आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘क्षया’चा कायमस्वरूपी भारतात ‘क्षय’ कधी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील एकूण क्षय रुग्णांपैकी 20% रुग्ण भारतात आहेत. दरवर्षी सुमारे 30 लाख लोकांना क्षयरोगाची लागण होते आणि दरवर्षी या आजाराने 3 लाख भारतीय मृत्युमुखी पडतात आणि त्यात भर म्हणून की काय आता औषधांना दाद न देणारा या आजाराचा एक नवा प्रकार वाढीला लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच जागतिक क्षयरोग दिनानिमित्त, ‘याचि देही याचि डोळा क्षयरोगापासून मुक्ती मिळवा’ अशा अर्थाची घोषणा केली, परंतु भारतातील क्षयरोगाची आणि रुग्णांची गंभीर स्थिती पाहता या अशा आशादायक शुभेच्छा न देणेच योग्य ठरेल. याचे कारण म्हणजे, क्षयरोग हा ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय’ या जंतूंमुळे होतो. या रोगावर पूर्वी कुठलेच औषध नव्हते, तेव्हा लागण झाली म्हणजे गच्छंतीच, असा समज होता; पण जसजशी या आजारावरची प्रतिजैविके शास्त्रज्ञांनी शोधून काढली, तसतसे या आजारामुळे रुग्ण पूर्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. स्ट्रेप्टोमायसीन, रिफाम्पिसीन, आयसोनायझाइड, पास, पायरीझिनामाईड, इथँम्ब्युटॉल अशी विविध परिणामकारक औषधे विकसित केली गेली.

1993मध्ये जगातून हा आजार समूळ नष्ट करायची घोषणा आणि प्रतिज्ञासुद्धा घेतली गेली. पण प्रत्यक्षात मात्र विपरीतच घडत गेले. क्षयरोगासाठी वर सांगितलेली जी प्रतिजैविके वापरली जातात, ती देताना एका दिवशी चार ते पाच औषधे एकत्रित किंवा दिवसातून वेगवेगळ्या वेळी दिली जातात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत या औषधांपैकी प्रथम एक-दोन औषधांना, विशेषत: आयसोनायझाइड व रिफाम्पिसीन या प्राथमिक फळीतल्या औषधांना आणि कालांतराने सर्वच औषधांना, प्रतिरोध जाणवू लागला आहे. प्रतिरोध म्हणजे ही प्रतिजैविके वापरूनदेखील रुग्णामधील क्षयरोगाचे जंतू नष्ट होत नाहीत. एकाप्रकारे ते जंतू ही औषधे पचवतात आणि त्यामुळे आजार आटोक्यात येत नाही.


काही ठरावीक औषधांना दाद न देणारा क्षयरोग म्हणजे एम्.डी.आर. ट्युबरक्युलोसिस आणि कुठल्याच औषधांना प्रतिसाद न देणारा म्हणजे टोटल ड्रग रेझिस्टन्ट- टी. डी.आर. ट्युबरक्युलोसिस हे क्षयरोग निवारणाच्या कार्यातील अत्यंत गंभीर आणि चिंताजनक अडथळे आहेत, हे जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्षात आले आहे. या प्रकारचे क्षयरोग दिलेल्या औषधांना प्रतिसाद न मिळाल्याने, त्या रुग्णांच्या शरीरातील इतर अवयवांमध्ये पसरतात. त्यामुळे फुफ्फुसाचा क्षयरोग हा पोटातील आतडी, मेंदू, हृदय, शरीरातील हाडे, जननेंद्रिये अशा ठिकाणी पसरतो आणि रुग्णाची तब्येत खालावून तो दगावू शकतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अशा रुग्णाकडून त्याच्या आजूबाजूला वावरणा-या व्यक्तींना या आजाराची बाधा होऊ शकते आणि अनिर्बंधपणे हा आजार एकाकडून दुस-याला, तिस-याला असे करत मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. नुकतेच मुंबई शहरातील 12 रुग्णांच्या थुंकीच्या तपासणीत असे कुठल्याही औषधाला पचवणारे टी.