आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्‍येयापर्वाचा अखेर: 'तरूण तुर्क' नेतृत्वाचा अस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू, माजी केंद्रीय मंत्री, ‘वनराई’च्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी भरीव काम करणारे ‘तरुण तुर्क’ नेतृत्व, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश....


डॉ. मोहन माणिकचंद धारिया यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1925 रोजी रायगड जिल्ह्यातील नाते (ता. महाड) येथे झाला. मॅट्रिकनंतर डॉ. धारिया यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. मेडिकल सर्जन होण्याची त्यांची इच्छा होती; परंतु 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत उडी घेत त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. वयाच्या सतराव्या वर्षीच डॉ. धारिया यांना अटक झाली आणि त्यांना कारावास भोगावा लागला. पुढे त्यांनी पुण्याच्याच आयएलएस लॉ कॉलेजातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी काही काळ वकिलीही केली.
पंतप्रधान इंदिरा गांधी, ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्याशी डॉ. धारिया यांचे जवळचे नाते होते. इंदिरा गांधींनी डॉ. धारियांना काँग्रेसमध्ये भरपूर संधी दिली. मात्र, याच गांधींनी 1975 ला आणीबाणी लागू केली त्या वेळी त्याचा स्पष्ट निषेध करीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास डॉ. धारियांनी मागे-पुढे पाहिले नाही.


आणीबाणीला विरोध
आणीबाणीला तीव्र विरोध करणारे डॉ. धारिया हे इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री होते. आणीबाणीला विरोध केल्यामुळे त्यांना 17 महिने तुरुंगात काढावे लागले.


राजकीय वाटचाल
1957 मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवकपदी निवडून येत डॉ. धारियांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. स्वातंत्र्यापूर्वीपासूनच काँग्रेस विचारधारेशी जुळवून घेतलेल्या डॉ. धारियांनी महाराष्ट्र युवक काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली ती पन्नासच्या दशकातच. 1962 च्या निवडणुकीत काँग्रेसचे पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी राज्यात काम पाहिले. याच कालावधीत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध जुळले. 1962 ते 1975 या दीर्घ कालावधीत डॉ. धारिया यांनी अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1964 ते 1970 या कालावधीत त्यांनी काँग्रेसतर्फे राज्यसभेवर प्रतिनिधित्व केले.


मोरारजींच्या काळात वाणिज्यमंत्री
1971 मध्ये पुण्यातून डॉ. धारिया यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. भारतीय जनसंघाचे उमेदवार रामभाऊ म्हाळगी यांचा पराभव करून ते खासदार झाले. आणीबाणीच्या मुद्द्यावरून इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर डॉ. धारियांनी 1977 सालची लोकसभा निवडणूक भारतीय लोक दलातर्फे लढवली. याही निवडणुकीत पुणेकरांनी काँग्रेसच्या वसंत थोरात यांना पराभूत करत डॉ. धारियांना निवडून दिले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्यमंत्री होण्याची संधी त्यांना या विजयाने मिळवून दिली.


तरुणांच्या समस्यांना प्राधान्य
अंगभूत नेतृत्वगुणांमुळे प्रारंभीपासूनच डॉ. धारिया तरुणांचे लाडके नेते बनले होते. युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीमधल्या पदांच्या निमित्ताने त्यांनी राज्य आणि देश फिरून पाहिला. देशभरातील समवयस्क तरुणांशी सूर जुळवले. काँग्रेसमधे असूनही जनतेला केवळ आश्वासने देणा-या सरकारला धारेवर धरण्यास वेळप्रसंगी त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. सरकारने कृतिशील कार्यक्रम देणारी धोरणे आखावीत, यासाठी त्यांनी आग्रह धरला. तरुणांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले. यातूनच ‘युवक नेता’ अशी त्यांची प्रतिमा बनत गेली. साठच्या दशकापासूनच त्यांनी संघटित कामगार संघटनांच्या कार्याशी संबंध ठेवला. पोस्ट, राज्य वाहतूक महामंडळ, बँक, संरक्षण खाते, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स येथील कर्मचा-यांच्या संघटनांचे नेतृत्व डॉ. धारियांनी केले. देशातील कामगारांना एकत्र आणत नॅशनल लेबर सेंटर आॅफ इंडियाचे ते संस्थापक अध्यक्षही झाले.


