आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत साकारतोय जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या मोजावे वाळवंटात जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प इवानपा साकारत आहे. इवानपाच्या 500 फूट उंचीच्या एका सौरस्तंभाचा उजेड एक किलोमीटरच्या अंतरावरून दिसू शकतो. प्रकल्पात एक लाख 73 हजार आरसे (हेलिओस्टेट्स) लावण्यात आले आहेत. युनिट-1 हा जवळपास 4000 एकरवर पसरलेला इवानपाच्या तीनपैकी पहिला टॉवर आहे. या वर्षअखेर हा प्रकल्प पूर्ण होईल. हा प्रकल्प 392 मेगावॉट वीज तयार करेल.


130 अब्ज रुपये खर्चाचा इवानपा सर्वसाधारण सौरऊर्जा प्रकल्पापेक्षा वेगळा आहे. सूर्यप्रकाश थेट विजेत रूपांतर करण्याऐवजी हा सूर्यप्रकाशापासून उष्णता तयार करेल आणि त्यातून वीज तयार करेल. वाळवंटात वर्षभर भरपूर प्रकाश उपलब्ध असतो. परंपरागत सोलर-पॅनल व विंड पॉवरच्या तुलनेत सौरऊर्जा तंत्राद्वारे निरंतर ऊर्जा प्राप्त करणे सुलभ होईल. प्रकल्पाला भांडवल देणा-या एआरजी एनर्जी कंपनीचे सीईओ डेव्हिड क्रेन यांच्या मते हे कॅलिफोर्निया व जगासाठी एक मोठे पाऊल आहे.


इवानपाचे तंत्रज्ञान साधेसोपे आहे. उष्णतेचा वापर करून यातून परंपरागत ऊर्जा प्रकल्पासारखी वीज तयार होते. प्रकल्पात लावलेले आरसे सौरऊर्जेला पाण्याने भरलेल्या सोलर टॉवरवर एकत्र करतात. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ बनते. वाफेला पाइपमधून टॉवरच्या खालच्या भागातील टर्बाइनमध्ये वीजनिर्मितीसाठी पाठवले जाते. वाळवंटातील सूर्याचा प्रकाश तेच काम करतो, जे परंपरागत वीजनिर्मिती प्रकल्प कोळसा किंवा नैसर्गिक वायुच्या वापरातून करतो. इवानपा प्रकल्पातून प्रदूषण होत नाही.


सौरस्तंभ प्रकल्प चालवण्याचे प्रयत्न अगोदर यशस्वी झाले नाहीत. कारण या प्रकल्पांना आर्थिक पाठबळ मिळाले नाही. परंतु इवानपा प्रकल्पासाठी 995 कोटी रुपये भांडवल ओतणा-या गुगलसह सरकारचीदेखील मदत मिळाली. सरकारने 94 अब्ज रुपयांचा कर्ज पुरवठा त्यासाठी केला आहे. इवानपाला पर्यावरणवाद्यांच्या विरोधासह काही इतर आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. वाळवंटाचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी एक लाख 73 हजार आरसे जमिनीपासून काही फूट उंचीवर लावले आहेत. खरे आव्हान त्यावेळी उभे राहिले जेव्हा लक्षात आले की, निर्माणस्थळी दुर्मिळ जातीची 150 वाळवंटी कासवे राहतात. ही कासवे दुर्मिळ जाती संरक्षण कायद्याने संरक्षित केली आहेत. त्यामुळे 296 कोटी रुपये खर्च करून या कासवांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. इवानपा सौरऊर्जा प्रकल्पाचे यश विशाल सौरऊर्जा प्रकल्प बनवण्यासाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल.