आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासभाऊंची पृथ्वी प्रदक्षिणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमापती कैलासनाथ महादेव जगन्माता पार्वतीसह नंदीवर आरूढ होऊन जगाची सुखदु:खे जाणून घेण्यासाठी आकाशमार्गे भ्रमण करीत होते. आकाशात नुकताच पौर्णिमेचा चंद्र उगवला होता आणि पृथ्वीवरचे सारे यथास्थित दिसत होते. शिवशंभो आणि पार्वती गप्पांमध्ये रंगले होते. तरीही माता पार्वतीचे लक्ष पृथ्वीवरील एका दृश्याने वेधून घेतले. एके ठिकाणी समुद्रावरून जाणा-या सेतूच्या एका टोकाला दोन गाड्या उभ्या होत्या आणि गाड्यांपासून थोड्या अंतरावर दोन माणसे एकमेकांशी बोलत होती. त्या वेळी सेतूवरची वाहतूक बंद होती. म्हणून दोन्ही माणसे सहेतुक बोलत उभी होती. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. हे पाहून माता पार्वती शंकरास म्हणाली, स्वामी, तुम्ही त्रिकालद्रष्टे आहात. सागरी सेतूवर अशा रात्रीच्या वेळी बोलत असणारे ते दोन मनुष्य कोण आहेत आणि ते का बोलत आहेत, ते कृपया सांगावे.


जगन्माता पार्वतीची इच्छा शंकरास प्रमाण नाही असे कधी झाले आहे का? शंकराने नंदीस आज्ञा केली. नंदी दोघांपासून थोडे अंतर राखून अलगद सेतूवर उतरला. शंकराने दोघांचे निरीक्षण केले. थोडे चिंतन केले आणि सा-या सृष्टीचे नाथ भोलेशंकर बोलू लागले, पार्वती, तुला मी आता सारी हकीकत सांगतो. ती तू मन:पूर्वक ऐक. म्हटली तर गोष्ट कालची आहे. म्हटली तर आजची आहे. आणि कदाचित उद्याची असेल... दंडकारण्य होते तेव्हापासून ही गोष्ट चालत आलेली आहे. गोष्ट विदर्भ देशीची आहे. विदर्भ प्रदेश फार प्राचीन आहे. प्रभू रामचंद्रांचे आजोबा अज राजा यांना विदर्भराजाची कन्या दिली होती. योगेश्वर श्रीकृष्णाची आवडती पत्नी रुक्मिणी विदर्भदेशीचीच होती. नल- दमयंती एवढेच नव्हे तर कालिदासाचे सासर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ विदर्भातीलच होते. यावरून विदर्भाचे महत्त्व किती प्राचीन आहे हे तू लक्षात घे, असे म्हणून शंकराने पार्वतीला वृत्तांत कथन केला.


नीरव शांततेत बोलणारी ती दोन माणसे म्हणजे दुसरे -तिसरे कुणी नसून नागपूरचे खासदार विलासभाऊ मुत्तेमवार आणि महाराष्टÑ देशीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. काँग्रेस या पक्षाचेच दोघे आहेत. पृथ्वीराजबाबा चव्हाण हात राखून तर विलासभाऊ हात सोडून बोलतात. सध्या कुठल्याच पदावर नसल्याने आणि बुडाखाली लाल दिवा नसल्याने विलासभाऊंना एकदम विदर्भाचे प्रेम दाटून आले आहे. सत्तेची पदे मिळवण्यासाठी विदर्भाचे रिवायटल घेण्याची काँग्रेसवाल्यांची जुनी सवय आहे. तर पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी वेगळ्या विदर्भालाच विरोध केला आहे. त्यावरून विलासभाऊ चांगलेच संतापले आहेत. सध्या विदर्भावरून ऐन पावसाळ्यातही वातावरण चांगलेच तापलेले आहे. दोघांच्याही मागे दांडेकर (माइक घेतलेले इलेक्ट्रॉनिक मीडिया) लागलेले असल्यामुळे त्यांनी बोलण्यासाठी ही निवांत वेळ निवडली. पण, नाथ ते काय बोलले ते तरी सांगा. तेव्हा महादेव म्हणाले, त्यांचे संवाद अगदी लाइव्हच बघ ना...आणि नंदीच्या डोळ्यात दोघांचे संवाद दूरचित्रवाणीसारखे लाइव्ह दिसायला लागले. पृथ्वीराजबाबा - विलासराव, तुम्ही विदर्भाची मागणी सोडून देणार आहात की नाही?


विलासभाऊ - पहिली गोष्ट मी राव नाही, भाऊ आहे. ते राव वगैरे तुमच्या पश्चिम महाराष्टÑात म्हणत असतील. आणि विदर्भाचे म्हणाल तर मागणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही...


पृथ्वीराजबाबा - विलासभाऊ, तुम्ही हात दाखवून अवलक्षण करीत आहात असे नाही वाटत...
विलासभाऊ - अजिबात नाही. तुम्ही नेहमीच आमच्यापासून हात राखून राहत आला. विदर्भाला काही देताना तुमचा हात नेहमी आखडता राहिला. विदर्भाने नेहमी काँग्रेसला हात दिला. तुम्ही मात्र विदर्भाला हातोहात फसवले. असे असतानाही तुम्ही विदर्भाला विरोध करीत आहात.


पृथ्वीराजबाबा - विदर्भाला नाही, वेगळ्या विदर्भाला विरोध आहे माझा...
विलासभाऊ - असे आम्हालाही बोलता येते. मी तुम्हाला सांगतो. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही विचार करा. नाहीतर विदर्भाची जनता काँग्रेसला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही.
पृथ्वीराजबाबा -काँग्रेसमध्ये विचार करण्याची पद्धत नाही. सा-या गोष्टी निवडणुकीवर डोळा ठेवून होतात. तुमचेही तेच सुरू आहे. तुम्ही सात वेळा खासदार म्हणून निवडून आलात. काय केले विदर्भासाठी? केंद्रात अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री होता. विदर्भातील एक तरी शहर सोलर सिटी केले का?


मी सांगतो विलासभाऊ, अजूनही वेळ गेलेली नाही. वेगळ्या विदर्भाचे तुणतुणे वाजवणे बंद करा. मी मॅडमशी बोलतो. युवराज राहुलबाबांनाही सांगतो. एखादे मंत्रिपद नक्की मिळून जाईल.


विलासभाऊ - ठीक आहे. प्रस्ताव मला मान्य आहे. मी जनतेला नेहमी वेगळ्या विदर्भाचे गाजर दाखवतो. तुम्ही मात्र तसे करू नका. कारण मी तुमचा आदर करतो. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि हात हलवून एकमेकांचा निरोप घेतला...