आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Struggle To Face Challenges Arise By Women

सामाजिक प्रवाहात महिला v/s महिला (दिव्य मराठी ब्लॉग)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आज त्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे असा युक्तीवाद आपण नेहमी करतो. हे खरं आहे त्यात काही शंका नाही परंतू हेही इतकंच खरं आहे की, आजही कितीतरी महिला समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांचे विश्व चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यदित आहे. त्यांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना लढा द्यावा लागत आहे.
कित्येक गावांत मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही. अनेक मुलींचे लहान वयात लग्न लावून दिले जाते. लहान वयात त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास भाग पाडले जाते. शिकूनसुद्धा महिलांना विचारस्वातंत्र्य मिळत नाही. त्याचप्रमाणे महिलांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. समाजाच्या भीतीपोटी अजूनसुद्धा त्यापैकी अनेक घटनांची तक्रार नोंदवली जात नाही. अशा अनेक कारणांसाठी आजही महिला न्यायापासून वंचित आहेत.
गेली अनेक वर्ष समाजात महिलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा देण्यात आलेला आहे.
महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अनेक संस्था जगभर कार्यरत आहेत. संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिलेले असले तरीही अनेक महिलांना त्यांचे मुलभूत हक्क मिळत नाहीत. जागतिक मानवी हक्क समितीनेदेखील महिलांसाठी CEDAW ( Convention on the Elimination of All forms of Discrimination against Womenहा ठराव पास केला आहे. स्त्रियांना समाजात समान नागरी, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक अधिकार मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चळवळींचा एकत्रितपणे समावेश 'स्त्रीवादाचा सिद्धांत' या संकल्पनेत करण्यात येतो. त्याचप्रमाणे या सिद्धांतामध्ये स्त्रीपुरूष समानता, स्त्रियांचे सामाजिक स्थान याचादेखील अभ्यास केला जातो.
कुठलाच विचारप्रवाह सुरळित असू शकत नाही, त्याच्या विरोधातील विचारप्रवाह अस्तित्वात निर्माण होतोच. Women against feminism हे त्याचेच उदाहरण आहे. आधुनिक स्त्रीवादाला विरोध करणारी ही चळवळ अमेरिकेमध्ये जुलै 2013 मध्ये अस्तित्वात आली. स्त्रियांनी सुरू केलेली ही चळवळ ट्विटर, फेसबूक, युट्यूब आणि Tumblr सारख्या वेबसाइट्सवरून प्रसिद्ध होत आहे. ट्विटरवर #Womenagainstfeminism हा हॅशटॅग खुप प्रसिद्ध झाला आहे.
त्याचप्रमाणे Tumblr या वेबसाईटवर अनेक महिलांनी आपले सेल्फी टाकून आधुनिक स्त्रीवादाला विरोध करण्याची कारणे दिली आहेत. या सेल्फीजमध्ये एक संदेश लिहिलेला असतो ज्याची सुरूवात 'मला स्त्रीवादाची गरज नाही कारण...' या वाक्यापासून होते. या चळवळीचा स्त्रीवादाला विरोध आहे कारण त्यांचा समानतेच्या तत्वावर विश्वास आहे आणि त्यांच्या मते आधुनिक स्त्रीवादाचा सिद्धांत हा केवळ पुरूषांनाच गुन्हेगार ठरवतो. आम्हाला कोणत्याच त्रासाला सामोर जावे लागले नाही. समाजातील सगळेच पुरूष वाईट नसतात. स्त्रीवाद बलात्कार, आत्महत्यासारख्या महत्वाच्या मुद्दयांना डावलून केवळ पुरूषांचा द्वेष करण्यातच धन्यता मानतो असेही या स्त्रियांचे म्हणणे आहे.
काही स्त्रीवादी विचारवंतांनी असा आरोप केला आहे की ही चळवळ मुळात पुरूषांसाठी लढणाऱ्या लोकांनी सुरू केली असून स्त्रियांचा यात केवळ वापर करण्यात आला आहे. तर ज्या स्त्रियांनी ही चळवळ सुरू केली आहे त्यांना नेमका स्त्रीवाद म्हणजे काय हे कळालेच नाहीये; त्यांची केवळ दिशाभूल करण्यात आली आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. स्त्रीवादाचा सिद्धांत मुळातच स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार करतो असे त्यांचे म्हणणे आहे.
भारतातदेखील या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जणांनी सोशल मिडीयावरून आपले समर्थन दर्शवले आहे. एकूण सगळा विचार करता खरंच ज्यांना कधी कोणत्याच गोष्टीत दुय्यम वागणूक मिळाली नाही त्यांना स्त्रीवादासारख्या गोष्टी फोल वाटत असतील. त्यात काही चूक नाही, तसेच त्यांना इतर स्त्रियांबद्दल सहानूभुती वाटत असली तरी लढा वगैरे अशी संकल्पना मान्य नसावी. पण आजदेखील समाजात कितीतरी निरपराध महिला, मुली अत्याचाराचा सामना करत आहेत. त्यांना कोणीतरी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. ते काम स्त्रीवादी लोक करत आहेत असे मला वाटते. त्यामुळे कोणाला जरी वैयक्तिक पातळीवर स्त्रीवादावर विश्वास नसला तरीही आपल्या विरोधी विचाराचा आदर करता आला पाहिजे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की या भांडणात दोन्ही पक्षांनी आपला मुद्दा पटवून देताना समोरच्या पक्षाच्या मताचा आदर करावा आणि यावर योग्य उपाय शोधून काढावा.