचे 4 ऑक्टोबर 1990 मध्ये ‘अ‍ॅडमिरल गॉशकोव्ह’ असे पुन्हा नामकरण झाले. आर्थिक अडचणीमुळे तिला 1996 मध्ये रशियन नौसेनेच्या बाहेर करण्यात आले.
2004 मध्ये या युद्धनौकेवर भारताची मोहोर लागली आणि 2005 पासून ती आपल्यासाठी ‘विक्रमादित्य’ झाली. नंतर काँट्रॅक्ट्स, निगोशिएशन्स आणि कामे करून 17 वर्षांनंतर म्हणजे जून 2012 ला तिने 180 दिवसांच्या समुद्रपरिभ्रमण चाचण्या पूर्ण केल्या. प्रथमच ‘मिग’ विमाने त्यावर उड्डाणे घेऊ लागली आणि ती युद्धनौका बनली आणि तीसुद्धा महाकाय विमानवाहू युद्धनौका!
नंतर दुस-या चाचणीसाठी 3 जुलै 2013 ते 20 सप्टेंबर 2013 ही नौका 80 दिवसांसाठी पांढरा समुद्र, बॅरंड समुद्र पादाक्रांत करून आली. हे संपवून परत येताना रशियाच्या ‘सेवमाश’ बंदरावर आप्तस्वकीयांसमवेत तिचे साश्रुनयनांनी स्वागत झाले. ते अविस्मरणीय आहे. या कालावधीत माझ्यासारख्या कित्येक नौसैनिकांच्या परिवाराला आपल्या माणसापासून दूर राहावे लागले. ‘संदेसे आते है’ या गाण्याप्रमाणे बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले. रशियातील सर्वात मोठे दिवस, अति थंड तापमानात (-10 ते 4 अंश) राहावे लागले; पण आजचा हा सोहळा म्हणजे त्या सर्वाचे सार्थक झाले, असे म्हणावे लागेल.
गर्व है हमें ‘विक्रमादित्य’ पर
गर्व है हमें ‘भारतीय नौसेना’ पर
गर्व है हमें ‘हिंदुस्थान’ पर
जय हो!
(लेखिका नौदलातील सर्जन कॅप्टन एस. एन. कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत.)