आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक स्थानिक स्वराज्य संस्था दिन: पालिका आयुक्त-महापौर सहकार्य हवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.दोघांवरही जनतेचे प्रश्न सोडवण्याची आणि विकासकामे करण्याची जबाबदारी असते. मात्र, बहुतेक ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात खटके उडताना दिसतात. जागतिक स्थानिक स्वराज्य संस्था दिनानिमित्त काही महत्त्वाच्या शहरांतील महापौर, महापालिका आयुक्तांनी एकमेकांबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा.


नागपूर महानगरपालिका
आयुक्तांनी नव्या कल्पना राबवाव्यात
महापालिका आयुक्तांची भूमिका प्रशासनात महत्त्वाची असते. समन्वय आणि सुसंवादातून कामे व्हायला हवीत. महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी विकासाच्या नवनवीन कल्पना राबवून शहर विकासाला गती दिली पाहिजे. लोकशाहीत सभागृह हे सार्वभौम असते. त्यामुळे महापालिका
आयुक्तांनी सभागृहाच्या निर्देशांचे पालन केले पाहिजे. महापालिका आयुक्तांनी दैनंदिन बैठका घेऊन
विकासकामांना गती दिली पाहिजे.
अनिल सोले, महापौर
महापौर-प्रशासन सुसंवाद हवा
महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत. महापौरांनी शहराचा विकास अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा असते.
विकासाबाबत प्रशासन सदैव महापौरांच्या सोबत आहे नि राहील. नाग नदी स्वच्छतेचा
प्रकल्प महापौरांनी घेतला. तो प्रशासनाने पूर्ण नेटाने राबवला. आज त्या प्रकल्पाला पुरस्कार मिळाला आहे. महापौर आणि प्रशासनात समन्वय आणि सुसंवाद राहायला हवा आणि विकासाचे निर्णय परस्परांशी चर्चा करून घेतले पाहिजेत याची काळजी आम्ही घेतो.
श्याम वर्धने, आयुक्त


नाशिक महानगरपालिका
सहकार्य अपेक्षित
लोकाभिमुख कामांकरिता प्रशासनाकडून सहकार्य अपेक्षित असते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे एकाच रथाची दोन चाके आहेत. यामुळे कुठलाही निर्णय घेताना एक बाजू होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी मागील काळात घेतलेल्या निर्णयावर प्रशासनाने अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, जेणेकरून शहर विकासाबाबतची कामे प्रलंबित राहणार नाहीत.
अ‍ॅड. यतीन वाघ, महापौर
समजून घेणे महत्त्वाचे
स्थानिक स्वराज्य संस्थेत आयुक्त आणि महापौर हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. परस्पर विश्वास आणि सहकार्यातूनच संस्थेच्या विकासाचा गाडा पुढे नेता येतो. त्याचप्रमाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील प्रमुख दुवा म्हणूनदेखील महापौरांचे महत्त्व आहे. जनतेसाठी काम करताना एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते. थेट जनतेवर परिणाम करणारा निर्णय दोन्ही घटकांनी चर्चा करूनच घेणे आवश्यक आहे. संजय खंदारे, आयुक्त


सोलापूर महापालिका
सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे
सोलापूर महापालिकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत. सुवर्णमहोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्याचा आमचा मानस आहे. रस्ते, दिवाबत्ती, पाणी, कचरा व्यवस्थापनासह स्वच्छता अभियान राबवणे, झाडे लावणे आदी उपक्रम आयुक्तांनी राबवावेत. यासाठी त्यांना सहकार्य करू. शहराचा विकास व्हावा, यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत.
अलका राठोड, महापौर
विकासासाठी सहकार्य हवे
लोकप्रतिनिधींनी धोरणे ठरवावीत आणि प्रशासनाने त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे लोकशाहीत अपेक्षित आहे. त्याला अनुसरूनच माझी भूमिका आहे. पदाधिका-यांनी धोरणे ठरवावीत. प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी व्हावी, शहराच्या विकासासासाठी, विविध सुधारणांसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. महापौर, पदाधिका-यांनी सहकार्य करावे, सोलापूरचा चेहरा निश्चितपणे बदलेल.
चंद्रकांत गुडेवार, आयुक्त


