Home »Divya Marathi Special» What To Be Important : Wheater Saving For Future Or Present Need ?

महत्त्वाचे काय : भविष्यासाठीची बचत की वर्तमानातील गरजा?

यमाजी मालकर | Feb 23, 2013, 01:01 AM IST

  • महत्त्वाचे काय : भविष्यासाठीची बचत की वर्तमानातील गरजा?

आर्थिक वर्षाची अखेर आणि अर्थसंकल्पाच्या तोंडावर कर वाचवण्यासाठी काय केले पाहिजे, या चर्चेची चलती असते. भविष्यासाठी कशी बचत केली पाहिजे आणि आपले भवितव्य सुरक्षित करून घेण्याची कशी गरज आहे हे आर्थिक संस्थांचे प्रतिनिधी सांगत असतात. अर्थातच बचतीची सर्वांना गरज आहे याविषयी दुमत नाही. मात्र, ती किती असावी याविषयी स्पष्टता असणे गरजेचे आहे. बचतीची ही गरज अर्थातच आज आपल्या हातात किती पैसा पडतो यावर अवलंबून आहे.

वर्तमानात त्रास सहन करून तर आपण बचत करत नाही ना, हेसुद्धा यानिमित्ताने तपासले पाहिजे. भविष्याविषयी चिंता करताना आपल्या हातातील आपल्या हक्काची रक्कम किती काळासाठी लॉक इन करायची हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मात्र, अतिबचतीमुळे अनेकांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होत आहेत. तशा काही देशांमध्येही होऊ लागल्या आहेत. हे जाणून घेतल्यावर आपण संभ्रमात पडतो आणि जगात वेगाने होत असलेल्या पैशीकरणाला दोष देऊ लागतो.

बचतीविषयीची ही चर्चा जगाच्या संदर्भाने केली तर फार धक्कादायक माहिती हाती येते.जपानी लोक फारसा खर्च करत नाहीत आणि प्रचंड बचत करतात. म्हणूनच जपानची निर्यात ही आयातीपेक्षा अधिक राहिली आहे. म्हणजे जपानला प्रचंड फायदा होतो. भारत मात्र आयात-निर्यात व्यापारातील तुटीमुळे सतत चिंतित आहे. जानेवारी 2013 या एका महिन्यात 20 अब्ज डॉलर इतकी व्यापार तूट भारताला आली आहे. वर्षाला 100 अब्ज डॉलर फायद्यात असणा-या जपानची अर्थव्यवस्था खरे तर बळकट असली पाहिजे. मात्र, ती सध्या संकटात
सापडली आहे.

दुसरीकडे अत्यल्प बचत करणारा आणि प्रचंड खर्च करणारा देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. अमेरिकन नागरिकांना बचतीच्या सवयी लागाव्यात म्हणून तेथे सारखे प्रयत्न केले जातात. त्यामुळेच अमेरिका निर्यातीपेक्षा आयात अधिक करते. व्यापारातील ही तूट वर्षाला 400 अब्ज डॉलरवर पोहोचते. तरीही अमेरिकन अर्थव्यवस्था ही तुलनेने मजबूत समजली जाते! मग प्रश्न असा पडतो की, अमेरिका खर्चण्यासाठी पैसा कोठून आणते? तर त्याविषयी असे सांगितले जाते की, जपान, चीन आणि भारतासारखे देश जी बचत करतात तीच कर्जरूपाने अमेरिकेत वापरली जाते. याचा दुसरा अर्थ असा की, इतर देश अमेरिकेसाठी बचत करतात. कारण जगातील बहुतांश बचत ही अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवली जाते. भारताकडे 50 अब्ज, चीनकडे 1६0 अब्ज, तर जपानकडे काही ट्रीलीयन अमेरिकन कर्जरोखे आज आहेत. म्हणजे अमेरिकेने जगाकडून सुमारे पाच ट्रीलीयन इतके प्रचंड कर्ज घेतले आहे !
अमेरिकन नागरिकांनी साधनसंपत्तीचा भरपूर वापर केला तर जागतिक अर्थव्यवस्थेला गती मिळते, असे का म्हटले जाते हे आता लक्षात येईल. म्हणूनच अमेरिकेतील रोजगार संधी तसेच आयात-निर्यात वाढली किंवा घटली तर त्याचे जगाच्या शेअर बाजारांवर परिणाम होतात आणि त्यावरच जगाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीविषयीचे अंदाज केले जातात.

एका अर्थतज्ज्ञाने या जागतिक अर्थचक्राचे वर्णन असे मार्मिक केले आहे. हे चक्र म्हणजे दुकानदाराने ग्राहकाला खरेदीसाठी पैसे पुरवल्यासारखे आहे. ग्राहकाने खरेदी केली नाही तर दुकान चालणार नाही. अमेरिका जगातला असा भाग्यवान ग्राहक झाला आहे, ज्याला खरेदीसाठी दुकानदार पैसे देतो आणि जग असे हतबल दुकानदार झाले आहे, ज्याला दुकान चालण्यासाठी ग्राहकाला पैसे देण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही!

या अर्थचक्रातून एवढाच बोध निघतो की, केवळ बचत केल्यानेच अर्थव्यवस्था सुधारते असे नाही, तर त्यासाठी खर्चही केला पाहिजे. आपले अर्थमंत्री मध्यमवर्गीयांनी खर्च करावा, असे का म्हणतात, ते अशावेळी लक्षात येते. केवळ खर्च करून भागत नाही, तर कर्ज घेऊन खर्च करा, असाही संदेश अमेरिकन अर्थव्यवस्था आपल्याला देते. वर्तमानकाळ चांगला जावा यासाठी भविष्य विका, असे अमेरिकन जीवनपद्धती मानते. अर्थात भावी पिढ्याचा विचार करणा-या जपानी आणि भारतीय मानसिकतेत हा विचार अजिबात बसत नाही. जपानमध्ये तर बचत कमी करा, असे सरकारच लोकांना सांगते. एवढेच नव्हे तर बचतीवर कर लावण्याचेही प्रयत्न होतात !
जगभर केंद्रीय बँकेत सोने ठेवून तेवढ्याच किमतीच्या नोटा छापल्या जात होत्या तोपर्यंत जगाचे बरे चालले होते. आता सोन्याची जागा डॉलरने घेतल्याने जागतिक अर्थव्यवस्थेने आपल्याला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, आपण सर्व एकाच जहाजात बसलो आहोत याची ती सतत आठवण करून देते आहे. एकमेकांवरील अवलंबित्व आता या थराला गेले आहे की, जहाज बुडू नये म्हणून बचत करणा-या आणि न करणा-या अशा सर्वांनी काळजी घ्यायची आहे.
तात्पर्य - भविष्यासाठी किंवा करबचतीसाठी जरूर बचत करा. मात्र, त्यासाठी वर्तमानातील गरजांची अडचण होणार नाही याचीही काळजी घ्या.

ymalkar@gmail.com

Next Article

Recommended