महाड कचेरीवर ताबा, कारावास भोगला
महाडच्या सेवादलाचे प्रमुख असताना डॉ. मोहन धारिया यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. तरुण सहका-यांच्या साहाय्याने तरुण मोहनने सशस्त्र हल्ला करून महाड तालुका कचेरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका सरकारी अधिका-यासह पाच जण ठार झाले. यानंतर डॉ. धारिया भूमिगत झाले, परंतु पोलिसांनी त्यांना पकडले. कोर्टाने 1942 मध्ये कारावास ठोठावला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर डॉ. धारियांनी ‘लोकसेना’ स्थापन करून तेव्हा सिद्दी जोहरच्या ताब्यात असलेले जंजिरा संस्थान मुक्त केले. जंजिरा संस्थानच्या नव्या हंगामी सरकारात ते परराष्ट्र मंत्री होते.


वनराई बंधा-यांचे
भरीव कार्य

पावसाचे पाणी साठवून ते नंतरही वापरता यावे, यासाठी बंधा-यांची सोपी पद्धत डॉ. धारिया यांनी वापरात आणली. दगड, माती, वाळू भरलेल्या गोण्यांची रचना करुन बंधारे बांधण्याच्या या पद्धतीमुळे राज्यातली शेकडो गावे टॅँकरमुक्त झाली. या बंधा-यांसाठी सिमेंट किंवा खतांसाठी वापरलेल्या रिकाम्या गोण्या वापरल्या जातात. सिमेंट, वाळू, लोखंड अशा महागड्या वस्तूंचा वापर न करता बांधल्या जाणा-या वनराई बंधा-यांचा कार्यक्रम वनराई संस्थेने राज्यात सर्वत्र नेला. गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्येही वनराई बंधा-यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे.


राष्ट्रीय परिघावर ठसा
1960 च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ. धारियांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले. सोयीच्या राजकारणाऐवजी वचनपूर्तीचे राजकारण करण्याचा आग्रह धरण्यामुळे डॉ. धारिया अल्पावधीत देशपातळीवर परिचित झाले.
केंद्रीय राज्यमंत्री असताना योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ‘बेरोजगारांसाठी रोजगार’ या योजनेचे प्रमुख असताना त्यांनी ‘बीज भांडवल’ योजना पुढे आणली. त्यात इंजिनिअर, तंत्रज्ञ आणि मागासवर्गीय तरुणांना स्वत:चे फक्त 10 टक्के भागभांडवल उभे करायचे होते. या योजनेमुळे 3.75 लाख तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला. शहरांची लोकसंख्यावाढ दहा लाख इतकी मर्यादित ठेवण्यासाठी 1974 मध्ये डॉ. धारिया यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडला होता.


देशभर दौरा करून त्यांनी रेशन दुकानातून होणा-या अन्नधान्य वितरणाचा अभ्यास केला. बाजारातील किमती कमी करून स्थिर ठेवण्यात डॉ. धारियांना यश आले. यामुळे कोट्यवधी जनतेला दिलासा मिळाला. जीवनावश्यक वस्तू रास्त दरात, मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या. देशाच्या इतिहासात 1977-78, 78-79 या दोन वर्षांत कर्मचा-यांना महागाई भत्ता द्यावा लागला नाही. अत्यावश्यक वस्तूंसाठीचा ‘धारिया रिपोर्ट’ जनता पक्ष सरकारने स्वीकारला, परंतु हे सरकार न टिकल्याने अंमलबजावणी रखडली.


अनेक समित्यांवर काम
लोकसभा आणि राज्यसभेवर असताना डॉ. धारियांनी विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण बोलणारा ‘तरुण नेता’ अशी ओळख प्रयत्नपूर्वक निर्माण केली. लोकसभेचे सदस्य म्हणून डॉ. धारियांना देश-विदेशात अनेक समित्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. 1970 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात गेलेल्या भारतीय खासदारांच्या गटाचे नेतृत्व डॉ. धारियांकडेच होते. अलीकडच्या काळात म्हणजे 1990-91 मध्ये डॉ. धारिया यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली.


‘वनराई’चे अनोखे काम
सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्यानंतर 1982 मध्ये डॉ. धारियांनी ‘वनराई’ची स्थापना केली. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला खेड्यातला भारत घडवण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘वनराई’ची वाटचाल सुरू झाली. जलसंधारण, ग्रामविकास, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण अशी शेकडो कामे त्यांनी राज्यभर सुरू केली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्यासाठी डॉ. धारियांनी सुरू केलेली बंधा-यांची चळवळ ‘वनराई बंधारा’ म्हणून ओळखली जाते. आजमितीस गावोगावी हजारोंच्या संख्येने वनराई बंधा-यांची उभारणी झालेली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. माधव गाडगीळ, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना सोबतीला घेत ‘वनराई’चे काम शिखरावर नेले. युवा शक्ती, हिमालयीन अ‍ॅडव्हेंचर्स, रक्तदाता प्रतिष्ठान या इतर संस्थांच्या माध्यमातूनही डॉ. धारियांनी समाजकारण सुरू ठेवले.