डी.आर. जातीचे क्षयरोगाचे जंतू सापडले आणि एकच चिंतेची लाट सा-या आरोग्यविश्वामध्ये पसरली. या एम्.डी.आर. टयुबरक्युलोसिसच्या पहिल्या फळीतली औषधे कुचकामी ठरल्यावर त्यांना त्याहीपेक्षा जास्त परिणामकारक अशी दुस-या फळीतली औषधे उपचारांकरता शास्त्रज्ञांनी विकसित केली आहेत. याही फळीतली औषधे उपयुक्त न ठरल्यास क्लोफामिझीन, लीनोझोलीड, थायोअसिटॅझोन, इमिपेनाम, सिलास्टिन अशी अत्यंत नव्या औषधांची तिसरी फळीसुद्धा निर्माण केली गेली आहे. ही औषधे खूप महाग जरूर असतात, पण रुग्णाचा आटोक्याबाहेर चाललेला क्षयरोग बरा करून त्याचा प्राण वाचवणारी ठरतात. प्राथमिक औषधांच्या फळीतील, तुलनेने स्वस्त औषधांना प्रतिरोध निर्माण होऊन, एम्.डी.आर. किंवा टी.डी.आर. क्षयरोग होण्याची महत्त्वाची कारणे पाहायला गेले तर लक्षात येते की
* बहुसंख्य क्षयरोगी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आहेत, तरीही ते खासगी दवाखान्यात जाऊन आपला उपचार करतात. ही औषधे बराच काळ म्हणजे 9 महिने ते कधी कधी सव्वा वर्षे घ्यावी लागतात. औषधे, तपासण्या, डॉक्टरांची फी या सा-याचा महिन्याचा खर्च साधारणपणे एक ते दीड हजार रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे हे रुग्ण औषधे सुरू तर करतात; पण काही काळाने खर्च न परवडल्यामुळे ते अधूनमधून औषधे घेत नाहीत किंवा मध्येच सारे उपचार बंद करतात. त्यामुळे त्यांच्यात प्रतिरोध निर्माण होतो. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्‍ट्रातल्या अनेक शहरांमध्ये म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा ठिकाणी पब्लिक-प्रायव्हेट मिक्स ही योजना राबवण्यात आली आहे. यात खाजगी दवाखान्यात येणा-या गरीब क्षयरुग्णांकरता सरकारतर्फे मोफत औषधे पुरवली जातात.
* भारत सरकारने 1997मध्ये ‘सुधारित राष्‍ट्रीय क्षयरोग निवारण योजना’ (आर.एन.टी.सी.पी.) सुरू केली. याद्वारे गेली पाच वर्षे दरसाली 1,50,000 रुग्णांचे निदान करून त्यांना मोफत औषधोपचार केला जातो. क्षयरोग निवारणासंदर्भात सा-या जगातील ही सर्वात मोठी योजना आहे. महाराष्‍ट्रातदेखील सरकारी इस्पितळांमध्ये विशेषत: पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सातारा,सांगली आणि इतर जिल्ह्यांमध्ये डॉटस् पद्धतीने उपचार, थुंकी आणि एक्स-रे या तपासण्या मोफत होतात. यामध्ये एच.आय.व्ही.बाधित रुग्णांना होणा-या क्षयरोगाकरतासुद्धा इलाज केले जातात. या योजनेअंतर्गत रुग्णाला रोजच्या रोज औषधे दिली जातात आणि तो न आल्यास सरकारी आरोग्यसेवक त्याच्या घरी जाऊन त्याला औषधे घ्यायला लावतो, परंतु केवळ 30-35 % रुग्णच या सेवेचा फायदा घेतात. यातही आरोग्यसेवकांच्या हातावर तुरी देऊन औषधे चुकवणारे खूप जण असतात. त्यांच्यातही हा प्रतिरोध निर्माण होतो.
