आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसएम अण्णांचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त महाराष्‍ट्राच्या चळवळीतील अध्वर्यू एसएम अण्णा म्हणजे थोर स्वातंत्र्यसैनिक एस.एम. जोशी! या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल आम्ही वृत्तपत्रांतूनच वाचून-ऐकून होतो. त्यांचा आणीबाणीच्या विरोधातील लढा आणि जनता पक्ष स्थापनेतील मोठे योगदान यामुळे 1977 च्या काळात त्यांचे नाव पुन्हा प्रकाशझोतात राहिले. अण्णा जनता पक्षाचे महाराष्‍ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते असे मला वाटते. याच काळात त्यांचे झंझावाती प्रचारदौरे गाजत होते. आणीबाणीच्या विरोधात त्यांचा प्रखर लढा सुरूच होता. या लढ्यातील सर्वच महनीय व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नामुळे जनता पक्ष सत्तेवर आला. एसएम अण्णांच्या हयातीतच महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग काही काळ का होईना यशस्वी झाला. अशा महनीय व्यक्तीला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या उमरगा शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळची गोष्ट. गोरापान रंग, कृश शरीरयष्टी, पांढरा पायजमा व खादीचा शर्ट पांढरे शुभ्र केस, अशा व्यक्तिमत्त्वाला पाहताना मन भरून येत होते. त्या काळात अशा व्हीआयपी लोकांना फारसा बंदोबस्त नसायचा. अ‍ॅम्बेसेडर कारमधून ते आले होते. कारमधून उतरताच लोकांनी त्यांचे जयघोषाने स्वागत केले. त्यांनीही हात जोडून अभिवादन करत लोकांच्या घोषणांचा आदराने स्वीकार केला. जयप्रकाशजींनंतर महाराष्‍ट्रात एसएम अण्णांचेच नाव सर्वच पक्षांतील मोठे नेते आदराने घेत. या माणसाने आयुष्यभर साधी राहणी आणि अखंड समाजसेवेचे व्रत घेतले. सत्ता येऊनही कधी पदाची लालसा केली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी राहिलेले, इंदिराजींच्या विरोधात आणीबाणीच्या काळात प्रचाराची राळ उडवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आम्ही जवळून पाहत होतो. त्यांना डोळेभरून पाहता आले, हाच अनुभव रोमांचित करणारा होता.