‘संघर्षमय सफर’
भारतीय राजकारण आणि समाजकारणात दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या डॉ. धारियांनी त्यांचे अनुभव शब्दबद्ध करून ठेवले आहेत. ‘संघर्षमय सफर’ या आत्मचरित्रात त्यांनी राजकीय वाटचाल विशद केली आहे. भारतातील वनीकरण, लोकसंख्या विस्फोट या सामाजिक विषयांवर त्यांनी अनुक्रमे ‘अफॉरेस्ट्रेशन इन इंडिया’ आणि ‘पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड इंडिया’ हे इंग्रजी ग्रंथ लिहिले आहेत. ‘तेथे कर माझे जुळती’ या पुस्तकात डॉ. धारियांनी कारकीर्दीत भेटलेल्या राजकीय, सामाजिक व्यक्तिमत्त्वांचे चित्रण करून ठेवले आहे. ‘संघर्षमय सफर’ हे त्यांचे पुस्तक तरुणांना प्रेरक ठरणारे आहे.


प्रमुख योगदान
भारतातील 17.5 कोटी हेक्टर जमीन पडीक आहे. ही जमीन उपजाऊ बनवण्यासाठी पंधरा वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी डॉ. धारिया 17-18 वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने स्वतंत्र ‘भूमी संसाधन खाते’ स्थापन केले. याकामी डॉ. धारियांनी मार्गदर्शन केले आहे. राज्य सरकारनेही धारिया समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मिशन स्थापण्यात आले आहे. येत्या पंधरा वर्षांत राज्यातील 1.45 कोटी हेक्टर पडीक जमीन उपजाऊ करण्याचे लक्ष्य या मिशनपुढे आहे. या मिशनचे प्रमुख सल्लागार म्हणून डॉ. धारिया काम करीत होते.


खेड्यांकडे चला : 300 गावांत वनराईची मोहीम
‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा संदेश आचरणात आणण्यासाठी ‘वनराई’च्या माध्यमातून चळवळ हाती घेतली. मुंबईत स्थलांतर करुन गलिच्छ वस्त्यांत राहणारी 160 कुटुंबे ‘वनराई’ गावांच्या सर्वांगिण विकासामुळे गावडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे परतली. ही चळवळ 300 खेड्यांत राबविली जाते. पाणी, पशुधन, वन, समुद्र किनारा, तलाव, औषधी व बहुमोल वनस्पती यासारख्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि विकासाभिमुख खेड्यांमुळे स्थलांतर थांबू शकते. शहरांवरील ताण कमी झाल्याने शहरेही सुंदर, सुनियोजीत होतील, या विचारातून डॉ. धारिया काम करीत होते.


विचारांशी प्रतारणा होणार नाही
यशवंतरावांच्या पाठीशी उभे राहणा-यांचे नेतृत्त्व धारियांनी केले. पुण्याच्या मर्यादा ओलांडून ते राज्यसभेवर गेले. वेळप्रसंगी नेतृत्वाची नाराजी स्वीकारली तरी चालेल, परंतु स्वत:च्या मूळ विचारांशी प्रतारणा करायची नाही, हे ध्येय त्यांनी पाळले. पर्यावरण ध्यास, पाणी व वृक्ष जतन यासाठी त्यांनी केलेले कार्य जतन करणे हीच खरी श्रद्धांजली.
शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री


समाजकारण, राजकारण याचा अनोखा मेळ
राजकारण आणि समाजकारण यांचा अनोखा मेळ साधणारे धारिया हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रांत वावरताना त्यांनी मिळवलेले अजातशत्रुत्व हेच त्यांच्या कार्याचे खरे मूल्यमापन. ‘वनराई’च्या माध्यमातून केलेले कार्य प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक महत्त्वाचा दुवा धारिया यांच्या निधनाने निखळला आहे. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री


पर्यावरणस्नेही समाजकारणी गमावला
धारिया यांच्या निधनामुळे आपण पर्यावरणस्नेही समाजकारणी आणि राजकारणी गमावला आहे. राजकारणातून दूर झाल्यानंतरही त्यांनी समाजाशी नाळ कायम घट्ट ठेवली. सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. ‘वनराई’च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केले.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
सामाजिक चळवळीची
अपरिमित हानी
आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहून सामान्यांच्या हितासाठी झगडणारे आणि वनराईच्या माध्यमातून आदर्श गाव निर्मितीचे कार्य करणारे धारिया यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. केंद्रीय मंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर काम करून राष्‍ट्रीय स्तरावर त्यांनी कार्याची मोहोर उमटवली आहे.
आर. आर. पाटील, गृहमंत्री


संकलन : सुकृत करंदीकर