आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूथ आयकॉन : यश मिळवण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाव : स्वप्निल बांदोडकर
शिक्षण : संगीतात पदवी
कुटुंब : पत्नी संपदा, मुलगी लास्या

राधा ही बावरी, हरीची. राधा ही बावरी..’ या तरुणाईला वेड लावणार्‍या या गाण्याने स्वप्निल बांदोडकर या मराठी कलावंताला रातोरात स्टार केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक चित्रपटांत पार्श्वगायनाच्या ऑफर्स त्याला यायला लागल्या. आता तर तो स्वत:चे शोदेखील अरेंज करतो, मात्र हे यश त्याला एवढे सहज मिळालेले नाही, तर त्यासाठी त्याला खूप रियाज करावा लागला. आजच्या तरुणांनीही यश मिळवण्यासाठी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, असे तो म्हणतो.

लहानपणापासूनच गायनाचे धडे गिरवत स्वप्निलने आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले. आता त्याच्या मागे प्रसिद्धीचे मोठे वलय आहे. मराठी चित्रपटातील बहुतांश गाणी त्याने गायली आहेत. मराठी मालिकांचे शीर्षक गीतही तो प्रामुख्याने गातो. हे यश त्याला एका दिवसात मिळालेले नाही, तर त्याला खूप रियाज करावा लागला. चार वर्षांचा असतानाच त्याने संगीताचा रियाज सुरू केला. पंडित वसंतराव कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि अशोक पत्की यांच्याकडे त्याने संगीताचे शिक्षण घेतले. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच मी यश मिळवले आहे, असे तो अभिमानाने सांगतो. आज तो तरुणांचा आयकॉन झाला आहे.

‘राधा’वर विश्वास नव्हता
आज ‘राधा ही बावरी’ हे गाण तरुणांचे अतिशय आवडते आहे, पण हे गाणे इतके गाजेल यावर माझा स्वत:चा अजिबात विश्वास नव्हता. यशाला शॉर्टकट नाही हे खरे असले तरी सगळीच भट्टी जमून आली पाहिजे, हेच खरे. अनेक वेळा इतरही गोष्टी यश मिळवण्याला कारणीभूत ठरतात, हेच यावरून सिद्ध होते.

यशाला शॉर्टकट नाही
स्वप्निल म्हणतो, ‘माणूस दररोजच्या प्रसंगातूनच शिकत असतो. प्रत्येक प्रसंग काही ना काही शिकवून जातो. त्याप्रमाणे शिकण्याची तयारीही ठेवावी लागते, चौकस राहावे लागते. यशाला कधीही शॉर्टकट नसतो. कठोर मेहनतीनेच यश मिळते. जे करायचे त्यात आपल्यातील 100 टक्के देण्याची तयारी ठेवली पाहिजे. कोणतेही काम आनंदाने केले तरच ते यशस्वीपणे पूर्ण होते.’

मिळालेले पुरस्कार
सवरेत्कृष्ट गायक म्हणून 2003-2004चा झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्र कलानिकेतनचा मानिनी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार, क्षय चित्रपटातील पार्श्वगायनासाठी मटा सन्मान 2007, क्षण चित्रपटासाठी व्ही. शांताराम पुरस्कार, कलादर्पण पुरस्कार, उमेद पुरस्कार, झी मराठीचा सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार.

अष्टपैलू कामगिरी
दूरदर्शनवरील ‘राग एक, रंग अनेक’ या कार्यक्रमाचे निवेदन, मी मराठी वाहिनीवरील ‘ताक धिना धिन’चे सूत्रसंचालन, राजेंद्र तलक दिग्दर्शित सावली चित्रपटात प्रमुख भूमिका. अनेक मालिकांची शीर्षक गीते, विविध अल्बम, नाट्यसंगीत, लोकसंगीत, धार्मिक गीते, पॉप गीते, शास्त्रीय गाणी गायली. त्याने दोन हजारांहून जास्त गाणी गायली. त्यामध्ये सही रे सही, लोच्या झाला रे, आम्ही दोघे राजा-राणी, कळा या लागल्या जीवा, गोपाळा रे गोपाळा, सारवरखेड एक गाव, गोलमाल, क्षण, जबरदस्त, सारे तुझ्यात आहे या चित्रपटांतील आणि तू-तू मी-मी या नाटकातील गाण्यांचा समावेश आहे.