आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१.४ कोटी मुस्लिमांची मक्का यात्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा तरी मक्का-मदिनेची यात्रा करावी, अशी प्रत्येक मुस्लिमाची इच्छा असते. अरबी कालगणनेच्या बाराव्या महिन्याच्या दहा तारखेला होणारी ही यात्रा हज नावाने विख्यात आहे. परंतु वर्षातील इतर कोणत्याही काळात जाऊनही पुण्य कमावता येते, असे सामान्य मुसलमानास वाटत असते. रमजान हा मुस्लिमांसाठी साधना करण्याचा महिना. त्यामुळे याच महिन्यात मक्का-मदिनेची यात्रा करण्याची आस बहुसंख्य मुस्लिमांच्या मनात असते. अरब देशांबाहेर राहणाऱ्यांसाठी ही यात्रा मोठी खर्चिक ठरते. त्यामुळे गरीब मुसलमानाला ही यात्रा करणे शक्य होत नाही. यासाठी भारतासारखे धर्मनिरपेक्ष देश यात्रेला अनुदान देऊन मदत करत असतात. भारत सरकारने स्थापन केलेली हज कमिटी कार्य करत असते. भारतातील गरीब मुसलमानाला आपली धार्मिक यात्रा पूर्ण करता यावी, असा उद्देश भारत सरकारचा असतो. पण काही मुसलमान इतर कालावधीतही या पवित्र स्थळांच्या दर्शनाला जात असतात. काही विधी हज यात्रेच्या वेळीच करायचे असतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न मुसलमान रमजानच्या महिन्यात मक्का-मदिनेची यात्रा करण्याला प्राधान्य देतात. या यात्रेला उमरा म्हटले जाते; पण या वेळी यात्रा करणाऱ्यांना भारत सरकार आर्थिक मदत करत नाही. स्वखर्चाने यात्रा करावी लागते.
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे परंपरेनुसार जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मुसलमान पुण्य कमावण्यासाठी हज यात्रा करत आहेत. या काळात भारतातून जाणाऱ्यांची संख्याही काही कमी नसते. स्वखर्चाने उमरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय मुसलमान मक्का-मदिनेला जातात. सौदी सरकारने दिलेल्या जाहिरातीनुसार मागील १६ दिवसांमध्ये जगभरातील १ कोटी ४० लाख मुसलमान उमरा करण्यासाठी सौदीत पोहोचले आहेत. यात भारतातून गेलेल्या मुसलमानांची संख्याही मोठी असते. ७ जुलैपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार रमजानच्या पहिल्या पंधरवड्यात जगभरातून १ कोटी ४० लाख मुसलमान मक्का-मदिनेत पोहोचले आहेत. गेल्या वर्षी तेथे पोहोचलेल्या भाविकांच्या संख्येशी तुलना करता यंदाची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्के भाविक यंदा जास्त पोहोचले आहेत. यातून एक बाब स्पष्ट होते की, मुसलमानांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. हा एक विचित्र योगायोग आहे की, मुस्लिम राष्ट्रांमध्ये राजकीय संघर्षात जेवढी वाढ होईल तेवढी धार्मिक प्रवृत्ती वाढताना दिसते.

