आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींचे चुकले कुठे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भाजपचे अध्यक्षपद पुन्हा न स्वीकारण्याचा निर्णय नितीन गडकरी यांनी घेतला. गडकरी यांना जवळून ओळखणा-या आणि त्यापैकी जे कोणी हा नकाराचा निर्णय होण्याच्या पंधरा-वीस दिवस आधी गडकरी यांना भेटले त्यांच्यासाठी हा निर्णय मुळीच धक्कादायक नव्हता. ज्या पद्धतीने गडकरी या काळात वैतागलेले दिसत होते आणि त्यांची त्या काळातली देहबोली लक्षात घेता हा माणूस पक्षातील सर्वांना धक्कादायक वाटेल असा काहीतरी निर्णय घेणार हे दिसतच होते.

एक मराठी नेता त्रागा करत पक्षाचे सर्वोच्च राष्ट्रीय अध्यक्षपद नाकारत नव्हता तर त्याने ते नाकारावेच अशी परिस्थिती निर्माण केली जाण्याची भाजपातील ही दुसरी वेळ आहे. याआधी प्रमोद महाजन यांना या अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचे जे कारस्थान खेळले गेले त्या वेळीही राजनाथसिंह हेच नाव पर्याय म्हणून समोर आले आणि आता नितीन गडकरी यांनी माघार घेतली तेव्हाही राजनाथसिंह हेच नाव अध्यक्षपदासाठी बहुपसंतीचा म्हणा (सर्वसंमतीचा नव्हे!)की तडजोडीचा उमेदवार म्हणून समोर आले, हा काही निव्वळ योगायोग नाही. गडकरी यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मुदत संपण्यापूर्वीच काढून घेऊन देण्यात आले ते अडवाणी यांच्या पुढाकारातून आणि तेही प्रमोद महाजन यांचे महाराष्ट्रातील पंख कापण्यासाठी, हा काही मुळीच जुना इतिहास नाही. मुंडे-गडकरी वादाची बीजे अंकुरली ती प्रदेशाध्यक्षपदात बदल घडवून आणण्याआधी.

पण गडकरी यांना अवेळी प्रदेशाध्यक्षपद दिल्यावर या दोघात बेदिलीची बीजे मोठ्या प्रमाणात फोफावली. महाजन यांचे पंख कापण्यासाठी जी भूमिका अडवाणी यांनी गडकरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बजावली, त्याच भूमिकेची पुनरावृत्ती गडकरी यांना सलग दुस-यांदा अध्यक्षपद मिळू न देण्यात बजावली हे विसरता येणार नाही. रा.स्व.संघाची पकड सैल करणे हा या वेळी गडकरी यांना विरोध करण्यामागे अडवाणी यांचा डाव होता. व्यक्ती एकच पण त्याच्या नियुक्ती करण्यामागे आणि नव्या नियुक्तीला विरोध करण्यामागचे हेतू वेगळे असा हा मामला होता !
कोणतीही अटकळबाजी न करता किंवा आपले राजकीय विचार व्यक्त-अव्यक्तपणे सक्रिय न ठेवता गडकरी प्रकरणात कोण कसे-कसे चुकत गेले हे लक्षात घेतले पाहिजे.

वाजपेयी आणि अडवाणी राष्ट्री य स्वयंसेवक संघाचे कळसूत्री बाहुले न राहता देशाच्या राजकारणात स्वतंत्र आणि मोठे झाले. विविध पक्षांची मोट बांधून का होईना पंतप्रधान आणि उपपंतप्रधान झाले, हे संघाला कधीच रुचले नव्हते. सुदर्शन यांनी ही खंत म्हणा की मळमळ, वारंवार व्यक्त केलेली आहे. म्हणूनच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जे उदारमतवादी उमेदवार संघाचा रोष डावलून दिले, ते पडले. कारण संघाचे मतदार मतदानाला बाहेरच पडले नाहीत. या संदर्भात नागपूरचे उदाहरण बोलके आहे.
या मतदारसंघात भाजपचे उमेदवार अटलबहादूर सिंग यांना मतदान करायला जाण्याऐवजी घरी बसणे स्वयंसेवकानी पसंत केले होते. (रा.स्व.संघाची म्हणून जेवढी मते आहेत असा उल्लेख निवडणुकीच्या काळात केला जातो तेवढ्याच मतांनी अटलबहादूर निवडणूक हरले हे या संदर्भात महत्त्वाचे आहे) कारण मतदानाला जा, असे आदेश देण्यात आलेले नव्हते. इतके संघ-भाजप यांच्यातील संबध त्या वेळी दुरावलेले होते. संघाची भाजपवरील पकड ढिली झालेली होती. संघाला पुन्हा भाजपवर पकड आवळण्याची संधी अडवाणी यांनी मिळवून दिली. प्रमोद महाजन संघाला नको आहेत हे स्पष्ट झाल्यावर सर्वात प्रथम अध्यक्षपदासाठी तथाकथित सर्वसहमतीचे नाव म्हणून राजनाथसिंह यांना पुढे केले. महाराष्ट्रा च्या प्रदेशाध्यक्षपदी गडकरी यांना आणताना अडवाणी यांनी संघाला खुश करतानाच प्रमोद महाजन यांना शह दिला. नंतरच्या काळात मोहन भागवत सरसंघचालक झाले. त्यांनी अडवाणी यांना नामोहरम करण्यासाठी हेच नितीन गडकरी नावाचे शस्त्र धारदार करून वापरले आणि वयाची ऐंशी पार केलेल्या अडवाणी यांचे किमान पोस्टरवरचे का होईना, पंतप्रधानपदाचे स्वप्न कायमचे भंग केले.

