आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नावात काय आहे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिल्ली हजारो वर्षे जुने शहर. या प्रदीर्घ कालावधीत या शहराचे नाव कधी इंद्रप्रस्थ, कधी तुघलकाबाद, कधी शाहजहानाबाद तर गेल्या अनेक शतकांपासून दिल्ली या नावाने हे शहर ओळखले जाते. दिल्लीतील गल्ल्यांची नावे काळानुसार बदलत गेली, पण आजही काही जुनी नावे ऐकून विचारावे वाटते की या गल्लीचे असे नाव कशावरून पडले असेल? उदाहरणार्थ बल्लीमारा, मोहल्ला सुईवाला किंवा अगदी चोरबाजार नाव ऐकले तरी एकदम मनात येते की, येथे चोरीच्या वस्तू विकल्या जात असतील. असे एक ना अनेक प्रश्न मनात घोळत राहतात.

दिल्लीच्या तुलनेत कराची शहर तसे नवीन, इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात हे शहर स्थापन केले, पण फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जनता स्थलांतरित झाली आणि कराची शहराचा विस्तार होत गेला. प्रचंड वेगाने वाढणा-या या शहराच्या वसाहती आणि गल्ल्यांची नावे ठेवणे हे एक कठीण काम होते, पण कराचीच्या रस्त्यावर धावणा-या शहर वाहतूक बसच्या वाहकांनी हे काम सोपे केले.

ज्या नावावरून एखादे ठिकाण चटकन लक्षात येईल, ते नाव त्यांनी त्या ठिकाणाला बहाल करून टाकले. ऐकणारा अचंबित होऊन बस स्टॉपच्या नावाबाबत विचार करत बसेल की, असे नाव का ठेवले असेल? ही विचार करण्याची बाब आहे, पण गोंधळ घालत रस्त्यांवर शर्यत लावत पळणा-या बसच्या चालक वाहकांकडे विचार करण्याएवढा वेळ कोठे होता? कराचीत एका स्टॉपचे नाव ‘चीलवाली कोठी’ असे आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे समजले की, एका धनाढ्याने दोन मजली घर बांधून छतावर एक चील (घार) बसवली होती. त्यामुळेच या वाहकाने या स्टॉपचे नाव चीलवाली कोठी असे ठेवले, तर त्यात गैर काय?

एक बस स्टॉप तर गिदड कॉलनी म्हणून ओळखला जातो, पण कोल्हा आणि लांडग्याच्या वर्णनाचा हा प्राणी या भागात औषधालाही दिसत नाही. कारण ही गिदड कॉलनी दाट वस्तीचा भाग आहे, पण पाकिस्तानच्या स्थापनेनंतर जेव्हा कराचीचा विस्तार सुरू झाला, त्यावेळी या भागात हे प्राणी मोठ्या प्रमाणावर दिसत आणि सूर्य मावळताच त्यांचे भेसूर आवाजात ओरडणे सुरू होई. हा आवाज ऐकूनच एखाद्या बसच्या वाहकाने या स्टॉपचे नाव गिदड कॉलनी ठेवले असावे. हे बिचारे प्र्राणी माणसांना घाबरून येथून दूर पळून गेले, पण नाव सोडून गेले.

कराचीचा असाच एक प्रसिद्ध भाग आहे, नागीण चोर गली. या भागात नाग-नागीण फणे काढून फुत्कार टाकत फिरत असतील, म्हणून याचे नाव नागीण चोर गली पडले असावे, असे मुळीच नाही. चार-पाच दशकांपूर्वी हा वाळवंटी भाग होता. वाळुची ने-आण करणारे ट्रक येथून भरधाव जात असत. त्यामुळे दोन ट्रकची टक्कर होणे किंवा ट्रक पलटणे असे अपघात होऊन दर दोन दिवसांआड एक दोघांचा मृत्यू होई. म्हणून नागिणीप्रमाणे दंश करून मरणास कारणीभूत ठरणारा भाग म्हणून याचे नाव नागीण चोर गली असे पडले.

फाळणीपूर्वी कराची शहराच्या एका भागात इंग्रज सैनिक गोळीबाराचा सराव करत. दिवसभर हा भाग गोळ्यांच्या आवाजाने दणाणून जात असे. तेव्हापासून या भागाचे नाव गोळीमार भाग पडले ते आजपर्यंत कायम आहे. याचप्रमाणे बेगार कँप, कीने प्याला, अंडा मोड, खामोश कॉलनी, मच्छर कॉलनी अशी नावे आजही वापरात आहेत. इतरांसाठी ही नावे विचित्र असतील, पण वर्षानुवर्षे येथे राहणा-या लोकांना या नावांबद्दल काहीच आक्षेप नाही. आपण राहतो, या जागेचे नाव सुंदर का नाही, असा प्रश्नही त्यांच्या मनात कधी येत नसेल.

यांच्यासाठी ही नावे अडचणीची ठरतात, ते काबाडकष्ट करून पैसे जमा करतात आणि एखाद्या कॉलनी किंवा सोसायटीत घर घेतात आणि समाधानाने राहतात. असे करून लोक समाधानाने कसे काय राहू शकतात, कोणास ठाऊक. काहीही असो, कोणी कोठेही राहो, आनंदात राहो, बस एवढेच!