आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrishali Arjunwadkar's Article On Family Relations

BLOG : नातेसंबंध कसे सांभाळाल ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सगळीकडेच जवळच्या नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी ताणलेल्या नातेसंबंधांवर विचार करत असताना एक गोष्ट लक्षात आली की कुठलेही नाते आज आपण मनापासून जपत नाही. त्यावर पुरेसा विचार करून ते समजून घेऊन ते जोपासत नाही. नाते म्हणजे केवळ व्यक्तींचे एकत्र येणे नव्हे. माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांना बांधून ठेवणारा काहीतरी एक धागा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो किंवा तो निर्माण करण्यासाठी ते एकत्र येतात. सुरुवातीला जेव्हा नव्याची नवलाई असते तेव्हा सर्वच छान असते. कुणी कुणाचे मन दुखावत नाही, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. कालांतराने माणसांना एकमेकाची सवय झाली की माणसं थोडीशी निष्काळजी बनत जातात आणि दुसऱ्याकडून अपेक्षा वाढत जातात. आपण दुसऱ्याच्या किती अपेक्षा पूर्ण करतो यापेक्षा दुसरी व्यक्ती आपल्या किती अपेक्षा पूर्ण करते हा हिशेब मांडला जाऊ लागतो. यातूनच मूळचा एकत्र येण्याचा उद्देश विसरला जातो, मागे पडतो आणि अपेक्षाभंगामुळे नातेसंबंध ताणले जाऊ लागतात.

लहान मूल जन्माला येते तेव्हा घरांत केवढा आनंद साजरा करतात. ते मूल लहान असताना त्याच्या प्रत्येक कृतीचे, बोबड्या बोलांचे कौतुक केले जाते. आईवडील, घरातील इतर माणसं आणि ते लहान मूल यांचं सुंदर नातं तयार होतं. लहान मूल तर निष्पापच असतं पण मोठी माणसंही त्याची खूप काळजी घेतात. कालांतराने काळजीपायी अथवा त्याला योग्य शिक्षण देण्यापायी त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवणे, त्याला वारंवार सूचना करणे सुरु होते. इकडे मूल ही मोठे होऊ लागते, स्वतंत्र विचार करू लागते, त्यालाही स्वतःचे अस्तित्व अधोरेखित करावेसे वाटू लागते. या सर्व घटनांमुळे एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागतो. सुरुवातीला याचे फार गांभीर्य जाणवले नाही तरी कालांतराने नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतात.

हे केवळ पालक मुले या नात्यातच नाही तर सर्वच नात्यांतील कटू सत्य आहे. पती-पत्नी, भावंडे, नातेवाईक इतकेच काय आपण काम करतो त्याठिकाणी ही आपले आपल्या वरिष्ठांशी आणि कानिष्ठांशी असलेले नातेसंबंध कसे आहेत यावर आपले बरेचसे यश अवलंबून असते.

बऱ्याचदा प्रश्न पडतो की, “अरे असे काय झाले सगळे तर ठीक चालू होते मग अचानक संबंध का बिघडले?” असे अचानक काहीच घडत नसते. ती हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. नाते बिघडण्याला कारणीभूत असणारे घटक म्हणजे अहंभाव, गैरसमज, संवादाचा अभाव, मालकी भावना, ‘माझे तेच खरे’ करण्याची वृत्ती, असामंजस्य वृत्ती, रागीट स्वभाव. शेखरला रागीट स्वभावावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे त्याचे कामाच्या ठिकाणीच नाही तर मित्रांशीही संबंध तुटले. आपल्या रागीट स्वभावाबद्दल त्याला आता पश्चाताप होतो. आपण राग ताब्यात ठेवून थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर बरे झाले असते असे त्याला वाटते पण आता वेळ हातातून निघून गेली आहे. एकदा तडा गेलेले काचेचे भांडे पुन्हा जोडले तरी तडा गेलेला व्रण कायम राहतो. तसेच एकदा दुखावलेले दुसऱ्याचे मन पुन्हा त्याच विश्वासाने तुम्हाला परत मिळू शकत नाही.

नाते कोणतेही असो त्यातून शोधायला हवा तो आनंद. दोन व्यक्तींना एकत्र येण्याने आनंद मिळत असेल तर ते उत्तम नाते. प्रत्येकाला, अगदी आपल्या अतिशय जवळची व्यक्ती असेल तरीही, स्वतंत्र मन, स्वतंत्र विचार आहेत, आपल्यापेक्षा वेगळ्या अश्या अपेक्षा आहेत हे आपण लक्षात ठेवायला हवे. त्या व्यक्तीचे ते स्वातंत्र्य जपायला हवे, त्याचा आदर करावा. आपल्याला काळजी वाटत असेल किंवा एखाद्या बाबतीत आपले दुमत असेल तर तसे सरळ शब्दांमध्ये त्या व्यक्तीला सांगावे पण निर्णय त्यांनाच घेऊ द्यावा. आपले म्हणणे दुसऱ्यावर लादू नये. तसेच दुसऱ्याने आपले म्हणणे ऐकले नाही म्हणून त्या व्यक्तीवर राग धरू नये.

नातेसंबंध सुदृढ ठेवण्यासाठी लागणारे काही गुण आपण अंगी बाणवून घ्यायला हवे. समंजस वृत्ती, स्वभावातील लवचिकपणा, दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याची वृत्ती, क्षमाशीलता, दुसऱ्याचे कौतुक करता येण्याइतका मनाचा मोठेपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसं जोडण्याची आवड.

मानवी स्वभावाचा थोडा अभ्यास केला तर लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीला आपली कुणी विचारपूस करतं, कौतुक करतं ही गोष्ट खूप विशेष वाटते. तेव्हा दुसऱ्याच्या सुखदु:खात त्यांची विचारपूस करणे ही छोटीशी कृती सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीच्या खूप जवळ घेऊन जाते. आठवून पहा की तुम्हाला कुणाची आठवण आली की चांगलं वाटतं? अर्थातच तुम्हाला जे लोक चांगलं म्हणतात त्यांची. मग आपल्याला जसे इतर काही लोक आठवतात तसे आपण ही कुणाच्या आठवणींच्या यादीत का असू नये? दुसऱ्याचे कौतुक करायला शिका.