आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vivek Deshpande Writes About Deepa Karmakar NIA Officer Tanzil Ahmed Murder Case

तंझीलची हत्या अन् प्रतिबंधित पिस्तुलाचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहंमद तंझील राष्ट्रीय अन्वेषण विभागाचा (NIA) पोलिस उपअधीक्षक. या NIA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची अमानुषपणे हत्या होते आणि तीही पाकिस्तानी गुन्हे शोध पथकाची पठाणकोटला भेट झाल्यावर. साहजिकच संशयाची सुई पाकिस्तानी ISI किंवा दहशतवादी संघटनांकडे वळते. ISI वर शंका घेण्याचे कारण म्हणजे तंझील पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या केसेसमध्ये प्रमुख चौकशी अधिकारी होता. दुसरे म्हणजे ज्या पिस्तुलाने तंझीलवर गोळ्या झाडल्या गेल्या त्या पिस्तुलाचे बोर ९ एम. एम. होते आणि ९ एम. एम. बोरची पिस्तुले ही भारतात निर्बंधित असून त्यांचा वापर केवळ पोलिस खात्यात होतो. अशा अत्याधुनिक पिस्तुलाचा वापर पाकिस्तानातील ISI देखील करत असणार. असाही एक संशय येतो की, गुरुदासपूर आणि पठाणकोट येथील हल्ल्यासाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारतातील स्लीपर सेलची मदत घेणे आवश्यक होते, त्याशिवाय त्यांना भारतात काही करता येत नाही आणि अशा काही स्लीपर सेलच्या म्होरक्यांची नावे तंझीलला माहीत झाली होती आणि म्हणून त्याचा काटा काढला गेला असावा, अशी एक शक्यता नाकारता येत नाही.

उत्तर प्रदेशमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांचीदेखील खूप रेलचेल आहे. म्हणून या घटनेचा विचार केला तर एक विचार मनामध्ये येतो की, इस्लामिक कट्टरपंथीयांना असे वाटणे साहजिक आहे की, मोहंमद तंझील हा मुसलमान असूनदेखील तो दहशतवादी मुसलमानांविरुद्ध पुरावे कसे काय गोळा करतो, म्हणूनही त्याचा काटा काढला जाऊ शकतो. याला दुजोरा मिळतो तो उत्तर प्रदेशमधील सिमी च्या मोठ्या आणि प्रभावी
अस्तित्वामुळे. बिजनोर जिल्हा हा सिमी चा बालेकिल्ला असून तेथील सिमीचे कार्यकर्ते संघटनेवर बंदी असूनदेखील खूप सक्रिय आहेत आणि सिमी अशा कामात क्षमता बाळगून आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पठाणकोट आणि पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेवर असलेले इतर प्रदेश व तेथील माफिया मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहेत. या माफियांना राजकीय वर्तुळातील काही गब्बरांचा पाठिंबा असतो. तंझीलला याचा सुगावा लागला असल्यास त्याचा काटा काढणे या गब्बरांना अवघड नव्हते.
दहशतवादी कट यामागे असण्याची शक्यता जरी गृहीत धरली तरीदेखील एक गोष्ट प्रखरतेने जाणवते, ती ही की, दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना त्या हल्ल्याचा स्वीकार करते आणि जाहीरपणे तो हल्ला आपण केल्याचा दावा करतात. तंझीलच्या हत्येनंतर असा कोणीही दावा केलेला नाही. आणि म्हणून तंझीलच्या खुनामागे दहशतवादी असण्यापेक्षा उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी जगातील सुपारी मारेकरी असण्याची शक्यता पडताळून पाहणे आवश्यक वाटते. मुलायमसिंग यांच्या राज्यात गुन्हेगारी नेहमीच उच्चांकावर असायची, उलट अखिलेश यादव यांना दिलासा मिळाला असता, जर हा हल्ला दहशतवादी असता तर. कारण मग राज्य सरकारला अंातरराष्ट्रीय दहशतवाद्यांवर त्याचे खापर फोडता आले असते आणि स्वतःचे हात मोकळे करता आले असते. रघुराज प्रतापसिंह उर्फ राजू भैया आज उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने दोन वर्षांपूर्वी प्रतापगढमधील कुंदा ब्लॉकमध्ये पोलिस उपअधीक्षक झिया उल हक यांची हत्या झाली होती. राजू भैया, डी. पी. यादव, मुख्तार अन्सारी आणि अतिक अहेमद यांच्यावर बरेच गुन्हे नोंदवले गेले आहेत. जेव्हा जेव्हा समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर आली तेव्हा तेव्हा गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसते. उत्तर प्रदेश पोलिस राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याऐवजी राजकीय मालकांची मर्जी राखण्यात जास्त रस घेताना आढळतात. अशा परिस्थितीचा फायदा गुन्हेगारी जगतातील निर्ढावलेल्या, राजकीय आशीर्वाद लाभलेल्या गुंडांना मिळतो. एवढेच नव्हे, तर इतर राज्यांमधून विशेषकरून दिल्लीमधील गुन्हेगारांना उत्तर प्रदेश म्हणजे सुरक्षित नंदनवनच वाटू लागते.
मोहंमद तंझीलच्या हत्येचा तपास NIA च्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी विश्वातदेखील करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. दरम्यान, मोहंमद तंझील याचा खून हा त्याच्या नातेवाइकांपैकीच लोकांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. कारण तंझील नेहमी नातेवाइकांना कमी लेखायचा आणि त्यांची सार्वजनिक चेष्टा करायचा. याशिवाय त्याच्या नातेवाइकांमध्ये संपत्तीच्या अनुषंगाने काही वाद होते, त्याचादेखील परिणाम या खुनामध्ये झाला असावा, असे सांगितले जात आहे. परंतु मला एका गोष्टीची शंका अजून येते, ती ही की, तंझीलच्या नातेवाइकांकडे ९ एम. एम. पिस्तूल कशी काय आली? याचा कुठेच अजून उलगडा झालेला नाही.
- विवेक देशपांडे,
निवृत्त अतिरिक्त पोलिस उपायुक्त, हैदराबाद.