आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

॥ जागा वाटपाचे वाक्युद्ध॥

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छगन म्हणे जयंतासी। मागे कथा सांगितली।
पवार माहात्म्य प्रफुल्लासी। पुसिले मनोहारी नायकाने।
पुढे कथा कवणेपरी। झाली असे पवारचरित्री।
निरोपावे सविस्तारी। आरआरआबा अजितदादू।
ऐसे विनवी जगजितराणा। ऐकोनी छगन प्रसन्नवदना।
सांगतसे तया क्षणा। पवारमाहात्म्य फळीयेसा।
पवार म्हणजे योगी। पूर्वापार राजकारणी।
हिंडत होता महाराष्‍ट्री। फोडाफोडी करूनी।
असंतुष्ट, कपटी, ढोंगी। गूढ वलय घेऊनी।
वर्तत होता महाराष्‍ट्रवनी। ऐसा ढोंगी राजकारणात।
वावरत होता सावध। गाठत होता बेसावध।
विरोधकांसी। त्याची लीला अगाध।
वर्णन करता अशक्य। पवारू असे क्षुधाकांत।
मिळेल तो भूखंड खात। काँग्रेसिस दाखवी हात।
वेळकाळ पाहोनिया॥
देशाचे पूर्णवेळ क्रिकेटमंत्री आणि पार्टटाइम कृषिमंत्री परम आदरणीय मा. शरदचंद्रसाहेब पवार यांचा थांग लागणे इतके सोपे नाही. ईश्वर जसा सर्व विश्व व्यापून दशांगुळे उरला आहे, तसे आमच्या पवार साहेबांचे आहे. एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल, पण पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अदमास यायचा येणार नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तर त्यांच्याशिवाय कुणालाच कळत नाही. एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कामाला लागा असे साहेबांनी म्हटले की तो उमेदवार हमखास पडतो, त्यांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याचे काय होइल हे सांगता यायचे नाही. साहेबांचे व्यक्तिमत्त्व गहन, गूढ आणि अतर्क्य आहे. त्यांचे ओठ बोलण्यासाठी हलले की भल्याभल्यांच्या हृदयात धडकी भरते. ते नेहमी गूढ बोलतात. म्हणूनच आमचे मराठी माणसांचे एकमेवाद्वितीय तारणहार राजसाहेब ठाकरे यांनाही साहेबांचे बोलणे उमगले नाही. पवार काय बोलतात ते महिनाभरानंतर समजते असे वक्तव्य त्यांनी केले. तर आमचे महाराष्‍ट्रप्रदेश काँग्रेसचे चमकेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही ते कळत नाही. कळले तरी वळत नाही. पवारांच्या कुठल्याच कृतीचा अर्थ लागत नाही. आता ज्येष्ठांनी दिल्लीत यावे असे ते म्हणाले. त्याचा अर्थ सर्वांनी छगनबाप्पा दिल्लीत जाणार असा घेतला. आणि इकडे ज्येष्ठ गोरे गोरे पान घा-या डोळ्याचे आदिवासी नेते मधुकर पिचड राज्याचे आदिवासी मंत्री झाले. एकीकडे तरुणांच्या हाती सूत्रे सोपविली पाहिजेत असे सांगताना दुसरीकडे ज्येष्ठांच्या अनुभवाची पक्षाला गरज असल्याचे सांगायला ते विसरत नाहीत. पण पवारांची मनोभावे सेवा केली तर हवे ते फळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. आमच्या छगनबाप्पांनी तसे लिहूनच ठेवले आहे
छगन सांगे जयंतासी। पवारांची महिमा ऐशी।
सेवा करीता मनोभावे। पाहिजे ते फळ मिळे।
पवार माहात्म्य असे थोरू। विशेष माया प्रीती वरू।
भास्करे पावला पारू। उद्धार झाला तयाचा।
येणेपरी छगनगुणी।सांगता झाला विस्तारोनी।
ऐक शिष्या जितेंद्रमुनी। घड्याळ लावुनी मनोनिया।
म्हणोनी प्रफुल्ल सविस्तर। सांगती पवार कार्य विस्तार।
भक्तिभावे ऐकती जरी। पक्षामध्ये उद्धरती।
असे पवारांचे माहात्म्य आहे. पण आमचे माणिकराव ठाकरे हे माहीत असूनही उगाच पवारांच्या तोंडी लागतात. झाकले माणिक सव्वा लाखाचे असे म्हणतात. पण काँग्रेसचे हे माणिक सव्वा रुपयाचेही नाही असे राष्‍ट्रवादीवाले म्हणतात. सध्या राजमान्य राजेश्री दिल्लीधिपती शरदचंद्र पवार सायेब आणि आमचे कांदे विकणारे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात जागावाटपावरून तणातणी सुरू आहे. सध्या जागेला किती महत्त्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. रेल्वे, बसगाडी, ऑटो आदी वाहनांतही कुणी सहजी जागा देत नाही. पक्षात आणि राजकारणात तर जागेचा प्रश्न खूपच बिकट असतो. प्रत्येक जण एकमेकाला एकमेकाची जागा दाखवून द्यायला आणि एकमेकाची जागा हिसकावून घेण्यासाठी टपून बसलेला असतो. आता जागावाटपाच्या चर्चेत पवार साहेबांनी माणिकरावांना त्यांची जागा दाखवली. जागावाटप दिल्लीत ठरते. त्याचे सूत्रही ठरलेले आहे. त्यामुळे मी दिल्लीच्या नेत्यांशी बोलीन. राज्यातील नेत्यांशी मी बोलत नसतो, असे साहेबांनी स्पष्ट केले. साहेब हात राखून बोलतात हे माणिकरावांना समजायला हवे होते ना. पण नाही. जागावाटपाची बोलणी राज्यातच होईल असा हट्ट ते धरून बसले आहेत.
जागा पक्षातली असो वा राजकारणातील असो, किती महत्त्वाची असते हे लक्षात यावे. 2014 च्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांना खुणावत आहेत. भाजप, सेना आणि काँग्रेस व राष्‍ट्रवादीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. भाजप आणि सेनेसोबत या वेळेस रिपाइं /आठवले/ आहे. तिथे आठवलेंना तर इकडे माणिकरावांना जागावाटपाची घाई झालेली आहे. पवारांनी सांगितल्यावरही माणिकरावांनी विक्रमादित्यासारखा आपला हट्ट सोडलेला नाही. साहेबांच्या मनात नक्की काय आहे हे त्यांच्या स्वत:शिवाय कुणीही सांगू शकत नाही. अशा हवेत माणिकरावांनी हातचे आहे ते राखून ठेवणे केव्हाही उत्तम. या बाबतीत त्यांनी बाबांचा सल्ला घेण्यास हरकत नाही. बाबा त्यांना मनसे सल्ला देतील हे नक्की...