अकोला महापालिका
समन्वय ठेवणे गरजेचे
अकोला शहरासाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या आहेत. कोट्यवधींचा निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. पण महापालिका प्रशासनाचे सहकार्य शून्य आहे. योजना मार्गी लावणे आणि पाठपुरावा करणे हे प्रशासनाचे काम आहे. मागील दीड वर्षापासून प्रशासनाचा सत्ताधा-यांसोबत अजिबात समन्वय नाही. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नाही. अधिका-यांमध्येही एकसंघता नाही आहे. आयुक्तांनी पदाधिका-यांसोबत समन्वय ठेवणे गरजेचे आहे.
ज्योत्स्ना गवई, महापौर
निर्णय घेणे गरजेचे
राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी मनपाला प्राप्त झाला आहे. यासाठी सर्व पदाधिका-यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची गरज आहे. तातडीने निर्णय घेतल्यास योजना मार्गी लावून नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा लवकर मिळतील. मात्र, मागील काही दिवसापासून निर्णया अभावी योजना रखडल्या आहेत. परिणामी, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सत्ताधा-यांनी प्रशासनाला अधिक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
दीपक चौधरी, आयुक्त


औरंगाबाद महानगरपालिका
अंमलबजावणी आयुक्तांचे काम
महानगरपालिकेचे काम करताना रस्ते, पाणी, दिवाबत्ती या मूलभूत गरजांसोबत उद्याने, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करताना प्रशासनाचे सहकार्य अत्यावश्यकच बनते. नगरसेवक, लोकप्रतिनिधी हे धोरण आणि योजना ठरवतात, त्यांची अंमलबजावणी करणे हे आयुक्तांच्या नेत्तृत्वाखालील प्रशासनाचे काम आहे. सर्वांशी समन्वय साधून हे काम करणे अपेक्षित आहे. ते ब-याच बाबींत घडते, पण काही ठिकाणी मतभेद उद्भवतात. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे, तर नियम आणि कायद्यातून मार्ग काढत ते कसे सोडवायचे हे प्रशासनाने केले पाहिजे. आयुक्तांनी एलबीटी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, थकबाकी वसूली यावर काम करायला हवे.
कला ओझा, महापौर
औरंगाबादच्या महापौर, आयुक्त यांच्यातील वादाचे प्रमुख मुद्दे
1. अर्थसंकल्प तयार करताना नगरसेवकांच्या सूचनेनुसार समाविष्ट करण्यात आलेल्या कामांवरून संघर्ष.
2. प्रियंका केसरकर यांना परत पाठवण्यासाठी महापौर आणि सर्वसाधारण सभेने सांगितले होते, ते आयुक्तांनी ऐकले नाही.
3. पेव्हर ब्लॉकचा वापर करून खड्डे भरण्याच्या महापौरांनी केलेल्या सूचना आयुक्तांनी केराच्या टोपलीत फेकल्या.
4. मनपाच्या धोरणात्मक बाबींची घोषणा करण्याचा महापौरांचा अधिकार डावलून आयुक्तांकडून घोषणा होण्याचा प्रकार
5. शहर अभियंतापदाबाबत महापौर आणि सर्वसाधारण सभेच्या निर्णयानंतरही आयुक्तांनी तो गांभीर्याने न घेणे.


जळगाव महानगरपालिका
आयुक्त अपडेट असावेत
महापालिकेची गाडी ही महापौर व आयुक्त या दोन चाकांवर चालते. त्यातील एका चाकाची जरी हवा कमी झाली तरी गाडीची गती कमी होते. पदाधिका-यांकडून जनतेला कामाची अपेक्षा असते. प्रशासनाकडून आर्थिक अडचणीचा मुद्दा पुढे केला जातो. महापालिका आयुक्तांची प्रशासनावर पकड असावी. ते केंद्र व राज्यांच्या योजनांबद्दल अपडेट असावेत.
किशोर पाटील, महापौर


नियमांच्या चौकटीत काम करावे
महापौर व नगरसेवकांनी महापालिकेच्या नियमांच्या चौकटीत राहून सभेचे कामकाज करावे. त्यासाठी जनतेच्या प्रश्नांना त्यांनी अग्रक्रम द्यावा. त्यांना नियोजन व व्हिजन असावे. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी चौकटीतून बाहेर जाऊन विचार करण्याची तयारी महापौरांची असावी. लोकाभिमुख कारभार होण्यासाठी प्रशासनाचा योग्य प्रकारे उपयोग करून घेता यावा. महापौरांना राज्य व केंद्र शासनाच्या कारभाराची कल्पना असावी. संजय कापडणीस, आयुक्त