आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishram Dhole Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

मराठीला वैभव मिळवून देण्याचा एक मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट हे छपाई यंत्रासारखे संवादाचे फक्त एक तंत्रज्ञान नाही. ती विविध संवाद तंत्रज्ञानाची एक मोठी व्यवस्था आहे. म्हणूनच या व्यवस्थेला मराठीने कसा प्रतिसाद दिला आणि देत आहे हा खरेतर एक उपप्रश्न. पण, आपल्यासाठी खूप महत्त्वाचा.

या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. इंटरनेटवरील मराठीतील व्यवहाराची एकूण स्थिती समृद्ध वगैरे म्हणण्यासारखी तर अजिबात नाही. इंग्रजीशी तुलना केली तर अगदीच दरिद्री म्हणावी आणि आपल्या जवळची भाषाभगिनी असलेल्या हिंदीशी तुलना केली तर कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणावी अशी. आता ही आर्थिक रूपकं थोडी वादग्रस्त असतीलही; पण त्यामागचा अनुभव नाही. अगदी विकीपिडियाच्या हिंदी आवृत्तीच्या तुलनेतही मराठी विकीपिडियाचे खुरटेपण, किरटेपण दिसून येते. अशी अनेक उदाहरणे आहेत; पण म्हणून लगेचच हातपाय झटकायला काही अर्थ नाही. मराठीचे दैन्य आणि इंग्रजीची समृद्धी यातील तफावत कमी करण्याची एक खूप मोठी ऐतिहासिक संधी इंटरनेटची हीच माध्यमव्यवस्था आज आपल्याला उपलब्ध करून देत आहे. मराठीतील छापील मजकुराची निर्मितीच संथ आणि आकारमानाने कमी आहे हे ऐतिहासिक वास्तव आहे. या गरिबीचा वारसा घेऊनच मराठी इंटरनेटच्या व्यवस्थेला सामोरी गेली आहे. त्यामुळे तिथे हीच स्थिती असणार हे उघड आहे. त्याच्या जोडीला संगणकीय मुद्रणव्यवस्था आणि इंटरनेटचे प्रोटोकॉल्स या दोन्ही तांत्रिक पातळ्यांवर देवनागरी लिपीला जुळवून घेण्याचे आव्हान होते. यात गरिबीचे रूपांतर दारिद्र्यात झाले. तरीही विविध फॉँट, की-बोर्ड तयार करणे, सॉफ्टवेअर सुसंगत करून घेणे, अशा उपायांद्वारे आपण आज एका बर्‍या स्थितीला आलो आहोत. विशेषत: युनिकोडमुळे बरीच सोय झाली आहे. मॅन्डेरियन, कोरियन, जपानी वगैरे भाषांसमोरही लिपी इंटरनेट सुसंगत करून घेण्याचे आव्हान होतेच. पण, त्यांनी ते आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने हाताळले.

खरा लेखी किंवा तोंडी भाषाव्यवहार वाढतो तो सर्वसामान्यांच्या दररोजच्या व्यवहारातून. तिथे आपण कमी पडलो हे मान्य करायला हवे. ज्यांना या इंटरनेटवर व्यवहार करायचे आहेत त्यांच्या आस्था कमी तरी पडल्या किंवा इंग्रजीशी असलेल्या सलगीमुळे या वर्गाने आस्थेचा विषय बाजूला ठेवून इंटरनेटचा मनसोक्त वापर करण्याचा मार्ग स्वीकारला. मराठीच्या लेखी भाषाव्यवहाराच्या निर्मितीतील ही उणीव भरून निघण्याची एक शक्यता वितरण व्यवस्थेतील बदलांमुळे दिसू लागली आहे. इंटरनेट वेगाने विस्तारतेय. सोशल मीडियाच्या माध्यमात सध्या वेगाने वाहत असलेला मराठी संवादाचा व्यवहार हे सुचिन्ह आहे. सोयीचे की-बोर्ड पुरविले, विविध सॉफ्टवेअर मराठीसाठी सुसंगत आणि सुलभ करून घेतले, तर इंटरनेट ग्राहकाकडून होणारा मराठी भाषाव्यवहार खूप वाढू शकतो. इंटरनेटवरील मराठी मजकुराला आपण कसे स्वीकारतो हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण जाणीवपूर्वक, आग्रहाने मराठीतील व्यवहाराला शोधत गेलो, थोडी कळ सोसून वाचत आणि लिंक करत राहिलो तर व्यवहार वाढायला लागेल. वापरता वापरता वाढे हे त्याचे सूत्र.

निर्मिती, वितरण आणि ग्रहण या पातळ्यांवरचे व्यवहार हे किचकट आहेत हे खरे; पण अशक्य नाही. दक्षिण आशियातील अनेक भाषकांनी ते करून दाखविले आहे. येत्या पाचेक वर्षांत मॅन्डेरियन (चिनी) भाषा इंटरनेटवरील सर्वात मोठी भाषा बनेल, अशी शक्यता आहे. जपानी, कोरियन, मलाय अशा भाषांवरील व्यवहारही अधिक समृद्ध होत आहे. दूर कशाला हिंदीचीही पावले आश्वासक पडत आहेत. हे मराठीलाही शक्य आहे. कसाही का असेना मराठी व्यवहार इंटरनेटवर आला पाहिजे. तो थोडा वेडावाकडा, अशिष्ट, वरवरचा, निव्वळ मनोरंजनात्मक असला तरी एकवेळ चालेल. कारण अशा व्यवहाराला सोबत घेत चांगला, शिष्टसमंत, सखोल, ज्ञानी वगैरे व्यवहार करण्याची क्षमता भाषकसमूहांमध्ये असते. मराठीतही ती आहे. हे काम सगळ्यांना मिळून करायचे आहे. या कामाची जबाबदारी सरकार वा साहित्य-संस्कृती धुरिणांकडे टाकून मोकळे होता येणार नाही. एका ऐतिहासिक प्रक्रियेमुळे मागे पडलेल्या मराठीला वैभव मिळवून देण्याचा एक मार्ग इंटरनेटने खुला केला आहे, नाहीतर पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी म्हणत रडत बसण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

विश्राम ढोले, पुणे
शिक्षणतज्ज्ञ, संशोधक,
लेखक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते
संपर्क : ९५४५२६८२४५