आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vivek Savant Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

खरा प्रश्न आशयाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेला आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात कालानुरूप करण्यापेक्षा खरी गरज माहिती तंत्रज्ञानाने मराठी भाषेशी अनुरूप होत राहण्याची आहे. परंतु, त्याचबरोबर आधुनिक ज्ञानयुगाच्या संदर्भात आणि ते ज्ञानयुग माहिती तंत्रज्ञानाने सक्षम केलं आहे म्हणून त्या तंत्रज्ञानाच्या संदर्भात, मराठी मानसिकता तशी कालानुरूप व्हावी. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्यासंदर्भात आज जो मराठीच्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न आहे, तो खरा मराठीतील आशयाचा प्रश्न आहे. त्याच्या अभिव्यक्तीसाठी अनुरूप असं तंत्रज्ञान इंग्रजीप्रमाणेच मराठीलाही सहज उपलब्ध होत आहे.

महाराष्ट्र हा आता जवळजवळ बारा कोटी मराठी लोकांचा भाषक गट आहे. त्यामुळे जगात मराठी भाषक गटाचा संख्यानिहाय क्रमांक 15वा आहे. ही आपल्या संख्येच्या दृष्टीने व अस्मितेच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे संगणकीय व मोबाइलवरील व्यवहार मराठीतून करण्याचा निश्चय केला, तर मात्र जगातल्या कुठल्याही मोठ्या कार्पोरेट हाउसला आमच्यासमोर हात जोडून त्यांचं तंत्रज्ञान मराठी भाषेमध्ये देणं भाग पडेल. तुम्ही गुगल अ‍ॅडव्हान्स सर्चमध्ये गेलात आणि ‘भाषा मराठी’वर क्लिक केलं, की मराठीतले सगळे सर्च रिझल्टस् तुमच्यापुढे हात जोडून उभे राहतात. हजारो मराठी लोकांनी मराठीमधून ब्लॉग्ज वापरायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली, आपली पोर्टल्स मराठीतून तयार करायला सुरुवात केली, त्यावेळेला हे परिवर्तन घडलं. आज ज्या प्रमाणात आपण हे करायला पाहिजे त्या प्रमाणात मात्र आपण ते करत नाहीये, असे असले तरीसुद्धा आज निरनिराळ्या ब्लॉग्जच्या माध्यमातून विविध देशांतली हजारो मराठी माणसं एकमेकांना भेटत आहेत. म्हणजे मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेपेक्षा जास्त आपल्या मानसिकतेचा आहे.

आर्थिक, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी स्वभाषेतल्या ज्ञानाचा वापर करता येण्याच्या संधी सर्वसामान्य समाजाला कितपत आहेत, यावरून त्या भाषेचं भवितव्य स्पष्ट होतं. जागतिक बाजारातला कुठलाही संगणक हा आज मराठी भाषेत सहज वापरण्यासाठी सिध्द आहे. म्हणजे तंत्रज्ञान हे तुम्हाला एक प्रकारचं व्यासपीठ देत आहे, प्रश्न आमच्या मानसिकतेचा आहे. तंत्रज्ञानाचं मराठीवर आक्रमण होतंय इत्यादी गळेकाढू वल्गना दिशाभूल करणार्‍या आहेत. सेल्फ इम्प्रूव्हिंग आणि सेल्फ करेक्टिंग सॉफ्टवेअरच्या निर्मितीची पहाट झालेली आहे. त्यामुळे आपली भाषा जपण्याची, ती वाढविण्याची एक खूप मोठी संधी निर्माण होणार आहे.

मराठीसाठी अ‍ॅटोमॅटिक रियल टाइम भाषांतराचं तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी आग्रह धरणं आणि हाती आल्यावर ते सतत वापरणं, स्वत:हून शिकणार्‍या, स्वत:च्या चुका दुरुस्त करणार्‍या व सुधारणा करत राहणार्‍या अभिनव सॉफ्टवेअर प्रणालींवर ते अवलंबून आहे हे लक्षात घेऊन आपण इतर भाषकांशी या तांत्रिक भाषांतर सेवेचा अधिकाधिक वापर करून, मराठीत जितकं जास्त बोलता येईल तितकं बोलून, आपल्या सामूहिक कृतीतून हे भाषांतर तंत्रज्ञान अधिकाधिक विश्वासार्ह बनवणं. त्यामुळे आपल्या मराठीचं भवितव्य आपण ती इतर मराठी भाषकांबरोबरील व्यवहारात किती वापरतो याचबरोबर तितकंच जगातल्या इतर भाषकांबरोबर तांत्रिक भाषांतर सेवेतून किती वापरतो यावरही अवलंबून असणार आहे. अशा पद्धतीची आपली एक रणनीती यापुढे सर्व मराठी भाषकांनी एकत्र येऊन कृतीत आणली पाहिजे, तरच तंत्रज्ञान आपल्या मराठी बाजारपेठेला अनुकूल होईल. त्यासाठी खास ‘मराठी’ असा ग्राहकवर्ग असलेली बाजारपेठ निर्माण करायला हवी व वाढवायला हवी. आमच्या भाषेला खरं वैभव हे तिला तंत्रज्ञानाची भक्कम जोड दिल्यामुळेच प्राप्त होणार आहे.

विवेक सावंत, पुणे
व्यवस्थापकीय संचालक आणि सहसंस्थापक,
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित.
संपर्क : ९८२२०५२९१४