आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येमेनमधील धगीची संपूर्ण अरबी जगताला झळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका युद्धग्रस्त देशात अप्रत्यक्षरीत्या हस्तक्षेप करते. परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास अंग काढून घेते. सिरियामध्ये असेच वर्तन केले, आता येमेनमध्ये तेच करते आहे. येमेनमध्ये सरकारच्या विरोधात असलेल्या संघटनेने जेव्हा तेथील राष्ट्रपतींना हाउथी मिलिशिया या संघटनेने पळून जाण्यास बाध्य केले, तेव्हा सौदी अरेबियाने हवाई हल्ले केले. अमेरिकेने या कृतीचे समर्थन केले. हाउथी मिलिशिया संघटनेस इराणचा भक्कम पाठिंबा असून मिलिशियांच्या आक्रमक भूमिकेचा अंदाज आल्याने सौदी अरेबियाने त्यांच्या ठिकाणावर हल्ले चढवले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने खरे तर शांततेसाठी पावले उचलली पाहिजेत किंवा ताठर भूमिका घेतली पाहिजे. यावर अरेबिया, मध्य-पूर्व, अमेरिका आणि सौदी अरेबियातील घडामोडींवरील जाणकार चार तज्ज्ञांनी मते व्यक्त केली. जाणून घेऊया त्यांची मते -

अमेरिकेस हस्तक्षेप करणे महागात पडेल
शर्मिन नरवानी, मध्य-पूर्वेतील घडामोडींचे तज्ज्ञ

सहा वर्षांपूर्वी अरबी देशात क्रांती झाली तेव्हा येमेनमधील लहान शहरात हाउथी मिलिशिया संघटनेचा उदय झाला. त्यांनी आपल्या अधिकाराच्या मागण्यांबरोबरच देशातील निरंकुश सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. या संघटनेची ताकद वाढवली आणि राष्ट्रपतींना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा सौदी अरेबिया आणि अमेरिकेने हवाई हल्ले चढवून आगीत तेल ओतण्याचे काम केले. संपूर्ण देशात हिंसाचार उसळला असून सरकारी यंत्रणा ठप्प झाली आहे. एखाद्या देशात हस्तक्षेप केल्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज या दोन देशांना आलेला नाही. सिरिया, इराक, बहारिन, लिबिया, इजिप्त आणि जेथे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर माणसे मारली गेली आहेत. इतिहास पाहिला असता येमेनमध्ये शांतता कधी नांदलीच नाही. गेल्या काही दशकांपासून या देशात ६ मोठे संघर्षाचे प्रसंग घडले. येथे गोळीबाराच्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. अमेरिका यात पडली नसती तर बरे झाले असते. अरेबिक पेनिनसुलामधून अल कायदाला संपवणे अमेरिकेला कधीच जमले नाही.

संघर्ष दीर्घकाळ चालला तर हाउथी बंडखोर प्रबळ
नबील खौरी, येमेनस्थित अमेरिकी मोहिमेचे माजी अधिकारी

येमेन अयशस्वी ठरत आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लढाई आणखी काही दिवस चालली तर ती त्या भागास विनाशाकडे घेऊन जाईल. यामुळे अल कायदा आणि आयएसची ताकद वाढण्याचेच संकेत आहेत. अरेबियन पेनिनसुलामध्ये धोका वाढल्याने अमेरिका आणि जगासाठी तो अफगाणिस्तानपेक्षा अधिक भयानक असेल. जर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील ही लढाई अयशस्वी ठरली तर हाउथी आणि इराणची युती अधिक मजबूत होईल. या संघर्ष काळात अमेरिका हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेने येमेन सरकार आणि हाउथी मिलिशिया यांच्यात मध्यस्थी करावयास हवी. हाउथीला रोखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाची चुणूक दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. तो सैन्याच्या बाबतीत किंवा कूटनीतीचाही भाग असू शकतो. हाउथीच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या सौदी अरेबियास अमेरिकेने सर्व ताकदीनिशी सहकार्य केले पाहिजे. जमिनीवरून लढण्यापेक्षा हवाई हल्ले करणे अधिक परिणामकारक ठरेल.

इराण आणि सौदी अरेबियामध्ये तडजोडीची गरज
तरिता पारसी, इराणी अमेरिकी कौन्सिलचे अध्यक्ष

अमेरिका जर येमेनमधील गृहयुद्धात उडी घेत असेल तर ते अत्यंत धाडसाचे ठरेल. तेथे जुन्या शत्रूची दिलजमाई झाली आहे. यात हाउथी मिलिशियाही सहभागी आहे. सौदी अरेबिया सुन्नी सहकाऱ्यांना एकजूट करत आहे. कारण हा जातीय संघर्ष आहे. इराण हाउथी मिलिशियाचे समर्थन करत आहे. त्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे अस्थिरता वाढीस लागली आहे. यामुळे अमेरिकेच्या अडचणीत वाढ होणार आहे. जर अमेरिका या भागात जुनीच नीती अमलात आणत असेल तर सौदी अरेबियाची सर्व सत्ताकेद्रे ती आपल्या ताब्यात घेईल. एका युरोपियन राजदूताच्या मते, सौदी अरेबिया सिरियातील अल कायदा आणि अल नुसराला सर्वतोपरी सहकार्य करेल. त्यामुळे सिरियन राज्यकर्ते बशर अल असद आणि त्यांच्या इराणला मदत करणाऱ्या शत्रूला हरवू शकतील. अमेरिकेने येमेनमध्ये उडी घेतलीच पाहिजे, असा याचा अर्थ नाही. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात तिने मध्यस्थी करावी. जर असे घडले नाही तर कोणताही देश स्वत:ला वाचवू शकणार नाही.

इराणमुळे सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण
रशेल ब्रॉन्सन, बुलेटिन ऑफ द अॅटोमिक सायंटिस्टचे संचालक

सौदी अरेबिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत करुन अमेरिका कसलीही चूक करत नाही. त्यांनी यात आणखी वाढच केली पाहिजे. कारण अरबी जगतात तीच एकमेव सूत्रधार आहे. अमेरिकेने येमेनच्या संघर्षात पडावे की नाही, हा मुद्दाच नाही. मुख्य मुद्दा इराण असून ती अरबी जगतात निर्माण होत असलेल्या अस्थिरतेस जबाबदार आहे. इराक, सिरिया, लेबनान आणि आता येमेनमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास इराण जबाबदार आहे. तो तेथील स्थानिक बंडखोरांना पैशाचे आमीष दाखवून आपल्याकडे ओढून घेतो आहे. सैनिकाची रसद पुरवतो आहे. या भागात त्यांची ताकद वाढवण्याचे षडयंत्र रचून सौदी अरेबियाशी इराणने अघोषित युद्ध छेडले आहे. आज सौदी अरेबियाने हाउथी मिलिशियावर कारवाई करत आहे, ही आश्चर्याची बाब नाही. हाउथी जायदिस असून ती शिया पंथीयांची एक शाखा आहे. हितसंबंध गुंतले होते तोपर्यंत सौदी अरेबियाने जायदियांना साथ दिली. १९६२ मध्ये येमेनच्या गृहयुद्धात जायदी शासकांना साथ दिली.