आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकदा अपमान सहन करूनही एक खंबीर प्रवास - सुधा मूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सदरात दर आठवड्याला एखादी संस्मरणीय चिठ्ठी, दैनंदिनी किंवा प्रेरणादायी गोष्ट सांगितली जाईल. याचा प्रारंभ सुधा मूर्तींच्या प्रेरणादायी आयुष्याच्या माध्यमातून करत आहोत. त्यांनी अनेक गोष्टी फक्त ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठीच लिहिल्या आहेत. हा जीवनप्रवास तीन भागांत प्रकाशित केला जाईल.
परिचय: सुधा मर्ती इन्फोसिस फाऊंडेशनच्या को-चेअरमन, समाजसेविका व लेखिकाही आहेत. कानडी व इंग्रजी भाषेतून त्यांचे लिखाण आहे.
१९९६ मध्ये इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना झाली. नॉन-प्रॉफिट किंवा खासगी संस्थेतील कामकाजाविषयी मला जास्त माहिती नव्हती. माझा अनुभवही खूप कमी होता. मात्र, आता मी अशा संस्थेची विश्वस्त बनले होते, ज्यात डोनेशन सिस्टिम तर होतीच; परंतु ती धर्म, भाषा, रंग, भेदभावापासून कोसो दूर होती. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे इन्फोसिसचे लक्ष्य अगदी स्पष्ट होते. अर्थात, अधिकाधिक लोकांचे हित जपण्याचे इन्फोसिसचे ध्येय होते.
संस्था स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम परिसरातील समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात कुपोषण, शिक्षण, औषधी, ग्रामीण विकास आदी समस्या प्रामुख्याने सामील होत्या. दरम्यान, माझ्या डोक्यात एका समस्येने घर केले होते आणि ती म्हणजे देवदासी प्रथा. देवदासी म्हणजे ईश्वराची सेविका होय. प्राचीन काळी कला, संगीत किंवा नृत्य क्षेत्राशी संबंधित महिलांना देवदासी म्हटले जायचे. या महिला मंदिरात आपल्या कला सादर करायच्या. ईश्वर आपली कला पाहून प्रसन्न होतो, अशी त्यांची धारणा होती. त्या काळी या महिलांना समाजात प्रतिष्ठाही होती. विनापोदी नामक राजाच्या दरबारात एक देवदासी होती. ती राजाच्या अगदी निकटवर्तीय होती. तिने मंदिराला भरपूर संपत्ती दान केली होती. नंतर काळ लोटला आणि मंदिर नष्ट केले जाऊ लागले. देवदासी पद्धती चुकीच्या लोकांच्या हाती गेली. सुरुवातीला युवती श्रद्धेने ईश्वरपूजा करायच्या. मात्र, काही काळानंतर देवदासींना वेश्या समजले जाऊ लागले. त्यापैकी काही जन्मजातच या क्षेत्रात वळल्या होत्या, तर काहींना त्यांच्या पालकांनी काही ना काही कारणास्तव मंदिराच्या हवाली केले होते. देवदासींना सामो-या जाव्या लागणा-या समस्यांविषयी जेव्हा मी विचार करायचे, तेव्हा कर्नाटकच्या येलम्मा गुड्डची (रेणुका मंदिर) यात्रा डोळ्यासमोर यायची. हिरवी साडी, बांगड्या, शरीरभर हळद, मोकळे केस, तोंडावर ईश्वराचा मुखवटा, हाती लिंबाचे पान आणि डोक्यावर कलश धरून देवदासी मंदिरात यायच्या.
यात्रेतील हे रूप पाहून मी देवदासींच्या समस्येवर काम करण्याचा निश्चय केला. मात्र, पहिल्याच प्रकल्पावेळी इतके मोठे आव्हान असेल याचा मी विचार केला नव्हता. नंतर कर्नाटकात धर्माच्या आडून वेश्यावृती सुरू असलेले एक ठिकाण शोधून काढले. त्यानंतर त्यांच्या समस्येवर काम करण्यासाठी एक आराखडा तयार केला. त्यानुसार सुरुवातीला देवदासींच्या समस्या जाणून घेणे, त्यावर चर्चा करणे आणि नंतर त्यावर उपाययोजना करणे असे नियोजन केले. दुस-याच दिवशी जीन्स, टी शर्ट, टोपी या पेहरावासह हाती नोटबुक, पेन घेऊन मी देवदासी राहतात त्या भागात गेले. काही अंतरावर गेल्यानंतर मी काही देवदासी आपसात बोलत असल्याचे पाहिले. मागचा पुढचा काहीच विचार न करता मी थेट त्यांच्याजवळ गेले. त्यांना नमस्कार केला आणि मी त्यांच्या मदतीसाठी आले असल्याचे सांगितले. बहुतेक देवदासी आधी कोणत्यातरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होत्या आणि मी मध्येच येऊन टोकल्याचे त्यांना आवडले नसावे. माझ्याकडे रागाने पाहत त्यांनी माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. कोठून आली? कोणी पाठवले आहे काय? येथे येण्यामागचे प्रयोजन काय? असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले आणि जर हाच हेतू असेल तर आम्हाला तुमच्याशी काहीच बोलायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट करून टाकले. आमची माहिती काढणा-या तुम्ही अधिकारी आहात की मंत्री? आम्ही समस्या सांगितल्या तर तुम्ही त्यावर काय उपाययोजना कराल? असे सांगत त्यांनी मला परत जाण्यास सांगितले. हे सर्व ऐकूनही मी जागच्या जागीच उभी होते. त्यांच्या मदतीसाठी आले असल्याचे मी त्यांना सांगितले आणि हळूच एड्सबाबत जनजागृतीचा मुद्दा छेडला. एड्सचा प्रसार आणि त्यावरील उपचाराविषयी माहिती देण्याचा प्रयत्न मी केला. तेवढ्यात एका महिलेने मला तिथून निघून जाण्यास सांगितले. मी जागच्या जागीच उभी होते. तेवढ्यात त्यांच्यापैकी एक महिला उठली. तिने पायातील चप्पल काढून थेट माझ्या श्रीमुखात लगावून दिली आणि येथून निघून जाण्याची धमकीही दिली.