आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे ! मनसेचा टक्का का घसरला?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तेलकट बटाटावड्याचे’ वक्तव्य, मोदींना जाहीर केलेला एकतर्फी पाठिंबा, विदर्भातील शेतकर्‍याला सांगणे, की बाबा रे एकवेळ तुम्ही आत्महत्या करा, पण तुमची दुर्दशा करणार्‍याला मारून मरा किंवा फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची वरकरणी राजकीय शहाणपणाची वाटणारी पण भावनिक कसोटीवर मराठी मनाला कदाचित दुखावून गेलेली खेळी. कारणे काहीही असोत, पण राज ठाकरेंच्या लोकप्रियतेचा टक्का घसरतोय हे नाकारता येणार नाही. फक्त अचूक राजकीय टायमिंग आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपली हुकुमाची पाने हातात ठेवून फक्त दुर्री तिर्रीच्या आधारे समोरच्याला घायकुतीला आणणारी ती गॅम्बलिंगची जादू अचानक नाहीशी कशी झाली?.. का चुकताहेत अगदी आत्तापर्यंत हमखास वठणार्‍या राज ठाकरेंच्या चाली? का घटतेय मनसेच्या सभांमधली संख्या?..माना किंवा मानू नका, पण हे प्रश्न निर्माण झाले आहेत हे खरे आहे..

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी अगदी ऐनभरात आली आहे. गल्लीबोळापासून अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या नेते मंडळींनी स्वत:ला या ‘राष्ट्रीय कार्यासाठी’ वाहून घेतले आहे. मात्र गेल्या लोकसभेच्या प्रचारात सत्ताधारी आघाडी आणि शिवसेनेला दे माय धरणी ठाय करून सोडणार्‍या राज ठाकरेंची जादू यंदा ओसरल्यासाखी दिसते आहे. दिवसागणिक त्यांच्या सभांमधली खालावत चाललेली उपस्थिती हा मनसेच्या चिंतेचा विषय ठरतो आहे. मुंबई आणि नाशिकसारख्या बालेकिल्ल्यांमध्येही पाच दहा हजारांची गर्दी जमवण्यात येत असलेले अपयश मनसेच्या अडचणीत भर घालते आहे. शिवाय आलेल्या गर्दीतही गारूड केल्यागत राज ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद देणारा तो बेभान तरुण चेहरा हरवत चालला आहे. खरं तर राज यांच्या भाषणात येत चाललेला तोच तोपणा हे कदाचित त्याचे कारण असू शकेल. कारण गोदावरी नदीच्या किनार्‍याचे मी कसे सोने केले इथपासून ते राज्यातील गडकिल्ले कसे जपले पाहिजेत इथपर्यंत त्यांच्या भाषणातील मुद्द्यांचा संगतवार लावलेला क्रम आता नवा राहिला नाही. शिवाय उद्धव ठाकरेंच्या आजारपणादरम्यान त्यांना दिलेल्या भावनिक आधाराची जाहीर वाच्यता आणि बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या दिवसांमधील ‘दोन इवल्याशा तेलकट बटाटेवड्यांची आणि चिकन सूपची गोष्ट’ बहुदा त्यांच्या चाहत्यांमधील एका मोठ्या वर्गाला दुखावून गेली आहे. त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीत भाजपशी छुपी युती करत फक्त शिवसेनेसमोरच आपले उमेदवार उभे करून आपली ‘औकात’ शिवसेनेला दाखवण्याची त्यांची राजकीय खेळीही त्यांच्या पाठीराख्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे करून गेली.

बरे इतके करून शिवसेनेची कोंडी होण्याऐवजी राज यांच्या या खेळीने उलट त्यांचीच कोंडी झाली आहे. आपल्या प्रत्येक भाषणात मोदींच्या नेतृत्वाची स्तुती करून आणि त्यांना एकतर्फी पाठिंबा देत राज यांनी मतदारांच्या मनातला संभ्रम कायम ठेवण्याची काळजी घेतली. पण परिणाम उलटाच झाला. मोदींचा अधिकृत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मत देण्यापेक्षा मनसेलाच मत द्या, ही भूमिका मतदारांना कशी पटवून द्यावी,असा प्रश्न उलट मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येच निर्माण झाला. शिवाय मनसेच्या या भूमिकेमुळे उत्तर भारतीय मते दुरावतील आणि राज्यात शिवसैनिकांच्या रोषाचे धनी झाल्याने आपले उमेदवारच धोक्यात येतील हे लक्षात येताच भाजपनेही मनसेवर डोळे वटारले. ‘मागितला नाही तरीही पाठिंबा का देता’ हे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे शब्द बहुदा मनसेला भानावर आणण्यासाठी पुरेसे ठरावेत. म्हणूनच भाजपच्या या नव्या भूमिकेमुळे आता प्रचाराच्या ऐन मध्यावर मनसेला आपला प्रचाराचा रोख बदलण्याची गरज भासू लागली आहे. शुक्रवारी मुंबईच्या गिरगावातील सभेत राज यांच्या भाषणात मोदींचा उल्लेखही न होणे हे बहुदा या बदललेल्या रणनीतीचे संकेत असावेत.

या सगळ्या तत्कालीन मुद्द्यांचा त्यांच्या सभेतील गर्दी घटण्याशी संबंध आहे, हे जरी खरे असले तरी पण हा अचानक झालेला बदल नाही तर या बदलाचे संकेत गेल्या वर्ष सहा महिन्यांपासूनच मिळायला लागले होते. नुकत्याच झालेल्या टोलविरोधी आंदोलनातही ते प्रकर्षाने जाणवले होते. स्वत: राज ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतरही आंदोलनाने पहिल्या चार तासांतच मान टाकली. रोजगाराच्या आपल्या न्याय्य संधी हिरावणार्‍यांचा बंदोबस्त करा, या भावनिक उन्मादाचा भर ओसरल्यावर मग मराठी अस्मितेच्या मुद्द्याच्या पुढे काय असा प्रश्न जर या स्थानिक तरुणवर्गाला पडला असेल तर ते स्वाभाविक मानले पाहिजे आणि जर त्याची समाधानकारक उत्तरे या तरुण वर्गाला मिळत नसतील तर तो पक्षापासून दुरावणेही तितकेच स्वाभाविक आहे. अगदी राज ठाकरेंच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ या न्यायाने हा तरुणवर्ग त्यांच्यापासून दुरावतो आहे ही वस्तुस्थिती आहे.

म्हणूनच ‘लोकसभा निवडणूक संपू दे मग बघतो या राज्यातील टोलचे काय करायचे ते’ अशा वाक्यांवर आता पूर्वीसारख्या टाळ्या आणि शिट्या का मिळत नाहीत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आतापर्यंत दोनदा याच टोलविरोधी आंदोलनात रस्त्यावर उतरून अंगावर केसेस घेतलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याने तिसर्‍या आंदोलनात तरी या मुद्द्याचा निकाल लागेल अशी अपेक्षा कशी धरावी? दुसरे म्हणजे ‘ हाती सत्ता द्या विकास करतो’ या आवाहनावर विश्वास ठेवून नाशकातल्या ज्या मतदाराने त्यांच्या हाती सत्ता सोपवली त्याला जर तो बदल दिसत नसेल तर त्याने पुन्हा कोणत्या आधारावर विश्वास दाखवावा?.. शेवटी काय तर मनसेच्या लोकप्रियतेचा टक्का घसरतोय याचे संकेत मिळू लागले आहेत आणि त्यावर वेगाने पावले उचलण्याशिवाय तरणोपाय नाही.