अडवाणी यांना बाजूला सारताना सुषमा स्वराज किंवा अरुण जेटली हा कधीच संघासमोरचा पर्याय नव्हता तर तो गडकरी किंवा मोदी अथवा गडकरी आणि मोदी असाच होता ! 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा असलेले मोदी आणि सकारात्मक विकासाचा पुरस्कार करणारे गडकरी यांचे संयुक्त नेतृत्व मतदारांसमोर ठेवण्याचा रा.स्व. संघाचा मानस होता. गडकरी यांच्याऐवजी राजनाथसिंह राष्ट्री य अध्यक्ष झाल्याने सध्या तरी याबाबतीत संघाचा स्वप्नभंग झाला आहे. राजकीयदृष्ट्या चतुर अडवाणी यांनी तूर्तास तरी संघावर मात केली आहे, हा गडकरी यांच्या अध्यक्ष न होण्याचा एक अर्थ आहे. राष्ट्री य अध्यक्ष होण्याआधी गडकरी यांना दिल्लीतील राजकारणाचा अनुभव नव्हता. दिल्लीतील राजकारण आणि राजकारणी हे वेगळे रसायन आहे .

सर्व दृष्टीने राजकारणनिपुण म्हणून आपण शरद पवार यांचे नाव घेतो. पण दिल्लीतले जाणकार नेहमी सांगतात की दिल्लीत जे अर्क राजकारणात आहेत त्यांच्या तुलनेत शरद पवार 10 टक्केही नाहीत ! गोड बोलत, चेह-या वरची रेषही हलू न देता पटावरच्या सोंगट्या हलवता येणे ही दिल्लीतील राजकारणी होण्याची पहिली अट असते. गडकरी पडले रोखठोक, एक घ्यावी आणि दोन द्याव्यात ही त्यांची बेधडक वृत्ती. म्हणूनच होऊन जाऊ द्या पूर्तीची चौकशी, अशी भूमिका त्यांनी घेतली. राजकारणात वावरताना केसाने गळा कापण्याची आणि ते कापणे कळूही न देण्याची सवय गडकरींना नाही. या पार्श्वभूमीवर दिल्लीचा राजकीय कावेबाजीचा अर्क पचवणे गडकरी यांना जेमतेम जमू लागले न लागले तोच त्यांच्या खुर्चीखाली एकापाठोपाठ एक फटाके लावले गेले. ही साखळी थांबायलाच तयार नव्हती. हे सर्व स्वपक्षीयांकडून घडवून आणले जात होते; त्यात सत्ताधारी पक्षाचा वापर करवून घेतला जात होता आणि सर्व उघडपणे दिसत असूनही काहीच करता येत नव्हते.

दिल्लीच्या राजकारणात असणारे वास्तव स्वपक्षातीलही जळजळीत सत्य आहे हे गडकरी यांच्या पचनी पडणे कठीण झाले. त्यामुळे गडकरी कोंडीत सापडले. भांबावूनही गेले. एकापेक्षा एक शहेनशहा-ए-अर्क असलेल्या दिल्लीत केवळ संघाच्या पाठिंब्यावर राजकारण करता येणे शक्य नाही हे स्पष्ट झाल्यावर तथाकथित सन्मानाने बाजूला होणे एवढाच पर्याय समोर होता. खरे तर गडकरी यांना एक टर्म सरचिटणीस किंवा उपाध्यक्षपदी नियुक्त करून मग अध्यक्ष केले गेले असते तर पुरेसा अनुभव पदरी पडून जशास तशी टक्कर देण्याची त्यांची तयारी झाली असती. पण संघाची घाई नडली हा गडकरी यांच्या जाण्याचा आणखी एक अर्थ आहे.

