Home »Divya Marathi Special» We Pride To Be The Indian But Lots Have Tell About Our Great Nation

माझ्या भारताचा अभिमानच बाळगावा असे बरेच काही...

यमाजी मालकर | Jan 26, 2013, 00:43 AM IST

  • माझ्या भारताचा अभिमानच बाळगावा असे बरेच काही...


समजा असे ठरवले की, उद्याच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशातील सर्व चांगल्याच गोष्टींविषयी बोलायचे तर शक्य आहे काय? आपण आपल्या देशातील वैगुण्यावर नेहमीच बोट ठेवतो. मात्र, आज आपण असे पाहू की, आपला देश कसा समृद्ध आहे. बाकी इतर कुठल्या निकषांवर हे सिद्ध होते की नाही हे नंतर पाहता येईल. मात्र, आर्थिक आकडेवारीने ते सिद्ध होते, हे जाणून घेतल्यावर आपल्यालाच आश्चर्य वाटते. (अर्थात त्या आकडेवारीतील विसंगती आपल्या सर्वांना चांगली माहिती आहे. मात्र आपण आज जाणीवपूर्वक चांगलीच बाजू पाहणार आहोत.)
जगातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताक देशात माझ्या भारतात आज कशाची कमी आहे हे कोणीही सांगावे. त्याला तेल, आधुनिक तंत्रज्ञान आणि सोन्याचे उत्पादन (वापर नव्हे) यापलीकडे काही सापडणार नाही. अट एकच आहे, त्याने भारतीयांच्या वृत्तीवर बोलायचे नाही. कारण तसे बोलायला लागलो की आपणच आपल्याला बदनाम करतो आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्याच समाजाची अशी बदनामी करणा-या वर बंदी घातली पाहिजे, असे कधी कधी वाटते. भारतीय माणूस आर्थिक अव्यवस्थेमुळे त्रस्त झाला असून त्याची मानसिकता त्यामुळे बिघडली आहे, हे आपल्याला अधिक विचार करता लक्षात येईल.

भारत हा आज कसा जगातील सर्व 193 देशांमधील दखलपात्र देश झाला आहे हे जागतिकीकरणाच्या अपरिहार्यतेतही पाहत आहोत. आज जे भारताकडे आहे त्यातील अनेक गोष्टी जगातील किमान 190 देशांकडे नाहीत. त्यामुळे आमच्याकडे जे आहे त्याचा आपण अभिमान बाळगूयात. आपला देश अनेक बाबतीत पहिल्या दहामध्ये आहे हे तर अर्थशास्त्रीय आकडेवारीने सिद्धच केले आहे.

आर्थिक आकडेवारीच्या पलीकडील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्याकडे होणा-या निवडणुकांकडे जग तोंडात बोट घालून पाहते. अमेरिकेचे प्रशासनसुद्धा त्याचा अभ्यास करते. शेजारी देशांमध्ये किंवा गेल्या शतकात स्वातंत्र्य मिळवलेल्या देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही हे पाहता आपल्या लोकशाहीचे खरे महत्त्व लक्षात येते. आपण जेव्हा येथील राजकारणाविषयी बोलत असतो तेव्हा आपण आपल्या समाजाविषयी बोलत असतो, हे लक्षात आले की केवळ राजकारणाला दोष देऊन काहीच बदल होणार नाही हेही आपल्याला स्वीकारावे लागते.

सर्व जग मंदीच्या तडाख्यात सापडले असताना भारताचा आर्थिक विकास दर ६.5 टक्के (2011-12) राहिला आहे. आता तो कमी होईल असा अंदाज असला तरी तो जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील 10 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था (1.847 ट्रिलियन डॉलर) आहे. 2020 मध्ये ती चौथ्या तर 2050 मध्ये तिस-या क्रमांकावर राहील असा बहुतांश जागतिक वित्तसंस्थांचा अंदाज आहे. क्रयशक्तीच्या निकषावर तर आजच आपण तिस-या (4.530 ट्रिलियन डॉलर) क्रमांकावर आहोत. अर्थात यासाठी आपल्याला आपल्या 122 कोटी बांधवांचे आभार मानले पाहिजेत. जगात 2008 मध्ये आलेली मंदी भारताला तेवढी जाणवली नाही याचेही कारण आपली लोकसंख्याच आहे. अनेक देशांमध्ये तर लोकसंख्या कमी होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. युरोप, आॅस्ट्रेलिया खंडातील काही देशांत बाहेरचे लोक आल्याशिवाय तेथील अर्थव्यवस्था चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याकडे जगातील तब्बल ७ टक्के भूमी आहे. म्हणूनच आपल्या देशाला खंडप्राय देश म्हटले जाते.

भारताकडे 55७.७ टन सोन्याचा अधिकृत साठा आहे. म्हणजे जगात 10 वे स्थान ! भारतीयांच्या घराघरातील आणि मंदिरातील साठा धरल्यास जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. (अर्थात सद्य:स्थितीत हा अभिमानाचा मुद्दा नाही होऊ शकत, पण ते थोडे बाजूला ठेवू.) एकीकडे अन्नधान्याची आयात करणारा भारत आज अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवून आता अन्नधान्याची निर्यात करणारा प्रमुख देश झाला आहे. आयातीच्या निकषावर जगात 11 वा (327 अब्ज डॉलर) तर निर्यातदार देशांच्या निकषावर जगात 1७ वा (210 अब्ज डॉलर) देश असल्याने जागतिक अर्थव्यवस्था आज भारताकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. भारताची परकीय गंगाजळी 300 अब्ज डॉलर (2012) गेली असून तेलाची, आधुनिक तंत्रज्ञानाची आयात आणि परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी ती वापरावी लागते.

भारत जगाच्या तुलनेत शेती उत्पादनात जगात दुसरा तर दूध, डाळी आणि ताग उत्पादनात पहिला तसेच तांदूळ, गहू, ऊस, कापूस, रेशीम, शेंगदाणे, ताजी फळे आणि भाज्या उत्पादनात जगात दुसरा आहे. एवढेच नव्हे तर जगातील सर्वाधिक पाळीव पशुधन राखून असलेला हा देश आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा-अशी निसर्गाची उधळण भारतात पाहायला मिळते. युरोपमध्ये काही देशांत ऊन पडले की उत्सव साजरे केले जातात, हे कळल्यावर या ॠतूंचे महत्त्व कळते.

अगदी आधुनिक निकष लावले तरी आज भारतात ७0 कोटी नागरिक मोबाइलधारक आहेत. म्हणजे जगात दुसरा! रस्त्यांच्या लांबीच्या निकषावरही भारत जगात तिसरा आहे. मनुष्यबळाचा विचार करायचा तर आजमितीला पाच लाख अभियंते, अडीच लाख डॉक्टर आणि ७5 लाख पदवीधारक असे कुशल मनुष्यबळ भारताकडे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगातला सर्वाधिक आणि सर्वात तरुण देश म्हणून सा-या जगाचे लक्ष भारताकडे आहे. भारताची ७0 टक्के लोकसंख्या 34 पेक्षा कमी वयोगटातील आहे. त्यामुळे जगात एकविसाव्या शतकात संपत्ती निर्माणाचे बहुतांश काम भारतात होणार आहे. माझ्या भारताचा अभिमानच बाळगावा असे बरेच काही आहे तर !

ymalkar@gmail.com

Next Article

Recommended