चांगली उंची आणि देखणे रंगरूप असले की अनेकांना बॉलीवूडचे डोहाळे लागतात. किमान टीव्हीवर मालिकांमध्ये तरी चमकावे, अशी त्यांची इच्छा होते. मात्र, केवळ फूट इंच उंची किलो वजनाच्या एखाद्या २० वर्षीय तरुणीने असे स्वप्न बघितले तर? होय, जगातील सर्वांत ठेंगणी म्हणून गिनीज बुकात नोंद झालेल्या नागपूरच्या ज्योती आमगे हिने ‘अमेरिकन हॉरर स्टोरी’मध्ये महत्त्वाची भूमिका करून हे स्पप्न पूर्ण केले. अमेरिकेत घरोघर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या मालिकेतून गाजलेली ज्योती आता सर्वांचीच चाहती झाली आहे. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या मालिकेत ती एस्ला नावाच्या पात्राची असिस्टंट दाखविली आहे. तिच्याशी फोनवर साधलेला हा थेट संवाद तिच्याच शब्दांत...
मालिकेतील माणसे चित्रविचित्र, तरी तितकेच प्रेमळ... सर्वसामान्यांसारखेच...
- ‘अमेरिकन हॉरर स्टोरी मालिकेबाबत मी प्रचंड एक्सायटेड आहे. असं वाटतंय ही मालिका संपूच नये. इथे प्रत्येक जण माझी काळजी घेताना दिसतो. अर्थात माझी अतिकाळजी कुणी घेत असेल तर मला संकोचल्यासारखं होतं. मला इंग्रजी येत नसल्यामुळे संवादात अडचण येते. मात्र, दुभाषकामुळे ही अडचण आता बर्यापैकी दूर झाली आहे. जे लोक ही मालिका बघतात, त्यांना मी सांगू इच्छिते की ही माणसं विचित्र नाहीत. ते त्यांच्या जागेवर सर्वसामान्य आहेत. हा शो पण फार भीतिदायक नाही, तर तो काही अंशी विनोदी आहे. मला या शोमध्ये काम करायला खूप आवडतेय.
- परदेशातील मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी मोठी प्रक्रिया असते. पण, माझ्याकडे मात्र हे काम चालून आले. गिनीज बुकमध्ये माझे नाव नोंदले गेले तेव्हा त्यांनी मुलाखतीत माझी इच्छा विचारली होती. मी हॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हॉरर स्टोरीसाठी मला बोलावण्यात आले.
- या मालिकेतील काही पात्र जगावेगळी आहेत. शारीरिक व्याधी असल्यामुळे ते सर्वसामान्य दिसत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला शूटिंगमध्येही मी त्यांना घाबरत असे. पण, आता सगळेच मित्र-मैत्रिणी झाल्या आहेत. एका मोठ्या
भोपळ्यात मी लपून बसली हाेती, आणि सगळ्यात उंच मॉडेलला मी घाबरवते हा सीन करताना खूप मजा आली होती.
- कुणीही उचलून घेतलेलं मला आवडत नाही. मला कुणी लहान बाळासारखी वागणूक दिली तरी आवडत नाही. माझ्या डोक्याच्या केसांना कुणी माझ्या परवानगीशिवाय स्पर्श केला तर मी चिडून जाते. माझ्या कमी उंचीमुळे अभिनयालाही मर्यादा येत आहेत. शारीरिक हालचालीही मी फारशा करू शकत नाही. तरीही मेकअप केल्यावर माझ्यातील अभिनेत्री जागी होते आणि ती उत्तम कलाकृती माझ्याकडून करवून घेते.
- लग्नाविषयी मी फारसा विचार केलेला नाही. मला एखाद्या प्रसिध्द अभिनेत्याने जरी प्रपोज केले तरीही मी त्याला नकार देईन. मी हॉलीवूडमध्ये जावं आणि मोठी अभिनेत्री व्हावं, हे माझं मोठं स्वप्न आहे. त्यासाठी मी प्रयत्नही सुरू केले आहेत. यापूर्वी मी
बिग बॉस सिझन-६ मध्ये एक आठवड्यासाठी आले होते. इंग्रजी शिकण्याचा मी प्रयत्न करीत आहे. माझी उंची कमी असल्यामुळे लोकांना मी आवडते. पण, केवळ आमच्या उंचीकडेच पाहू नये तर आम्हीही चांगला अभिनय करू शकतो, ही गोष्ट सर्वांनी समजून घ्यावी. सर्वसामान्य कलाकारांच्या तोडीचा अभिनय शारीरिक वैगुण्य असलेले कलाकारही करू शकतात, हे आम्ही हॉरर स्टोरीमधून दाखवून देत आहोत. मला माझ्या उंचीचा गर्व आहे. या उंचीनेच मला जागतिक पातळीवर लौ
किक मिळवून दिला आहे.