लपवाछपवी न करता व-हाडी खाक्याचे अघळपघळ वर्तन असणा-या गडकरी यांना नडलेली आणखी एक बाब म्हणजे त्यांची निर्माण करण्यात आलेली कॉर्पोरेट प्रतिमा. खरे तर बहुतेक सर्वच राजकारणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्योजक किंवा व्यावसायिक आहेत. पण ते तसे जनतेला आणि प्रामुख्याने मीडियाला जाणवू देत नाहीत. विलासराव देशमुख असोत की गोपीनाथ मुंडे की शरद पवार यांच्या पक्षाशी संबधित, अनेकांनी सहकारी साखर कारखाने खासगीकरणाच्या मार्गाने ताब्यात घेतले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे तोट्याच्या खाईतून वर काढून अतिशय उत्तम प्रकारे ते कारखाने सुरू ठेवले आहेत. त्यामुळे भले झाले आहे ते शेतक-यांचे. पण गडकरी यांनी ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्याची, पूर्र्तीची आणि गडकरी उद्योजक व्यावसायिक असण्याची जास्त बोंब झाली ती त्यांनी राष्ट्री य अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर.

या कॉर्पोरेट प्रतिमेच्या गडकरीही प्रेमातच पडले ! ते त्यांच्या वेशभूषा आणि वर्तनातून दिसू लागले, कोटी-कोटीच्या होणा-या बोलण्यातून जाणवू लागले आणि ते परंपरानिष्ठ भाजपला खटकले. भाजपातल्या ज्यांचा गडकरी यांना विरोध होता आणि अशांची संख्या मोठी होती, त्यांनी गडकरी फ्लाइंग आणि कॉर्पोरेट नेते कसे आहेत याच्या चविष्ट चर्चांचे मग पीकच लावले. गडकरी जरी व्यवस्थापनतज्ज्ञ असले तरी त्यांचे आर्थिक सल्लागार कुचकामी आहेत हे पूर्र्ती प्रकरणातून सिद्ध झालेले होते. तरीही गडकरींना या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे व्यवस्थापन जमले नाहीच. (पूर्र्ती प्रकरणात भ्रष्टाचार नसून काही अनियमितता आहेत अशाच अहवालाची अपेक्षा असून त्यासाठी अखेर या सल्लागारांचाच बळी जाणार असल्याची चिन्हे आहेत) ते व्यवस्थापन जमले नाही हे जरी खरे असले तरी राजकारणात जोर का धक्का धीरे से, केव्हा आणि कसा द्यायचा याचे भान गडकरी यांना नाही हे म्हणणे आणि समजणे तर खूपच भाबडेपणाचे आहे.

नितीन गडकरी यांचे भवितव्य काय, यावर मीडियात भरपूर चर्चा झाली आहे. माणूस अखेरचा श्वास घेईपर्यंत राजकारणात संधी असतेच, हे सत्य ही चर्चा करताना विसरले गेले. गडकरी यांच्या बाजूने त्यांचे वय आणि रा.स्व.संघाचा त्यांना असणारा पाठिंबा या दोन आणखी जमेच्या बाबी आहेत. महाराष्ट्रा त परतण्याचे त्यांचे दोर आता कापले गेले आहेत. पूर्र्ती प्रकरणाचा निकाल काय लागायचा तो लागो, गडकरी नागपूर किंवा वर्धा येथून लोकसभा निवडणूक लढवणार आणि देशाच्या राजकारणात सक्रिय राहणार हे स्पष्ट आहे. पुरेसा अनुभव पदरी नसल्याने गडकरींना सध्या माघार घ्यावी लागली असली तरी ती तात्पुरती आहे हे निश्चित. जाता जाता एक खबर कळली ती म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या नागपूरच्या एका निकटच्या आप्ताकडे आयकर खात्याने सर्व्हे केला. दिल्लीकरांचे टार्गेट आता मुंडे आहेत हाच संदेश यातून मिळतो. प्रतिकूल परिस्थितीत एकजूट हा मानवी स्वभाव आहे. त्यानुसार दिल्लीकरांशी लढण्यासाठी हे दोघे पुन्हा एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

praveen.bardapurkar@gmail.com