* गेल्या वर्षी केलेल्या पाहणीनुसार 60% खासगी डॉक्टरांना क्षयरोगावरील औषधांची योग्य मात्रा माहीत नाही, असे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या उपचारात अयोग्य मात्रेची औषधे,अयोग्य प्रमाणात आणि चुकीच्या कालावधीसाठी दिली जाता. प्रतिरोध निर्माण होण्यासंबंधीचे हे कारण सर्वात महत्त्वाचे आणि गंभीर आहे. याकरता इंडियन मेडिकल असोसिएशन, क्षयरोगविषयक संस्था, डॉक्टरांकरता सेमिनार, अभ्यासवर्ग, माहितीपत्रके, नवीन संशोधनावरील असे शैक्षणिक उपक्रम राबवून ही त्रुटी नष्ट करण्याचे प्रयत्न करत आहेत. क्षयरोग निदान आणि उपचारांबाबत महाराष्‍ट्रराज्यात मात्र हे चित्र आशादायक आहे. कोल्हापूर, पुणे, नाशिक या भागात क्षय रुग्णांची संख्या घटल्याचे आणि बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आलेले आहे.
महाराष्‍ट्रसरकारने प्रसिद्ध केलेल्या इ.स.2012च्या आकडेवारीनुसार, आर.एन.टी.सी.पी. अंतर्गत क्षयरोगासाठी पूर्ण औषधोपचार घेऊन ब-या होणा-या रुग्णांची महाराष्‍ट्रातली टक्केवारी 84.6% आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात 92% पर्यंत, धुळे जिल्ह्यात 87% पर्यंत रुग्ण बरे झाल्याचे आढळते. क्षयरोगाचे उपचार करूनसुद्धा मृत्युमुखी पडणा-या व्यक्तींची महाराष्‍ट्रातील संख्या 6% आहे. अकोला, लातूर, अहमदनगर, हिंगोली, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 10 ते 12% रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला. बाकी जिल्ह्यात याचे प्रमाण 2 ते 4% एवढे कमी आहे. संपूर्ण राज्यात 5% व्यक्तींनी हा उपचार मध्येच थांबवला, तर 4% रुग्ण हे एम्.डी.आर. गटातील आढळले. महाराष्‍ट्रात दर लाखामध्ये 116 रुग्ण क्षयरोगाने ग्रासलेले आढळले, जागतिक आरोग्य संघटनेने हे उद्दिष्ट लाखामागे 23 असे दिले आहे. आपल्या आकडेवारीनुसार महाराष्‍ट्रराज्यात क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत सर्वसाधारणपणे 2.5% घट दरवर्षी होते आहे. ही घट मात्र त्यामानाने फारच कूर्मगतीने होत आहे.


प्रत्येक संशयित रुग्णाचे लवकर निदान करणे, योग्य औषधांचा पूर्ण काळ वापर करणे, सर्वसामान्य जनतेचे क्षयरोगाबाबत प्रबोधन करणे, डॉक्टरांना नवनवीन उपचारपद्धतीत पारंगत करणे, एम.डी.आर. आणि टी.डी.आर. जातीच्या क्षयरुग्णांसाठी नवीन औषधे सहज आणि परवडतील अशा दारात उपलब्ध करणे, सरकारने आणि समाजसेवी संस्थांनी या आजाराची गांभीर्याने दखल घेऊन सर्व त्रुटींवर मात करण्यासाठीची योजना आखणे; या गोष्टी जर घडल्या तर महाभयंकर समजल्या जाणा-या या चिकट आणि हट्टी आजाराची भारतातून उचलबांगडी करणे अजिबात अशक्य नाही. क्षयरोगाने त्याचा बाडबिस्तरा उचलला, हे ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही.

avinash.bhondwe@gmail.com