आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG : अहंकार.... नातेसंबंधातील अडथळा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनय आणि नितीन दोघेही घनिष्ट मित्र. बालपणापासून दोघांची मैत्री त्यांच्या अर्धांगिनी आणि नंतर मुलांपर्यंत झिरपलेली. पण छोट्याशा कारणावरून दोघांत किरकोळ मतभेद झाले आणि जवळपास पंचवीस वर्षांची मैत्री संपुष्टात आली. अर्थात मतभेद झाले आणि मैत्री संपली इतकं ते सहज नव्हतं. त्यांचे यापूर्वीही मतभेद झाले होते आणि पुन्हा ते विसरून दोघे एकत्रही आले होते. त्यामुळे यावेळेसही असेच होईल असे दोघांनाही मनोमन वाटले पण एक आठवडा गेला, एक महिना गेला तरी ही कुणीच काही हालचाल केली नाही. प्रत्येकजण दुसऱ्याने पुढाकार घेण्याची वाट पाहत राहिला. त्यानंतर एकमेकाविषयी प्रेमाची जागा अहंकार आणि रागाने घेतली आणि मीच का बोलायला जायचे, त्याला गरज असेल तर तो येईल माझ्याकडे अशा विचारांनी दोघांच्याही मनाचा ताबा घेतला आणि मैत्रीत वितुष्ट निर्माण झाले. दोघांनाही मनातून एकमेकाशी बोलावेसे वाटत होते पण मीच का? या विचाराने कुणीही मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे मैत्रीत दरी निर्माण झाली ती कायमचीच.

अनुजा आणि सुरभी या दोघी ही अशाच खूप जुन्या मैत्रिणी. दोघींच्यात वारंवार धुसफुसही होत असे पण यात नेहमी अनुजाच माघार घेऊन सुरभीशी बोलायला जात असे. सुरभीला ही याची सवय झाली होती त्यामुळे ती कधीही माघार घ्यायला तयार होत नसे. पुढे लग्नानंतर दोघी जेव्हा एकमेकीपासून दूर गेल्या तेव्हा अनुजाच्या जुळवून घेण्याच्या स्वभावाने तिला बरीच माणसे भेटली पण सुरभीला नवीन मैत्रिणी जोडणे फार अवघड गेले. तिला अनुजामुळे स्वतःचे खरे करण्याची सवय लागली होती पण पुढे तिला समजून घेणारी माणसे फार भेटली नाहीत त्यामुळे तिचे इतरांशी संबंध ताणलेले राहिले.

आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडतात जेव्हा आपले सामंजस्य आणि स्वभावातील लवचिकता तसेच आंतर्व्यक्ती संबंधांचे कसब पणाला लागते. बऱ्याच वेळेस जवळच्या नात्यातील व्यक्ती अहंभाव, संवादाचा अभाव आणि अविश्वास यामुळे तुटल्या जातात. विनय आणि नितीन यांच्या उदाहरणातून हे स्पष्ट दिसून येते. दोघांचेही एकमेकावर प्रेम होते, नाते पुढे सुरु ठेवण्याची इच्छा होती पण केवळ अहंकाराच्या आहारी गेल्यामुळे दोघे एकमेकापासून दुरावले. आज लग्नांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. तिथे सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती असते. बहुतांश केसेसमध्ये दोघांचे एकमेकावर प्रेम असते, त्यांना वेगळे व्हायचे नसते पण माघार कुणी घ्यायची हा कळीचा मुद्दा असतो. पुन्हा मीच का ? हा प्रश्न डोके वर काढत असतो.

कोणतीही व्यक्ती वाईट नसते. आपण स्वतः आणि दुसराही पण काहीवेळेस तो दोष परिस्थितीत असतो. अश्यावेळेस शांतपणे विचार करावा. नाते तोडायला फारसा वेळ लागत नाही पण नाते बांधायला खूप काळ द्यावा लागतो. नाते बांधणे म्हणजे एखादे रोपटे आपण जसे रोज थोडेथोडे खतपाणी घालून वाढवतो तसे आहे. ती एक कला आहे. ज्याप्रमाणे नातं एका मिनिटात तोडता येतं त्यापेक्षा रोज नित्य नव्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीवर प्रेम प्रदर्शित करून त्या व्यक्तीच्या आनंदात आपलाही आनंद मिळवणे ही खूप समृद्ध करणारी गोष्ट आहे. हे आपल्या आयुष्यातील सर्व नात्यांबाबतीतील सत्य आहे.

सुरभीसारखाच स्वभाव असणाऱ्या लोकांची गोष्ट वेगळी पण सहसा माघार घेण्यात काही कमीपणा नसतो. आपण माघार घेतो यात कमीपणा काहीच नसतो उलट आपली भावनिक बुद्धिमत्ता दुसऱ्यापेक्षा प्रगल्भ आहे याचाच हा पुरावा आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आपल्याच जवळच्या माणसाशी जुळवून घेण्यात कसला कमीपणा?

मतभेद, भांडणं, रुसवेफुगवे हे प्रत्येक नात्यात होत असतात. जेवणातल्या मिठाप्रमाणे या गोष्टी नात्याची लज्जत वाढवतात. फक्त गरज असते ती नात्यातील चांगल्या गोष्टींकडे पाहण्याची. दोन व्यक्ती किती कमी भांडण करतात यापेक्षा त्या किती पटकन भांडण विसरून एकमेकाशी जुळवून घेतात ही उत्तम नात्याची खरी चाचणी आहे. वाद, मतभेद यानंतर सामोरे येतात ते दुसऱ्याचे दोष आणि अवगुणच पण थोडा वेळ जाऊ दिला तर आपल्या लक्षात येते की सर्व चूक दुसऱ्याचीच आहे असे नाही आणि त्या व्यक्तीमधील काही गोष्टी आपल्याला खटकतात तश्याच काही गोष्टींसाठी आपल्याला ती व्यक्ती हवीशीदेखील वाटते. या हव्याश्या आणि नकोश्या गोष्टींचा ताळेबंद मांडून शांतपणे निर्णय घ्यावा.


अर्थात आपण कायमच पडती बाजू घ्यायची याचा अर्थ आपण नेहमीच दीनवाणी भूमिका स्वीकारायची असा होत नाही. आपली भूमिका शांतपणे समजावून देणे हे आपण करू शकतो पण ती मान्य करणे वा अमान्य करणे हा सर्वस्वी समोरच्याचा निर्णय असतो. तेव्हा ही मतभिन्नता कायम ठेवूनही नाते जपता येते. कुणीतरी म्हटले आहे, “A great relationship is about two main things. First find out the similarities. Second respect the differences.”

दुसऱ्याच्या मतांचा आदर निश्चित केला पाहिजे पण याचा अर्थ आपल्या मनाला दुखावले तरी चालेल असा होत नाही. आपण प्रत्येक प्रसंगात नेहमी समंजसपणे वागू शकत नाही. स्वतःकडून तशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःचाच छळ मांडण्यासारखं आहे. आपल्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्याला काय वाटत आहे, का वाटत आहे आणि आपल्याला काय हवं आहे याचा अभ्यास जर आपण केला तर आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या भावनांसाठी जबाबदार धरणार नाही आणि आपल्या नकारात्मक भावनांमुळे अपराधी वाटून घेणार नाही. त्यांचा योग्य तो समाचार घेऊन पुढे चालत राहू.