दाइश अर्थात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी लावलेली आग मध्य पूर्वेत धुमसत आहे. इतकेच नाही, तर अल बगदादीने लावलेली ही विषवल्ली अनेक मुस्लिम राष्ट्रांना आपल्या विळख्यात घेत आहे. परिणामी रक्तरंजित संघर्ष रोजचाच झाला आहे आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. असे असले तरी उमरा करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. उमराच्या निमित्ताने मक्का-मदिनेला पोहोचणाऱ्यांच्या संख्येचे विश्लेषण केल्यास आपल्याला काय दिसून येते? यातून स्पष्ट होते की उमरा करणाऱ्यांमध्ये मध्यपूर्वेच्या तुलनेत भारतीय उपखंडातील मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे. मध्य पूर्वेतील मुसलमान सौदी देशाच्या जवळ असून उमरा करणाऱ्यांची संख्या कमी असते. दक्षिणपूर्व आशियातून गेलेल्या मुस्लिमांची संख्या अधिक असते, ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये ४० ते ५० टक्के भाविक केवळ पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशातून गेलेले मुसलमानच असतात. जगातील तिन्ही मोठे धर्म अरब देशांतून उगम पावले, हे खरे असले तरी केवळ दक्षिण पूर्व आशियातील देशांनीच जगात इस्लामचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे आजही कुराण सर्वाधिक प्रकाशित कोठे होत असेल तर ते या भौगोलिक क्षेत्रातूनच होय. यात भारताचे स्थान खूप वरचे आहे. इंग्रजीत पहिल्यांदा कुराण छापण्याचा मान भले इंग्लंडचा असेल, पण अरबी लिपीत केवळ भारतीय उपखंडातच याचे सर्वाधिक प्रकाशन होते. अरबी लिपीतून कुराणचे पहिल्यांदा प्रकाशन करणारा देश भारत आहे. हे कार्य पंडित नवलकिशोर यांनी केले. त्यांच्या छापखान्याचे अवशेष आजही पाहण्यास मिळतात. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा पंडित नवलकिशोर यांच्यावर एका टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले होते, भारतीय जनता पक्षाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही घटना आहे.

भारतातून परदेशात धार्मिक पुस्तकांची जी निर्यात होते, त्यात कुराणची संख्या सर्वाधिक आहे. मोठ्या आठ आणि छोट्या जवळजवळ २५ कंपन्या कुराण प्रकाशित करण्याचे काम करतात. त्यामुळे भारतातील मुंबई, दिल्ली, लखनऊ, मुरादाबाद आणि हैदराबाद येथून मोठ्या प्रमाणावर कुराणची निर्यात होत असते. केवळ अरबीच नाही, तर दक्षिण भारतीय भाषांमध्येही कुराण अनुवादित झाला आहे. मध्य पूर्वेतील देशांत काम करणारे भारतीय मोठ्या संख्येने या कुराणची खरेदी करत असतात. उर्दूसह अन्य भारतीय भाषांतील अनुवादांनी विक्रम स्थापित केले आहेत. कुराण छापणे हे भारताचे मोठे वैशिष्ट्य आहे. अन्य प्रकारचे इस्लामी साहित्य निर्माण करण्यात भारताचे जगातील स्थान अतुलनीय असेच आहे. भारत सरकारकडून विद्यापीठांसाठी अर्थसाह्य करण्यात येते. शिवाय, अरबी आणि फारसी भाषेसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. थोडक्यात, इस्लामी साहित्य भारतात मोठ्या प्रमाणावर छापले आणि विकले जाते, असे आपण अभिमानाने म्हणू शकतो.

एक धर्मनिरपेक्ष देश असूनही भारत इस्लामी साहित्य आणि मूल्यांची सेवा मोठ्या प्रमाणावर करतो. भारत सरकार तर हे सारे करते, पण भारतीय मुसलमान आपल्या देशासाठी काय करतो, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कोणत्याही धर्माच्या अनुयायाने आपली धार्मिक यात्रा स्वकमाईतील पैशाने करणे, यातच धार्मिक शुद्धता असते. भारतातील मुसलमान समाज आता आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर आहे. त्यामुळे भारतीय मुसलमानांनी हज यात्रा स्वत: कमावलेल्या पैशातून करणेच योग्य. या पैशाचा उपयोग भारत सरकार अन्य कार्यासाठी करू शकेल. भारतातील हिंदू मानसरोवर यात्रेला जातो. पासपोर्ट काढणे आवश्यक असल्याने मोठा खर्च होतो. यासाठी भारत सरकारने मदत केली पाहिजे. अशी मदत करण्यात येत नसेल तर मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या अनुदानाला राजकीय सोय म्हणूनच पाहिले जाईल. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला काहीही अर्थ राहणार नाही. सरकारने हवं ते करू द्या, पण सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या धर्माच्या मार्गाने चालून ईश्वराचा खरा भक्त बनला पाहिजे.
मुजफ्फर हुसेन
ज्येष्ठ पत्रकार
m_hussain1945@ yahoo.com
बातम्या आणखी आहेत...